भारतातील चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि एका केंद्रशासित प्रदेशातील निवडणुकीची सध्या संपूर्ण जगभरात चर्चा रंगली. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी या निकालांचे वार्तांकन करताना भारतीय जनता पार्टीच्या यशावर आणि तमिळनाडूतील सत्तांतरावर विशेष लक्ष केंद्रित केले. लंडनपासून ते न्यूयॉर्कपर्यंत आणि पाकिस्तानपासून ते ढाक्यापर्यंतच्या प्रमुख वृत्तपत्रांची पाने सोमवारी भगव्या रंगाने भरलेली पाहायला मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाने ममता बॅनर्जी यांची बंगालमधील १५ वर्षांची अभेद्य सत्ता उलथवून लावल्यानंतर विदेशी माध्यमांनी या विजयाचे ‘ऐतिहासिक सत्तापालट’ असे वर्णन केले, त्याविषयी…

सगळ्या देशाचे लक्ष लागून असलेल्या चार राज्यांसह एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीने केरळ आणि तमिळनाडू वगळता पश्चिम बंगालसह आसाम व पुदुच्चेरीत दणक्यात विजय मिळवला. २९४ सदस्यांच्या बंगालच्या विधानसभेत २०० हून अधिक जागांवर जिंकून भाजपाने ऐतिहासिक कामगिरी केली; तर ममता बॅनर्जी यांच्या पक्षाची या निवडणुकीत मोठी पीछेहाट झाली. दीड दशकापासून पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची एकहाती सत्ता होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत बंगाली मतदारांनी भाजपाच्याच गळ्यात विजयाची माळ टाकली. भाजपाला मिळालेला हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रीय प्रतिमेवर शिक्कामोर्तब करणारा असल्याचे अनेक जागतिक वृत्तपत्रांनी म्हटले आहे.

बीबीसीच्या वृत्तात काय नमूद करण्यात आले?

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने मिळविलेल्या विजयाची दखल ब्रिटिश प्रसारमाध्यम बीबीसीने घेतली. ‘मोदींच्या भाजपाने बंगाल जिंकले’ अशा शीर्षकाखाली बीबीसीने एक सविस्तर लेख लिहिला. ममता बॅनर्जी यांचा मजबूत गड असलेल्या पश्चिम बंगालमध्ये आपली घट्ट पाळेमुळे रोवण्यात भाजपाला यश आले. पूर्व भारतातील या राज्यातील पक्षाला मिळालेला विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १२ वर्षांच्या कारकिर्दीतील सर्वांत महत्त्वपूर्ण यशांपैकी एक मानला जाईल. या निवडणुकीत १५ वर्षांपासून बंगालच्या सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांच्या पक्षाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. वर्षानुवर्षे डावे आणि तृणमूलचा बालेकिल्ला राहिलेल्या या राज्यात भाजपाला मिळालेला विजय हे त्यांच्या विस्तारवादी राजकारणाचे यश आहे, असे या लेखात नमूद करण्यात आले. पश्चिम बंगालमधील हा विजय मोदी सरकारची देशावरची पकड अधिक घट्ट करणारा असून, त्यामुळे विरोधकांच्या मनोधैर्यावर मोठा परिणाम होऊ शकतो, असेही बीबीसीने आपल्या लेखात म्हटले.

भाजपाच्या विजयावर ‘द गार्डियन’ने काय म्हटले?

ब्रिटिश वृत्तपत्र असलेल्या ‘द गार्डियन’च्या लेखातही पश्चिम बंगालमधील निवडणूक निकालांवर भाष्य करण्यात आले. ‘नरेंद्र मोदींच्या भाजपाने पहिल्यांदाच पश्चिम बंगालमध्ये निवडणूक जिंकली’ या शीर्षकाखाली छापून आलेल्या या लेखात भाजपाच्या विजयाचे सविस्तर विश्लेषण करण्यात आले. “भारताच्या पूर्वेकडील असलेले पश्चिम बंगाल हे राज्य आतापर्यंत विरोधी पक्षांचे अभेद्य केंद्र राहिले होते. मात्र, भाजपाने या राज्यातील सत्ता मिळवून देशभरातील आपली ताकद अधिक मजबूत केली. बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालामुळे भारताच्या राजकीय पटलावर अत्यंत महत्त्वाचे परिणाम होतील. या विजयामुळे आधीच कमकुवत झालेल्या विरोधी पक्षांचे आणखीनच खच्चीकरण होऊ शकते. या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्यासारख्या प्रबळ नेत्याचा पराभव झाल्यामुळे राष्ट्रीय स्तरावर विरोधी पक्षांच्या एकजुटीला खीळ बसू शकते”, असे या लेखात नमूद करण्यात आले.

भाजपाच्या विजयावर ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने काय म्हटले?

भारतातील विधानसभा निवडणुकीच्या निकालांचे पडसाद आता सातासमुद्रापार अमेरिकेतही उमटले. अमेरिकेतील आघाडीचे वृत्तपत्र ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने पश्चिम बंगालमधील भाजपाच्या विजयाला ‘ऐतिहासिक’ ठरवीत भारताच्या राजकीय भविष्यासाठी हा एक मोठा टप्पा असल्याचे म्हटले. ’मोदींच्या हिंदू राष्ट्रवादींनी विरोधकांच्या बालेकिल्ल्यावर विजय मिळवला’ या शीर्षकाखाली ’न्यूयॉर्क टाइम्स’ने विशेष लेख प्रसिद्ध केला. “पंतप्रधान मोदी यांच्या भारतीय जनता पक्षाने जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीची नव्याने उभारणी करण्याच्या आपल्या दशकानुदशके सुरू असलेल्या मोहिमेत सोमवारी एक मोठे यश संपादन केले. देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या राज्यांपैकी एक असलेल्या पश्चिम बंगालमध्ये, जिथे भाजपा कधीही सत्तेच्या जवळपास नव्हता, तिथे त्यांनी दणदणीत विजय मिळवून एक नवा इतिहास रचला आहे,” असे या लेखात नमूद करण्यात आले.

‘वॉशिंग्टन पोस्ट’कडून बंगालच्या निकालाचे विश्लेषण

अमेरिकेतील आघाडीचे वृत्तपत्र ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने भारतातील विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर भाष्य करताना, हे निकाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय भविष्यासाठी आणि काँग्रेसच्या पुनरुज्जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे. पश्चिम बंगालमधील निवडणूक निकालांमुळे पंतप्रधान मोदी यांची प्रतिष्ठा आणखी वाढणार असून, त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळाची स्थिती अधिकच भक्कम होईल. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला सत्ता स्थापनेसाठी प्रादेशिक मित्रपक्षांवर अवलंबून राहावे लागले होते. मात्र, बंगालमधील या विजयानंतर पंतप्रधान मोदी २०२९ मध्ये चौथ्या कार्यकाळासाठी निवडणूक लढविण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे, असे ’वॉशिंग्टन पोस्ट’च्या लेखात नमूद करण्यात आले. बंगालसोबतच केरळच्या निकालांवरही लेखात विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. “केरळमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी आघाडीने सत्ताधारी कम्युनिस्ट सरकारचा पराभव केला. डाव्या विचारसरणीचा शेवटचा प्रमुख बालेकिल्ला असलेल्या केरळमध्ये डाव्यांच्या सत्तेचा अंत झाला आहे, असे ’वॉशिंग्टन पोस्ट’ने म्हटले.

भाजपाच्या विजयावर पाकिस्तानी वृत्तपत्राने काय म्हटले?

भारताच्या सीमेला लागून असलेल्या पाकिस्तानमधील प्रमुख वृत्तपत्र ‘डॉन’नेही भारतातील निवडणूक निकालांचे सविस्तर वार्तांकन केले. पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांनी प्रामुख्याने पंतप्रधान मोदींच्या राजकीय ताकदीवर आणि त्यांच्यापुढील भविष्यातील आव्हानांवर लक्ष केंद्रित केले. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील हिंदुत्ववादी पक्षाने पश्चिम बंगालमधील महत्त्वाच्या निवडणुकीत विजय मिळवून विरोधकांच्या दीर्घकालीन बालेकिल्ल्यावर ताबा मिळवला आहे. आपल्या कट्टर प्रतिस्पर्ध्याचा (ममता बॅनर्जी) पराभव करून, भाजपाने पूर्वेकडील या राज्याची सत्ता काबीज केली आहे. या निकालांमुळे मोदी सरकारची राजकीय स्थिती अधिकच मजबूत होईल, असे ’डॉन’च्या वृत्तात नमूद करण्यात आले. पश्चिम बंगालमधील बेरोजगारी आणि इतर आर्थिक समस्यांचा सामना मोदी सरकारला करावा लागेल, याकडेही लक्ष वेधण्यात आले.

बांगलादेशातील वृत्तपत्राच्या लेखात नेमके काय?

बांगलादेशातील ‘ढाका ट्रिब्यून’ या वृत्तपत्रानेही भारतातील निवडणुकांवर सविस्तर वृत्त दिले. त्यात तमिळनाडूमधील आणखी एका मोठ्या राजकीय उदय झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे, ज्यामध्ये मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचा अनपेक्षित प्रतिस्पर्ध्याकडून पराभव झाल्याचे नमूद करण्यात आले. या वृत्तानुसार, स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील द्रमुक (DMK) पक्ष दुसऱ्या निवडणुकीत क्रमांकावर राहिला; तर अभिनेता-राजकारणी थलपती विजय यांनी स्थापन केलेल्या नव्या पक्षाने निवडणुकीत मोठी मुसंडी मारली. हा निकाल तमिळनाडूच्या राजकारणातील मोठा बदल दर्शविणारा ठरला आहे. पश्चिम बंगालमध्येही भाजपाने हिंदुत्वाचा मुद्दा जोरकसपणे मांडून ममता बॅनर्जी यांना सत्तेतून बाहेर केले, असेही ‘ढाका ट्रिब्यून’ने आपल्या वृत्तात नमूद केले.