वसंत मुंडे

भाजपने विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्यानंतर पंकजा मुंडे यांनी ‘मौन’ धारण केले असून समर्थक आक्रमक झाले आहेत. कार्यकर्ते थेट पक्ष नेतृत्वाच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा बीडमध्ये दोन ठिकाणी ताफा अडवून निषेधाच्या घोषणा दिल्या. पक्षांतर्गत दोन नेत्यांमधील वादाचे रस्त्यावरील संघर्षात रुपांतर झाले आहे. जिल्ह्यातील भाजपच्या प्रमुख नेत्यांनी मात्र यावेळी काहीशी सावध भूमिका घेतली आहे. इतर जिल्ह्यात आत्मक्लेष, मोर्चे काढून समर्थकांनी आपला राग व्यक्त केला आहे. त्यामुळे पंकजांचे मौन आणि समर्थकांच्या संतापाबाबत पक्ष नेतृत्व नेमकी काय भूमिका घेते, याकडे आता लक्ष आहे.

Raj Thackeray, mahayuti support
राज ठाकरे यांच्या भूमिकेत कायमच सातत्याचा अभाव
raju shetty allegations against dhairyasheel mane over development work
खासदारांचे विकासकामात गौडबंगाल, इतरांची कामे आपल्या नावावर खपवली; राजू शेट्टी यांचा धैर्यशील माने यांच्यावर आरोप
Arvind Kejriwal Arrest
अरविंद केजरीवालांच्या अटकेचा फायदा आम आदमी पक्षाला की भाजपाला? जाणून घ्या, त्यामागचे राजकारण
anna hazare arvind kejriwal
अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “हा माणूस कधी…”

बीड जिल्ह्यातील भाजपचे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी चाळीस वर्षाच्या राजकीय संघर्षातून पक्षाला जिल्ह्यासह राज्यात सत्ताधारी पक्ष करण्यात मोठे योगदान दिले. सात वर्षापूर्वी त्यांच्या निधनानंतर मुलगी पंकजा मुंडे यांना राजकीय वारसा म्हणून भाजपच्या सत्तेत प्रमुख चार खात्याच्या मंत्रिपदाचीही संधी मिळाली. तर खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना दुसऱ्यांदा संधी मिळाली. मात्र, प्रदेश स्तरावरील अंतर्गत संघर्षातून देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यातील राजकीय वाद अनेकदा समोर आला.

परळी विधानसभा मतदारसंघात यावेळी पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर पंकजा यांनी विरोधकांना पक्षाच्याच नेत्यांनी रसद पुरवल्याचा आरोप करत पराभव देवेंद्र फडणवीस यांच्या माथी मारला. तेव्हापासून दोघांमधील राजकीय वाद वाढत गेला. दोन वर्षापूर्वी विधान परिषदेवर पंकजा यांच्याऐवजी पक्षाने मुंडे समर्थक रमेश कराड तर राज्यसभेवर डॉ. भागवत कराड यांना संधी देऊन थेट केंद्रीय मंत्री केले. यामुळे पंकजा यांना पक्षात डावलले जात असल्याचा आरोप करत समर्थकांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्याविरुध्द समाजमाध्यमातून टीकेची झोड उठवली. यावेळी गोपीनाथगडावरुन संधी मिळाली तर सोने करील, आपण विधान परिषदेवर जावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र ऐनवेळी विधान परिषदेची उमेदवारी नाकारली गेल्यानंतर समर्थकांमधून नेहमीप्रमाणे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. पंकजा यांनी यावर कोणतेही भाष्य न करता किंवा माध्यमांना कसलीही प्रतिक्रिया न देता मौन धारण केल्याने त्या नाराज असल्याचा कयास बांधला जात आहे.

समर्थकांमधून प्रदेश नेतृत्वाविरुध्द आरोपांची राळच उठली आहे. बीड जिल्ह्यातील पंकजा समर्थकांनी काहीसा सावध पवित्रा घेत शांत राहण्याचा प्रयत्न केला. काहींनी थेट नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेसमोर दुग्धाभिषेक करून नाराजीला वाट मोकळी केली. पाथर्डीत एका समर्थकाने माध्यमांसमोरच विषप्राशन केले. औरंगाबादमध्ये कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जालन्यात आत्मक्लेष आंदोलन करण्यात येत आहे. रविवारी बीडमध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा ताफा अडवून पंकजा समर्थकांनी निषेधाच्या घोषणा देत आपला संताप व्यक्त केला. त्यामुळे पक्षांतर्गत राजकीय वाद आता चव्हाट्यावर आला आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनीही पक्षांतर्गत स्पर्धेत दोन वेळा सर्व पदांचा राजीनामा देण्याची घोषणा करून बंड केले होते. मात्र वेळीच आपली नाराजी परत घेऊन पक्ष नेतृत्वाबरोबर जुळवून घेतले होते. पण पंकजा मुंडे यांचे मौन आणि कार्यकर्ते नेतृत्वाविरुध्द थेट रस्त्यावर उतरून रोष व्यक्त करत असल्याचे पहिल्यांदाच घडत आहे. दोन दिवसांनी माझी भूमिका जाहीर करेल असे सांगून पंकजा यांनी उत्सुकता वाढवल्याने माध्यमातून आणि कार्यकर्त्यांतून सोयीने प्रतिक्रिया उमटत आहेत.