पुणे : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचा सक्रिय राजकारणाचा प्रारंभ हा मावळ लोकसभा मतदार संघात पराभवाने झाल्यानंतर गेल्या पाच ते सहा वर्षांत ते विजनवासात होते. मात्र, मुंढवा येथील जमीन प्रकरणानंतर ते पुन्हा प्रकाशझोतात आले. अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांनी हाताळलेली कौटुबिक परिस्थिती पाहून पार्थ पवार यांच्याकडे आता प्रगल्भ व्यक्तिमत्त्व म्हणून पाहिले जाऊ लागले आहे. मातोश्री सुनेत्रा पवार या राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या जागी दिल्लीत राज्यसभेत खासदार म्हणून जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
पिंपरी-चिंचवडचा परिसर हा अजित पवार यांचे प्रभुत्त्व असलेला परिसर असल्याने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पार्थ पवार यांनी मावळमधून निवडणूक लढविली. मात्र, त्यांचा निभाव लागला नाही. त्यांचा सुमारे दोन लाखांच्या मताधिक्याने पराभव झाला. या पराभवानंतर पार्थ पवार हे राजकीय विजनवासात होते. या निवडणुकीनंतर ते सक्रिय राजकारणात दिसले नाहीत. मात्र, मुंढवा जमीन प्रकरणानंतर ते पुन्हा चर्चेत आले. त्यांना वाचविण्यासाठी अजित पवार यांना प्रयत्न करावे लागले. मात्र, आता त्यांच्या निधनानंतर कौटुंबिक आणि राजकीय अशा दोन्ही पातळ्यांवर पार्थ पवार यांच्यावर जबाबदारी पडली आहे. त्या अर्थाने त्यांचे राजकीय भवितव्य हे निर्णायक वळणावर आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांची कौटुंबिक पातळीवर प्रगल्भता दिसून आली. आता राजकीय महत्त्वाकांक्षा आणि ती पूर्ण करण्यासाठी ते कोणता निर्णय घेणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
दिल्लीत की राज्यात ?
सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्री पदी नियुक्ती झाल्यामुळे राज्यसभेत एक जागा रिक्त झाली आहे. तसेच अजित पवार यांच्या निधनामुळे बारामती विधानसभा मतदार संघात पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे. यापैकी एका ठिकाणी जाण्याचा निर्णय पार्थ पवार हे घेणार का, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
बारामती विधानसभा मतदार संघात गेल्या निवडणुकीत अजित पवार यांच्याविरोधात युगेंद्र पवार यांनी निवडणूक लढविली होती. सद्य:स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या दोन्ही ‘राष्ट्रवादी’ एकत्र येण्याची शक्यता नसल्याने बारामतीत पोटनिवडणुकीत कोण उमेदवार असणार, याबाबत पवार कुटुंबाला निर्णय घ्यावा लागणार आहे. या जागेवर पार्थ पवार यांनी दावा केल्यास पवार कुटुंबासमोर पुन्हा एकदा प्रश्न उभा राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याबाबतचा निर्णय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या घेतील, असे अजित पवारांच्या ‘राष्ट्रवादी’तील नेत्यांकडून सांगण्यात आलेे,
पार्थ पवार यांनी बारामतीतील जागेवर दावा केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून कोणती भूमिका घेतली जाणार, याकडे सर्वांचे नजर असणार आहे.

