संतोष मासोळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धुळे : इतर जिल्ह्यांच्या तुलनेत शिवसेनेसाठी खडतर समजल्या जाणाऱ्या धुळ्यात विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करून युवक कार्यकर्ता अशी स्वत:ची वेगळी ओळख वयाच्या अवघ्या पस्तिशीत निर्माण करणारे पंकज यशवंत गोरे हे शिवसेना ठाकरे गटासाठी उद्याचे आशास्थान मानले जात आहे.

वाणिज्य शाखेतील पदवी, समाजकार्य शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, विधि शाखेची पदवी, इतकेच काय तर, पत्रकारितेचेही ज्ञान असावे म्हणून पत्रकारितेतील पदव्युत्तर पदवी अशा अनेक पदव्या मिळविलेले उच्चविद्याविभूषित गोरे यांना राजकीय पटलावर युवासेनेचे राज्य सहसचिव आणि नंदुरबार जिल्हा विस्तारक करण्यात आले आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या घरातून पुढे आलेल्या गोरे यांनी अल्पावधीतच विद्यार्थी नेता म्हणून स्थान निर्माण केले आहे.

हेही वाचा… देवानंद पवार : शेतकऱ्यांसाठी लढणारा नेता

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतच राहून सवतासुभा निर्माण केल्यावरही गोरे यांनी उध्दव ठाकरे यांची साथ सोडली नाही. ठाकरे घराण्याशी असलेली निष्ठा त्यांनी दाखवून दिल्याने जुन्या कार्यकर्त्यांमध्येही त्यांनी आदर निर्माण केला आहे. भारतीय विद्यार्थी सेनेपासून सुरू झालेला गोरे यांचा राजकीय प्रवास हा थेट युवा सेनेचे राज्य सहसचिव तसेच धुळे नंदुरबार विस्तारकपर्यंत मोठ्या मेहनतीने पोहोचला आहे. ठाकरे यांनी मुंबई येथील सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तपदी काम करण्याची त्यांना संधी दिली. भारतीय विद्यार्थी सेनेत आल्यापासून गोरे यांनी नेहमीच विद्यार्थ्यांचे प्रश्न आक्रमकपणे मांडण्याची तसेच विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचा सातत्याने प्रयत्न केला. धुळे शहरातील कृषी महाविद्यालयात कृषी विद्यापीठ होण्यासाठी २०१० पासून त्यांनी आंदोलने केली. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे उपकेंद्र धुळे शहरात होण्यासाठी आजही त्यांचा पाठपुरावा सुरू आहे.

हेही वाचा… सचिन कल्याणशेट्टी : समाजकारण आणि राजकारणाची हुकमी गोळाबेरीज

गोरे यांची आक्रमकता आणि चिकाटी पाहून आदित्य ठाकरे यांनी त्यांच्यावर युवा सेनेच्या जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपविली. युवासेनेच्या माध्यमातून गोरे हे शैक्षणिक, आरोग्य आणि रोजगार या त्रिसूत्रीवर काम करीत आहेत. अपंगांना तीन चाकी सायकल भेट देणे, रोजगाराच्या अपेक्षेने आलेल्या युवावर्गास शक्य त्या ठिकाणी रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, परिस्थितीअभावी शिक्षण घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात सवलत मिळवून देणे किंवा प्रसंगी शुल्क भरण्यास मदत करणे, पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळवून देणे, अशी कामे गोरे यांनी केली आहेत.

हेही वाचा… राजकारणापासून दूर राहण्याची माधवराव मोरे यांची भूमिका कायम चर्चेत

धुळे जिल्हा रुग्णालयात रुग्णांसाठी चाक असलेल्या खुर्च्या मिळत नसल्याचे लक्षात आल्यावर गोरे यांनी भेट म्हणून खुर्च्या दिल्या. विद्यार्थिनींना स्वसंरक्षणासाठी अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये त्यांनी उपक्रम सुरु केले. महाविद्यालयांमध्ये टवाळखोरांना धडा शिकविण्यासाठी विद्यार्थिनींचा माँ जिजाऊ युवती कट्टा तयार केला. गोरगरीबांसाठी प्रत्येक दिवाळीत होणारा त्यांचा “एक करंजी लाख मोलाची” उपक्रमही लोकप्रिय आहे. हिवाळ्यात स्वेटर वाटप करणे, शालेय विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्यांचे वाटप, युवा जल्लोष, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आदित्य महोत्सव सप्ताहातंर्गत विविध सामाजिक कार्यक्रम, रोपवाटप, गुणवंतांचा सत्कार, वृक्ष संरक्षणासाठी पिंजऱ्यांचे वाटप असे कार्यक्रमही जोडीला आहेतच. दरवर्षी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिर ते घेत असतात. करोना काळातील त्यांचे कामही विशेष उल्लेखनीय राहिले. या काळात वाहन उपलब्ध होत नसल्याने अडलेल्या २५० पेक्षा जास्त गर्भवतींना वाहन उपलब्ध करणे, १८०० कुटुंबियांना किराणा संचाचे वाटप, एक हजार जणांना दररोज मोफत जेवण, शिवसेना कार्यालयात लसीकरण केंद्र सुरू करणे, २० हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच लस उपलब्ध करून देणे, अशी कामे त्यांनी केली.

हेही वाचा… भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे उद्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर

सिध्दिविनायक न्यासाच्या वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून प्रत्येकी २५ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्यही गरजू रुग्णांना गोरे यांनी उपलब्ध करून दिले. धुळ्यातील श्री एकवीरा देवी मंदिराच्या सुशोभिकरणासाठी माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून तीन कोटी रुपये मंजूर करणे असो, किंवा आदित्य ठाकरे यांच्याच माध्यमातून जिल्ह्यासाठी आठ व्हेंटिलेटर आणि आठ बायपॅक यंत्रे जिल्हा रुग्णालयाला उपलब्ध करून देणे असो, गोरे हे नेहमीच धुळेकरांच्या मदतीला धावून जात असतात. शैक्षणिक-आरोग्य-सामाजिक क्षेत्रात दहा वर्षांपासून केलेल्या कार्याच्या आधारावर २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी तयारी सुरू केली होती. आता २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत धुळे शहर विधानसभा मतदारसंघासाठी ठाकरे गटाकडून इच्छुकांपैकी ते एक असतील हे निश्चित.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pankaj gore highly educated and active political member of shiv sena print politics news asj
First published on: 04-11-2022 at 09:56 IST