पुणे : पुणे जिल्ह्यातील राजकारणातील महत्त्चाची संस्था असलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडीसीसी) निवडणूक प्रक्रियेच्या हालचाली सुरू झाल्या असून, भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) सलग दहा वर्षे सहकारी बँकांच्या संचालक पदावर असलेल्यांना निवडणुकीसाठी अपात्र ठरविण्याच्या निर्णयाचा जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांना फटका बसला आहे. राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, माजी आमदार रमेश थोरात आणि संग्राम थोपटे यांच्यासह विद्यमान अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे हे या निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडणार आहेत.
‘पीडीसीसी’ बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत दोन जानेवारी २०२७ रोजी संपणार आहे. त्यासाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहे. मात्र, यावेळच्या निवडणुकीतून जिल्ह्यातील प्रमुख नेते हे बाहेर असणार आहेत. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुमारे ३० वर्षे या बँकेचे संचालक होते. त्यांचे या बँकेवर प्राबल्य आहे. त्यांच्या निधनानंतर होणाऱ्या या निवडणुकीत अनेक दिग्गज नेते हे ‘आरबीआर’च्या नवीन नियमामुळे निवडणुकीसाठी अपात्र ठरणार आहेत. या बँकेचे २१ विद्यमान संचालक आहेत. त्यापैकी भरणे, वळसे-पाटील, थोरात, थोपटे, दुर्गाडे यांना पुन्हा निवडणूक लढविता येणार नाही. मात्र, पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप, शिरुरचे माजी आमदार अशोक पवार, खेड-आळंदीचे माजी आमदार दिलीप मोहिते यांना पुन्हा निवडणूक लढण्याची संधी आहे.
‘आरबीआय’चा नियम काय?
भारतीय रिझर्व्ह बँकेने सहकारी बँकांच्या संचालक मंडळातील एकाधिकारशाही मोडून काढण्यासाठी संचालकांच्या कार्यकाळाबाबत नियमावली लागू केली आहे. त्यानुसार बँकेच्या संचालक मंडळावर कोणतीही व्यक्ती सलग दहा वर्षांपेक्षा जास्त काळ संचालक म्हणून राहू शकणार नाही. दहा वर्षे पूर्ण झाल्यानंतर संबंधित संचालकाला पद सोडावे लागणार आहे. सलग दहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर संचालकाला किमान तीन वर्षांचा ‘कूलिंग ऑफ’ कालावधी म्हणजेच विश्रांतीचा काळ पूर्ण करणे बंधनकारक आहे. तीन वर्षांचा कालावधी संपल्याशिवाय संबंधित व्यक्ती पुन्हा त्याच बँकेच्या संचालकपदाची निवडणूक लढवू शकत नाही.
कुटुंबातील वारसदार की विश्वासू साथीदारांना संधी?
‘आरबीआय’च्या नवीन नियमामुळे निवडणूक लढवता येत नसल्याने संबंधित नेत्यांनी आतापासूनच वारसदारांचा शोध सुरू केला आहे. त्यांच्याकडून कुटुंबातील व्यक्तींना संधी दिली जाणार की, विश्वासू साथीदारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात येणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
भाजपही तयारीत
दिवंगत उपमुख्यमंत्री आजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली आजवर या बँकेच्या निवडणुका झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या दोन्ही ‘राष्ट्रवादीं’नी या बँकेच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाया मजबूत केला आहे. आगामी निवडणुकीत अजित पवार हे नसल्याने आणि प्रमुख नेते निवडणुकीच्या रिंगणात नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षापुढे आव्हान असणार आहे. भाजपचे पुणे जिल्ह्यात पाया भक्कम करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ‘राष्ट्रवादी’चे दिग्गज नेते निवडणुकीत नसल्याचा फायदा घेत भाजप या निवडणुकीत ताकदीने उतरण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने भाजपचीही तयारी सुरू झाल्याचे सांगण्यात आले.
