पुणे : मावळ लोकसभा मतदार संघात २०१९ मध्ये निवडून येवून राजकारणाचा श्रीगणेशा करण्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ज्येष्ठ चिरंजीव पार्थ पवार यांचे स्वप्न भंग पावल्याने गेल्या पाच ते सहा वर्षांपासून राजकारणापासून दूर असणारे पार्थ पवार हे पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांनी आता नागरिकांशी गाठीभेटी घेत लोकसंपर्काला सुरूवात केल्याने अजित पवार यांचा राजकारणाचा वारसा पार्थ पवार यांच्याकडे देण्याच्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
पार्थ पवार यांचा सक्रिय राजकारणाचा प्रारंभ हा मावळ लोकसभा मतदार संघात पराभवाने झाला. अजित पवार यांचे प्राबल्य असलेल्या पिंपरी – चिंचवड परिसरातील मावळ लोकसभा मतदार संघात २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पार्थ पवार यांचा पराभव झाला. त्यामुळे त्यांना राजकारणात आणण्याचे अजित पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे स्वप्न भंगले. तेव्हापासून पार्थ पवार हे विजनवासात होते. नुकत्याच उघडकीस आलेल्या मुंढवा जमीन विक्री प्रकरणानंतर ते चर्चेत आले. अजित पवार यांच्या निधनानंतर पार्थ पवार हे पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाल्याचे दिसून येऊ लागले आहेत. नागरिकांशी संवाद साधणे, राजकीय व्यक्तींच्या गाठीभेटी घेत आहेत.
दर रविवारी बारामती दौऱ्याची प्रथा
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे आठवड्यातील सहा दिवस राज्यभर दौऱ्यावर असायचे. मात्र, रविवारचा एक दिवस ते बारामतीसाठी द्यायचे. बारामतीत दर रविवारी ते नागरिकांच्या भेटी घेण्याबरोबरच सुरू असलेल्या प्रकल्पांची पाहणी करायचे. या पाहणी दौऱ्यामध्ये संबंधित अधिकारीही असायचे. एखाद्या ठिकाणी जावून पाहणी करताना त्रूटी आढळल्यास त्याविषयी ते अधिकाऱ्यांना जाब विचारायचे. त्यामुळे विकासकामे करताना अधिकारीही सतर्क असायचे. बारामतीत विकासकामे करताना त्याचा दर्जा चांगला राहील, याकडे अजित पवार यांना कटाक्ष असायचा. मात्र, त्यांच्या अकाली निधनानंतर बारामतीतील अजित पवार यांचे दौरे थांबले.
अजित पवार यांच्या कामाची ही प्रथा आता पार्थ पवार यांनी सुरू केली आहे. रविवारी पार्थ पवार यांनी बारामतीतील विकासकामांचा पहिला पाहणी दौरा केला. कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांनी बारामतीतीत विकास कामांची पाहणी केली. वन विभागातील बटरफ्लाय गार्डन, ॲडव्हेंचर पार्क आणि काम सुरू असलेल्या ‘शिवसृष्टी’ प्रकल्पाची पाहणी केली. त्यावेळी अजित पवार यांच्या प्रमाणेच त्यांनीही प्रत्येक प्रकल्पाबाबत माहिती घेतली. त्यामुळे पार्थ पवार हे आता पुन्हा राजकारणात सक्रिय झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
संधी मिळणार का ?
सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्री पदी नियुक्ती झाल्यामुळे राज्यसभेत एक जागा रिक्त झाली आहे. या ठिकाणी पार्थ पवार यांना संधी मिळणार का? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे बारामती विधानसभा मतदार संघात पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे. या निवडणुकीचीही प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू झाली आहे.

