प्रणिती शिंदे यांच्यापुढे पक्ष बांधणीचे आव्हान | Party build up challenge Praniti Shinde print politics news ysh 95 | Loksatta

प्रणिती शिंदे यांच्यापुढे पक्ष बांधणीचे आव्हान

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षा, आमदार प्रणिती शिंदे यांनी महाराष्ट्रासह तामीळनाडू, राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि काश्मीर अशा सहा राज्यांमध्ये भारत जोडो यात्रेत सक्रिय सहभाग घेतला होता.

praniti shinde
प्रणिती शिंदे यांच्यापुढे पक्ष बांधणीचे आव्हान

एजाज हुसेन मुजावर

सोलापूर : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नुकतीच काश्मीरमध्ये समाप्त झाली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षा, आमदार प्रणिती शिंदे यांनी महाराष्ट्रासह तामीळनाडू, राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि काश्मीर अशा सहा राज्यांमध्ये भारत जोडो यात्रेत सक्रिय सहभाग घेतला होता. अकोला जिल्ह्यात तर भारत जोडो यात्रेच्या नियोजनाची जबाबदारी त्यांनीच सांभाळली होती. आता काँग्रेस पक्षाच्या बांधणीचे आव्हान कायम आहे. आमदार प्रणिती शिंदे यांच्या सोलापूर शहर व जिल्ह्यात तर पक्ष दिवसेंदिवस कमकुवत होत आहे. त्यामुळे पक्ष सावरण्याची शिंदे यांनाच पार पाडावी लागणार आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा २०१४ अणि २०२९ अशा लागोपाठ दोनवेळा पराभूत झाल्यानंतर अक्कलकोट दक्षिण सोलापूर हे हक्काचे विधानसभा मतदारसंघही पक्षाच्या ताब्यातून निसटून भाजपच्या वर्चस्वाखाली आले आहेत. प्रणिती शिंदे यांचा सोलापूर शहर मध्य हाच एकमेव विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात राहिला आहे. शेजारच्या मोहोळ राखीव मतदारसंघातही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी आमदार राजन पाटील-अनगरकर यांचे राजकीय भवितव्यही टांगणीला लागले आहे. सोलापूर शहर उत्तर, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर आणि पंढरपूर-मंगळवेढा या चार विधानसभा मतदारसंघांवर भाजपची पकड काँग्रेस व राष्ट्रवादीसह उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने संयुक्तपणे प्रयत्न केले तरच कमी होऊ शकेल, असे राजकीय जाणकारांचे निरीक्षण आहे.

हेही वाचा >>> कर्नाटक निवडणुकीत पुन्हा त्रिशंकू परिस्थिती? काँग्रेस आणि भाजपाची कुमारस्वामींवर नजर

आगामी लोकसभा निवडणूक सोलापूरमधून लढविणार नसल्याचे सुशीलकुमार शिंदे यांनी यापूर्वीच जाहीर केले असले तरी स्थानिक राजकीय परिस्थिती पाहता भाजपच्या ताब्यातून सोलापूरची खासदारकी पुन्हा काढून घेण्यासाठी सुशीलकुमारांसारखा एकही तोलामोलाचा नेता काँग्रेसकडे नाही. त्यामुळेच युवक काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी सुशीलकुमारांना साकडे घातले आहे. यात सुशीलकुमारांचा नकार कायम राहणार की खरोखर ते पुन्हा लोकसभेच्या निवडणूक मैदानात उतरणार, यावर बरेच काही अवलंबून आहे.

लोकसभेसाठी चर्चा

दुसरीकडे लोकसभेसाठी सुशीलकुमारांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांच्याही नावाची चर्चा आहे. परंतु त्या खरोखरच लोकसभा निवडणूक लढविणार की आणखी दुसराच निर्णय घेणार, याविषयीचीही उत्सुकता आहे. काँग्रेसला भारत जोडो यात्रेमुळे नव्याने उभारी घेण्याची आशा निर्माण झाली आहे. त्यात हेतूने हात से हात जोडो अभियान पक्षाने हाती घेतले आहे. परंतु सोलापूर शहर व जिल्ह्यात हे अभियान यशस्वी करताना स्थानिक नेतृत्वाची कस लागणार आहे. स्थानिक नेतृत्व म्हणजे दुसरे तिसरे कोणी नाही तर आमदार प्रणिती शिंदे याच आहेत. हात से हात जोडो अभियानाच्या नियोजनासाठी बैठका घेताना पक्षातील वाद-विवाद समोर येत आहेत. शहरात पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा चेतन नरोटे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. नरोटे हे शिंदे कुटुंबीयांशी एकनिष्ठ मानले जातात. परंतु तरीही त्यांच्या नेतृत्वाला शहरभर मजल मारता येईल, अशी स्थिती नाही. रामलाल चौक, मुरारजी पेठेच्या पलिकडे नरोटे यांचा प्रभाव पडत नाही.

हेही वाचा >>> सांगली: तासगाव-कवठेमहांकाळमध्ये तिहेरी संघर्ष

तर दुसरीकडे अकलूजच्या मोहिते-पाटील घराण्यातील धाकटी पाती असलेल्या दिवंगत माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र धवलसिंह मोहिते-पाटील हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद सांभाळत आहेत. परंतु त्यांच्यात पूर्वीसारखा उत्साह आता दिसत नाही. यातच तालुका पातळीवर पदाधिकारी नियुक्त करताना निर्माण झालेले मतभेद धवलसिंह यांच्यासाठी डोकेदुखी ठरले आहेत. तालुक्यात पदाधिकारी नियुक्त करताना सुशीलकुमार शिंदे यांना हस्तक्षेप करावा लागल्याचे बोलले जाते. म्हणजेच येथे पुन्हा सुशीलकुमार शिंदे विरूद्ध मोहिते-पाटील अशी वादाची जुनी किनार पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे. यात शेवटी काँग्रेस पक्षाची बांधणी, ताकद वाढविण्याचे आव्हान कायम राहते. आता पक्षाच्या प्रदेश कार्याध्यक्षा म्हणून आमदार प्रणिती शिंदे यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. अलिकडे त्यांनी पक्षापासून दूर गेलेल्या माजी आमदार दिलीप माने व इतरांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे. पक्षापासून दूर गेलले माजी महापौर महेश कोठे, ॲड. यू. एन. बेरिया, तौफिक शेख, सुधीर खरटमल, नलिनी चंदेले या विरोधकांशी बेरजेचे राजकारण करून पुन्हा सन्मानाने घरवापसी होऊ शकते.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-02-2023 at 12:15 IST
Next Story
सांगली: तासगाव-कवठेमहांकाळमध्ये तिहेरी संघर्ष