पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आठवड्यात ते आपल्या काही माजी आमदारांसह भाजपात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे भाजपाला पंजाबमध्ये एक शीख चेहरा मिळणार आहे. तीन कृषी कायद्यांमुळे पंजाबमधील भाजपाचा मित्रपक्ष शिरोमणी अकाली दल भाजपापासून वेगळा झाला. तेव्हा पासून भाजपा पंजाबमध्ये एक स्वातंत्र्य चेहऱ्याच्या शोधात होता.

पंजाबमध्ये सरकार स्थापन करून आम आदमी पार्टीला शुक्रवारी सहा महिने पूर्ण झाले आहेत. तर भारतीय जनता पार्टीने आपल्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न केला, असा आरोप आम आदमी पार्टीने यापूर्वीच केला आहे. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. या सर्व घडामोडी सुरू असताना अमरिंदर सिंग भाजपात प्रवेश करणार असल्याची बातमी मिळाली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून भाजपा पंजाबमध्ये एक मजबूत शीख चेहरा शोधत आहे. जो त्यांच्या हिंदू मतदारसंघालाही मान्य असेल. अमरिंदर सिंग हे ८० वर्षांचे असले तरी अजून तंदुरुस्त आहेत. २०२१ मध्ये अपमानास्पद वागणूक मिळाल्याच्या कारणातून अमरिंदर सिंग काँग्रेसमधून बाहेर पडले होते. आता भाजपाच्या रुपात त्यांच्याकडे नवीन संधी चालून आली आहे.

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये मुख्यमंत्रिपदावरून उचलबांगडी झाल्यानंतर सिंग यांची प्रकृती चांगली नाही. ते राजकारणातून निवृत्ती घेतील, असं अनेकांना वाटलं होतं. मात्र, सिंह यांनी नोव्हेंबरमध्ये ‘पंजाब लोक काँग्रेस’ची स्थापना केली आणि नंतर त्यांनी भाजपासोबत निवडणूकपूर्व युती केली. पण या निवडणुकीत सिंग यांचा पक्ष सपशेल अयशस्वी ठरला. स्वत: अमरिंदर सिंग यांचा बालेकिल्ला असणाऱ्या पटियाला मतदारसंघात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

पंजाब प्रदेश काँग्रेसचे माजी प्रमुख सुनील कुमार जाखड आणि माजी मंत्री बलबीर सिद्धू, गुरप्रीत कांगार, राज कुमार वेरका आणि सुंदर शाम अरोरा यांसारख्या अनेक माजी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. या वर्षी मार्चमध्ये झालेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने दणदणीत विजय संपादन केला. त्यांनी ११७ पैकी ९२ जागांसह जोरदार मुसंडी मारली आहे. तर काँग्रेसला केवळ १८ जागांवर समाधान मानावं लागलं आहे.

अमरिंदर सिंग यांनी राष्ट्रवादी अजेंड्यावर सीआरपीएफ जवानांचा मृत्यू, पुलवामा हल्ला, गलवान खोऱ्यातील भारत-चीन संघर्ष यांसारख्या मुद्द्यावरून भाजपाच्या सुरात सुर मिसळून टीका केली आहे. सीमेपलीकडील दहशतवाद आणि अंमली पदार्थांची तस्करी याबाबत अमरिंदर सिंग यांची भूमिका महत्त्वाची आहे. अमरिंदर सिंग यांनी आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावरही सातत्याने टीका केली आहे. दुसरीकडे, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी वैयक्तिक संबंध चांगले ठेवले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अमरिंदर सिंग जेव्हा पंजाबचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी स्वत:च सांगितलं होतं की, जेव्हा आम्ही पंतप्रधानांशी संपर्क साधतो, तेव्हा मोदींकडून नेहमीच सहकार्य केलं जातं.