Manoj Jarange-Patil Interview: मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. मागच्या वर्षी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे आरक्षणासाठी उपोषण करत असताना पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर जरांगे पाटील चर्चेत आले होते. विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेनंतर काही उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरले होते. मात्र, आदल्या रात्री जरांगे पाटील यांनी सांगितल्यानंतर अर्ज मागे घेण्यात आले. आम्ही कोणत्याही उमेदवारांना पाठिंबा देणार नाही, अशी घोषणा केल्यानंतर मनोज जरांगे यांच्या मनात नेमके काय आहे? याबाबत आता चर्चा सुरू आहे.
विधानसभा निवडणुकीत जरांगे पाटील यांची नेमकी भूमिका काय? याबद्दल द इंडियन एक्स्प्रेसने त्यांच्याशी संवाद साधला. जरांगे पाटील यांच्या भूमिकेचा लाभ मविआला होणार की महायुतीला? याबाबतचेही प्रश्न त्यांना विचारण्यात आले. जरांगे पाटील यांनी मांडलेली भूमिका प्रश्नोत्तराच्या स्वरुपात खालीलप्रमाणे…
प्र. विधानसभा निवडणुकीत कोणत्याही उमेदवारांना पाठिंबा देणार नाही, अशी भूमिका अचानक का मांडली?
केवळ एका जातीच्या पाठिंब्यावर निवडणूक लढविता येणार नाही, हे आम्हाला लक्षात आले. मराठा, मुस्लीम आणि दलित हे तीन घटक एकत्र आल्यास विजय मिळविता येऊ शकतो. मी या घटकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला, पण त्यात मला यश आले नाही. ३० ऑक्टोबर रोजी आमची या घटकांच्या नेत्यांशी शेवटची चर्चा झाली. तेव्हा मला जाणवले की, यातून काही निष्पन्न होत नाही. मग जर समाजालाच फायदा होणार नसेल तर निवडणूक लढवून काय उपयोग, याची मला जाणीव झाली.
मी ज्यांना उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितले होते, त्या सर्वांना सांगेल तेव्हा अर्ज मागे घ्यावे लागतील, अशी अट आधीच घातली होती.
प्र. तुम्हाला एक फोन आल्यानंतर तुम्ही निर्णय बदलला असे बोलले जाते, तो कुणाचा फोन होता?
मला कुणाचाही फोन आला नाही. केंद्र सरकारकडे यंत्रणा आहेत. त्यांनी या दाव्याची चौकशी करावी. उमेदवार मागे घेणे हा माझा वैयक्तिक निर्णय होता.
प्र. तुमच्या निर्णयाचा लाभ कुणाला होईल?
कुणाला लाभ होणार आणि कुणाचे नुकसान होणार हा विषय माझ्यासमोर नाही. मविआ किंवा महायुतीला काय तोटा किंवा नुकसान होईल, यावर मी माझे निर्णय घेत नाही; मी राजकारणात नाही.
प्र. तुमच्या मताप्रमाणे मराठा समाजातील सर्वात मोठा नेता कोणता?
मराठा समाज हाच मोठा नेता आहे. जे समाजातील गरीब आणि वंचित घटक आहेत, तेच समाजाचे नेते आहेत.
प्र. तुमचे शरद पवारांशी चांगले संबंध आहेत, असे बोलले जात आहे?
कोण म्हणाले?
हे ही वाचा >> योगी आदित्यनाथांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’शी अजित पवार सहमत? म्हणाले, “तडजोडी…”
प्र. शरद पवार आज राज्यातील सर्वात ज्येष्ठ नेते आहेत.
मग त्यांनी मराठा समाजाला आरक्षण का नाही दिले? भाजपानेही आरक्षण दिले नाही.
प्र. पण, भाजपा विरोधही करत नाही
ते आरक्षण देत नाहीत आणि विरोधही करत नाहीत. त्यांनी मध्येच टांगत ठेवले आहे.
प्र. एकनाथ शिंदेंबाबत काय?
ते सर्व सारखेच आहेत.
प्र. आणि देवेंद्र फडणवीस</strong>
ते चांगले व्यक्ती नाहीत. मराठा, मुस्लीम, वंजारी, लिंगायत किंवा धनगर समाजाला आरक्षणाचा लाभ मिळू नये, असे त्यांना वाटते.
प्र. म्हणजे मराठा समाजाचे नेते नायक नसून ते काहीच कामाचे नाहीत, असे म्हणायचे?
मी मघाशी म्हणालो तसे, कोणताही मराठा नेता हा प्रमुख नसून मराठा समाज हाच नायक आहे. जर नेता असेलच तर छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव नेते आहेत.
प्र. आता तुम्ही पुढे काय करणार?
आमचे आंदोलन सुरूच राहणार. ते थांबणार नाही. मी पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहे. फक्त सध्या तारीख जाहीर करत नाही आहोत. आचारसंहिता संपल्यानंतर आम्ही आमची भूमिका जाहीर करू. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर त्या सरकारला आव्हान देणारा मनोज जरांगे पाटील हा पहिला व्यक्ती असेल. मग ते सरकार मविआचे असो किंवा महायुतीचे.
प्र. तुमच्या मागण्या मान्य करण्यासाठी राजकारणात प्रवेश करणे हा एक मार्ग आहे, असे तुम्हाला वाटत नाही का?
माझ्या माहितीप्रमाणे, तब्बल दोन कोटी मराठ्यांना आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. हे फक्त आंदोलनामुळेच होऊ शकेल. मी हे करू शकतो. आतापर्यंत ५७ लाख लोकांना ते कुणबी असल्याचे प्रमाणपत्र मिळाले आहे.
प्र. भविष्यात राजकारणात जाण्याबाबत काय विचार आहे?
भविष्याबाबत कोणीच काही सांगू शकत नाही. माझा जीव आरक्षणात फसला आहे. जेव्हा आरक्षणाचा प्रश्न सुटेल, तेव्हा पाहीन काय करायचे आहे ते?
प्र. आगामी विधानसभा निवडणुकीत काय होईल? तुम्हाला काय वाटते?
मराठा समाज ज्यांच्याकडे जाईल, त्यांचे पारडे जड असेल; हे तुम्हाला निकालानंतर समजेल.
प्र. याचा अर्थ मराठा एकगठ्ठा मतदान करणार?
जे आरक्षणाचे आश्वासन देतील, त्यांच्या बाजूनेच मराठा समाज मतदान करेल. मला वाटते कोणत्याही राजकीय पक्षाने अद्याप याबाबत काही ठरविलेले नाही. मला वाटते, काही राजकीय पक्ष हे जाहीर करतील. जर कुणीही आम्हाला मतदानापूर्वी आश्वासन दिले नाही तर आम्ही त्यांना सत्तेत येऊ देणार नाही.
प्र. जर तुम्हाला आश्वासन मिळाले नाही, तर तुम्ही प्रत्येकाचा पराभव करणार?
नाही हे होणार नाही. प्रत्येक जण आरक्षणाच्या बाजूने असल्याचे सांगत आहे. पण, आरक्षण दिले तर आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या वर जाईल. आमची मागणी आहे की, ५० टक्क्यांच्या आतच मराठ्यांना सामावून घेतले जावे. जेणेकरून पुन्हा मराठ्यांच्या आरक्षणाला आव्हान दिले जाणार नाही. मराठा हे कुणबी आहेत. त्यामुळे सध्या ओबीसींना असलेल्या २७ टक्के आरक्षणातच मराठ्यांना सामावून घेतले पाहिजे.
प्र. पण, ओबीसी समाज मराठ्यांना सामावून घेण्यास विरोध करत आहे.
मंडल आयोगाचा निर्णय होईपर्यंत १८८४ पासून आम्ही ओबीसींमध्येच होतो. हैदराबाद गॅझेटनुसार आम्ही सर्व कुणबी आहोत आणि हे ओबीसींनाही माहीत आहे.