एजाज हुसेन मुजावर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोलापूर : सोलापूर विमानसेवेच्या मागणीसाठी सुरू झालेले आंदोलन चिघळले आहे. विमानसेवेसाठी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सहवीज प्रकल्पाच्या चिमणीचा कथित अडथळा ठरत असल्यामुळे चिमणी पाडून टाकण्याचा विषयही प्रलंबित आहे. याच मुद्यावर सिद्धेश्वर साखर कारखान्याचे सर्वेसर्वा धर्मराज काडादी यांना लक्ष्य बनवून आंदोलन पेटविले जात आहे. या घडामोडीत सत्ताधारी भाजपसह इतर सर्व राजकीय पक्षांची भूमिका तटस्थ असतानाच भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख आणि धर्मराज काडादी यांच्यात कुरघोड्यांचे सुप्त युद्ध सुरू असल्याचे दिसून येते.

५० वर्षापूर्वी शहरातील होटगी रस्त्यावर दिवंगत नेते मडेप्पा बंडप्पा तथा अप्पासाहेब काडादी यांनी सिद्धेश्वर साखर कारखान्याची उभारणी केली होती. वीरशैव लिंगायत समाजासह इतर सर्व घटकांमध्ये दबदबा राहिलेले माजी खासदार अप्पासाहेब काडादी यांच्या पश्चात त्यांच्याच कुटुंबीयांकडे कारखान्याची सूत्रे चालत आली आहेत. त्यांचे पुत्र मेघराज, नातू धर्मराज आणि सध्या पणतू पुष्पराज याप्रमाणे सत्ताकारण सुरू आहे. प्रामुख्याने वीरशैव लिंगायत समाजाचे प्राबल्य असलेल्या सिद्धाराम साखर कारखान्याशिवाय सोलापूरचे ग्रामदैवत सिध्देश्वर मंदिर समितीही वर्षानुवर्षे काडादी घराण्याच्या ताब्यात आहे. या दोन्ही संस्था वीरशैव लिंगायत समाजाच्यादृष्टीने अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जातात. लिंगायत समाजाने काडादी घराण्यावर वेळोवेळी विश्वास दर्शविल्यामुळे या दोन्ही संस्थांपुरते तरी लिंगायत समाजात काडादी यांचे नायकत्व कायम राहिले आहे.

हेही वाचा: समीर राजूरकर : ध्येयनिष्ठ कार्यकर्ता

सोलापूर शहर उत्तरचे सलग चौथ्यांदा विधानसभेवर निवडून आलेले भाजपचे आमदार विजय देशमुख हे सुध्दा प्रतिष्ठित अशा देशमुख घराण्यातील आहेत. यापूर्वी तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये देशमुख हे सलग पाच वर्षे सोलापूरचे पालकमंत्री होते. शहरात भाजपवर त्यांची मजबूत पकड आहे. लिंगायत समाजाचाच प्रभाव राहिलेल्या आणि राज्यात चौथ्या क्रमांकावर असलेल्या सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीचे सभापतिपद आमदार विजय देशमुख हे सांभाळत आहेत. ही राजकीय चढती कमान पाहता त्यांची महत्त्वाकांक्षा आणखी वाढली आहे. त्यातूनच संपूर्ण लिंगायत समाजाचे नेतृत्व मिळविण्यासाठी त्यांची सुप्त धडपड सुरू आहे. तर दुसरीकडे धर्मराज काडादी यांनी राजकारणापासून सदैव दूर राहून समाजावर आपला पगडा कायम ठेवला आहे. आमदार विजय देशमुख हे भाजपच्या माध्यमातून राजकारणात यशस्वीपणे वाटचाल करीत असले तरी लिंगायत समाजाचे नेतृत्व मिळत नसल्याची त्यांच्या अंतर्मनात खंत आहे. त्यामुळेच देशमुख आणि काडादी यांच्यात अलिकडे काही वर्षापासून शीतयुद्ध सुरू आहे.

हेही वाचा: ही ‘राज’नीती मुंबईत कशी जिंकणार?

देशमुख यांच्या निकटच्या मंडळींपैकी काही जण विमानसेवा सुरू होण्याच्या प्रश्नावर सुरू असलेल्या आंदोलनात आघाडीवर आहेत. ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिर सुशोभीकरणासह बेकायदेशीर बांधकामाप्रकरणी काडादी यांच्यावर फौजदारी कारवाई होण्यासाठी देशमुख यांचे हितचिंतक असलेली मंडळीच पुढे सरसावत आल्याचे पाहायला मिळाले आहे. आमदार विजय देशमुख हेच त्यांचा बोलावता धनी असल्याची बाब लपून राहिली नाही.या पार्श्वभूमीवर होटगी रस्त्यावर जुन्या विमानतळावरून विमानसेवा सुरू होण्यासाठी गेल्या २२ दिवसांपासून सोलापूर विकास मंचच्या नावाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्री उपोषण सुरू आहे. आंदोलन चालविणारे केतन शहा यांनी महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या भेटीप्रसंगी धर्मराज काडादी यांचा थेट नामोल्लेख टाळून गुन्हेगार म्हणून संबोधले. त्यामुळे एरव्ही संयमी असणारे धर्मराज काडादी संतापले. त्यांनी आंदोलनस्थळी येऊन केतन शहा यांना जाब विचारत थेट पिस्तूल काढून दाखविली. त्यामुळे वातावरण तापले असून आंदोलन चिघळले आहे.

हेही वाचा: गुजरातमधील मराठी बहुल मतदारसंघांमध्ये अशोक चव्हाण यांच्या प्रचारसभा

काडादी यांच्या विरोधात शहा यांनी पोलिसांत तिसऱ्या दिवशीही फिर्याद दिली नाही. मात्र शहा यांच्या पाठीशी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी धावून आले आहेत. तर दुसरीकडे धर्मराज काडादी यांच्या बाजूने सिध्देश्वर साखर कारखान्याचे सर्व संचालकांसह कामगार आणि सुमारे २७ हजार शेतकरी सभासद एकत्र येऊन प्रतिआंदोलनासाठी पुढे सरसावले आहेत. आमदार विजय देशमुख हे विमानसेवा प्रश्नावर स्पष्ट भूमिका जाहीर करीत नाहीत. त्यांच्याच पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजी हे लिंगायत समाजातील लोकप्रतिनिधी काडादी यांच्या बाजूने आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादीसह अन्य पक्षाचे नेतेही काडादी यांच्या बाजूने आहेत. एवढेच नव्हे, तर भाजपचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी तर ‘ सिद्धेश्वर ‘ची चिमणी न पाडता विमानसेवा सुरू करण्याची भूमिका स्पष्ट केल्यामुळे या प्रश्नावर आमदार विजय देशमुख यांच्या दृष्टीने काडादी विरोधात पोषक असे अपेक्षित वातावरण भाजपमध्ये दिसत नाही.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Party politics started cold war between dharmraj kadadi vijaykumar deshmukh over aviation in solapur print politics news tmb 01
First published on: 30-11-2022 at 10:59 IST