छत्रपती संभाजीनगर – परळीतील राजकारण चार दशकांपासून “अन्य” पेक्षा “मुंडे” आडनावाच्या भोवती फिरते राहिलेले असून, परस्परांचे विरोधक आणि प्रतिस्पर्धी म्हणूनच त्यांची आजपर्यंतची ओळख राहिली आहे. परंतु सत्तेच्या सारीपटावर तीन मुंडे महायुतीतील तीन पक्षांमधील प्रमुख नेते म्हणून एकत्र आले असून, त्यामागे ओबीसींचे बळ दाखण्याची अपरिहार्यता व सामंजस्याने पूरक राजकारण करून आपआपले गड राखण्याचा धोरणी मार्ग पत्करल्याचे मानले जात आहे.
राज्यात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन उभे राहिल्यानंतर मराठा व ओबीसींमधील वादाची दरी रुंदावत गेली. ओबीसींमधूनच मराठा समाजाला आरक्षण मिळवून देईन, या मनोज जरांगे यांच्या भूमिकेला विरोध म्हणून ओबीसी नेतेही मतभेद विसरून एकत्रित येऊ लागले. त्याचे उदाहरण परळीतील पंकजा मुंडे, धनंजय मुंडे व प्रा. टी. पी. मुंडे यांचे अप्रत्यक्षपणे एकत्रित येणे. पंकजा मुंडे या भाजपमधील तर धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसमधील (अजित पवार) नेतृत्व. प्रा. टी. पी. मुंडे यांचा भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस, असा पक्षांतराचा प्रवास झाला आहे. जरांगेंच्या आंदोलनानंतर टी. पी. मुंडे ओबीसी महासंघात गेले. आता त्यांनी नुकताच एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत परभणीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला.
टी. पी. मुंडेंचा शिंदे सेनेतील प्रवेश हा परळीमध्ये महायुती आणि त्यातही स्थानिक पातळीवर ओबीसी मतपेढी मजबूत असल्याचा संदेश देण्यासह मुंडे भावंडांसारखेच “सामंजस्य करारा”चे राजकारण करून आपला गड राखण्यासाठीचे पाऊल मानले जाते. त्याचे उदाहरण म्हणजे परळीत नगरसेवकपदाच्या निवडणुकीत प्रा. टी. पी. मुंडे यांची कन्या राजेश्री मुंडे-गित्ते या प्रभाग ११ मधून बिनविरोध निवडून आल्या असून, महायुतीतून शिंदे शिवसेनेला सोडलेल्या अवघ्या दोन जागांपैकी एक जागा जयश्री मुंडेंच्या रुपाने बिनविरोध निघाली आहे.
टी. पी. यांची तीन दशकांपासूनची ओळख दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे विरोधक म्हणूनच परळीत राहिलेली आहे. गोपीनाथ मुंडेंना विरोध म्हणून परळीकरांनी टी. पी. मुंडे यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्यांना नगरपालिका निवडणूकीत कौल दिलेला आहे. टी. पी. मुंडे यांच्या राजकारणाचा श्रीगणेशा तसा गोपीनाथ मुंडे यांचे बोट धरूनच झालेला आहे. गोपीनाथ मुंडे यांनी टी. पी. यांना जयदत्त क्षीरसागर यांच्या विरोधात तत्कालीन चौसाळा विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी दिली होती. पुढे दोन्ही मुंडेंमध्ये फाटले. तेव्हापासून टी. पी. यांनी गोपीनाथ मुंडे यांचे विरोधक म्हणूनच राजकारण सुरू ठेवले. गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात टीपींनी विधानसभा लढवून ६५ हजारांपर्यंत मते घेतल्याचा इतिहास आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात धनंजय मुंडे यांनी भूमिका घेतल्यानंतर मात्र कडवे विरोधक म्हणून ओळख असलेले टीपी काहीसे मागे पडत गेले. दरम्यान ते काँग्रेसमध्ये गेले. स्वतःचे राजकारण, संस्था जपण्याची त्यांची खटपट सुरूच राहिली. टीपी व धनंजय मुंडे यांच्यातही मधल्या एका काळात विरोधकाचे राजकारण राहिले. पंकजा मुंडे व धनंजय मुंडे या भावंडांमधील लढाई तर २०१४ व २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राने पाहिली. त्यात २०१४ ची निवडणूक गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतरची होती. पंकजा मुंडे सहानभूतीच्या लाटेवर निवडून आल्या असल्यातरी त्यांचे मताधिक्य घटलेले होते. २०१९ च्या निवडणुकीत मात्र धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला.
राज्यात सत्तासमीकरणे बदलल्यानंतर आणि भाजप, राष्ट्रवादी व शिवसेना (शिंदे) महायुती सत्तेत एकत्रित बसल्यानंतर मुंडे भावंडही अपरिहार्यता म्हणून एकत्रित दिसू लागले. मराठा-ओबीसी वादाच्या पार्श्वभूमीवर वैयक्तिक मतभेद सोडून ओबीसी मतपेढी मजबूत करण्यासाठी मुंडे भावंडे एकत्र आले. त्यांना त्यांच्या घराण्याचे विरोधक राहिलेले टी. पी. मुंडेही पालिका निवडणुकीच्या तोंडावरच मिळाले आहेत. दोघांच्या पक्षात न जाता टी. पी. यांनी शिंदे सेनेची वाट धरली आहे.
