नागपूर : गेल्या शुक्रवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसाने महापालिकेत सलग १५ वर्षे सत्तेत असलेल्या भाजपचे शहर नियोजनाचे पितळे उघडे पडले. परंतु पुराचा धोका उदभवण्याच्या कारणांची मिमांसा करून त्यावर तोडगा काढण्यापेक्षा सत्ताधारी आणि विरोधक पक्षीय राजकारणात मुश्गुल झाल्याचे चित्र आहे. मुसळधार पाऊस झाल्याने अंबाझरी तलावातून विसर्ग अचानक वाढला. तलावातून बाहेर पडलेले पाणी नाल्याव्दारे पुढे जात असताना त्या मार्गातविकासाच्या नावावर निर्माण केलेले अडथळे हजारो नागपूरकरांच्या घरांच्या साहित्याची नासधूस करण्यास कारणीभूत ठरले. शहर नियोजनाच्या नावावर वाट्टेल ते सिमेंट काँक्रिटचे बांधकाम करण्यात आले. अंबाझरी 'ओव्हर फ्लो'च्या अगदी तोंडावरच सौंदर्यीकरण करण्यात आले. यामुळे अंबाझरी तलावाच्या विसर्गात पहिला अडथळा अगदी ५० फुटांवर तयार झाला. त्यानंतर दुसरा अडथळा क्रेझी कॅसल अक्वॉ पार्कमुळे निर्माण झाला आहे. येथे नाल्याची रुंदी कमी करण्यात आली. त्यानंतर जसे पुढे जावे तसे प्रत्येक ठिकाणी कुठेना कुठे नैसर्गिक प्रवाहात अडथळा निर्माण होऊ शकेल, असे सिमेंट काँक्रिटचे बांधकाम करण्यात आले आहे. मेट्रो स्तंभदेखील अंबाझरी तलावाच्या अगदी जवळ उभारण्यात आहे. त्याचा परिणाम या तलावाच्या भिंतीवर होणार आहे. त्यामुळे भविष्यातही धोका या वस्त्यांना कायम आहे. त्यावर तोडगा काढण्याबाबत गांभीर्यांने चर्चा करण्याचे सोडून सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षाने या मुद्यावर राजकारण सुरू केले. हेही वाचा - गहलोत-पायलट यांच्यात दिलजमाई; पण कार्यकर्त्यांमध्ये मनभेद कायम, काँग्रेससमोर आव्हान तलावा नजिकच्या १०० मीटर अंतरावरील वस्त्यांमध्ये पाणी शिरले. गेल्या पाच दशकांहून अधिक काळापासून असलेल्या वसाहतींमध्ये पहिल्यांदा पूरस्थिती निर्माण झाली. त्यामुळे साहजिकच या भागात राहणाऱ्या साधारणत: सधन वस्त्यांमध्ये नागरिकांना धक्का बसला. पूरस्थिती पाहण्यासाठी आलेल्या सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांवर त्यांनी संताप व्यक्त केला. नागरिकांचा रोष बघून सत्ताधारी हबकले आणि त्यांनी नागरिकांना शांत करण्यासाठी पदाधिकाऱ्यांना कामाला लावले. काही जुजबी मदत करून लोकांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू झाला. हेही वाचा - “काँग्रेस शहरी नक्षलवाद्यांद्वारे चालवली जाते”, पंतप्रधान मोदींची टीका; पण सरकारचे म्हणणे वेगळेच दुसरीकडे विरोधकांनी लोकांच्या रोषात सहभागी होऊन सत्ताधाऱ्यांवर आगपाखड सुरू केली. गेल्या पंधरा वर्षांपासून महापालिकेत, दहा वर्षांपासून केंद्रात आणि सात वर्षांपासून राज्यात सत्तेत असलेल्या पक्षावर विकासाच्या नावाने शहराचा बट्ट्याबोळ केल्याचा आरोप विरोधी पक्ष करू लागले आहेत. पूरग्रस्तांचे दैनंदिन जीवन पूर्वपदावर यायचे आहे. मात्र, पुरग्रस्तांच्या मागण्यांसाठी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने मोर्चा काढण्याची घाई केली. हा गट सत्तेत सहभागी आहे. पुराचा धोका हा मूळ प्रश्न असून मात्र पक्षीय राजकारण जोरात असल्याचे चित्र आहे.