peaples are talking about strength of Gulabrao Patil in Jalgaon district print politics news pkd 83 | Loksatta

गुलाबराव पाटील यांचा प्रभाव केवळ जळगाव ग्रामीण मतदारसंघातच ?

गुलाबराव पाटील यांची राजकीय ताकद केवळ त्यांच्या जळगाव ग्रामीण या विधानसभा मतदारसंघापुरतीच मर्यादित आहे काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.

गुलाबराव पाटील यांचा प्रभाव केवळ जळगाव ग्रामीण मतदारसंघातच ?
गुलाबराव पाटील (संग्रहित छायाचित्र)

दीपक महाले

शिवसेनेत पडलेल्या फुटीचे पडसाद उत्तर महाराष्ट्रातही उमटले आहेत. माजी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह शिवसेनेचे चार आमदार आणि एक समर्थक अशा पाच आमदारांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला असला तरी सामान्य शिवसैनिक आणि जळगाव, धरणगाव तालुका वगळता इतर ठिकाणचे पदाधिकारी अजूनही उध्दव ठाकरेंच्या पाठिशी आहेत. त्यामुळे इतकी वर्षे शिवसेनेची बुलंद तोफ अशी ओळख असलेले गुलाबराव पाटील यांची राजकीय ताकद केवळ त्यांच्या जळगाव ग्रामीण या विधानसभा मतदारसंघापुरतीच मर्यादित आहे काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.

जळगाव तालुक्यातील शिवसेनेच्या जिल्हा उपसंघटकांसह जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सदस्य, सरपंच, उपसरपंच, अशा ६० जणांनी शिवसेनेतून बाहेर पडत शिंदे गटाला समर्थन दिल्यामुळे तालुक्याच्या सत्ता समीकरणाची गणिते बदलण्याची शक्यता आहे. या ६० पदाधिकार्‍यांनी शिंदे गटात सहभागी झालेले माजी मंत्री तथा आमदार गुलाबराव पाटील यांना समर्थन दिले आहे. या सर्वांनी जिल्हाप्रमुखांकडे आपापल्या पदाचा राजीनामा दिले. त्यामुळे जळगाव तालुक्यात शिवसेनेला खिंडार पडले. त्याआधी शनिवारीही धरणगाव तालुक्यातील काही पदाधिकार्‍यानी शिवसेनेचा राजीनामा देत शिंदे गटाला समर्थन दिले होते.

हेही वाचा- राज्यसभेतील कामकाज कमी झाल्याने मावळते उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू नाराज

गुलाबराव पाटील यांच्या समर्थनार्थ शिवसेनेच्या जळगाव आणि धरणगाव या तालुक्यांतील पदाधिकार्‍यांचे राजीनामासत्र सुरू आहे. गुलाबरावांचा जळगाव ग्रामीण हा मतदारसंघ आहे. मतदारसंघातील प्रमुख गावांचे सरपंच, उपसरपंच यांनीही पाटील यांना समर्थन दिले आहे. जिल्ह्यात पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासोबत जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, डॉ. हर्षल माने, जिल्हा सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ हे प्रमुख पदाधिकारी आहेत. गुलाबराव पाटील यांच्या गटाचे धरणगाव नगरपरिषदेसह पंचायत समिती आणि तालुक्यातील काही ग्रामपंचायतींवर वर्चस्व आहे. जळगाव महापालिकेतही शिवसेनेचे दोन गट असले तरी पक्षप्रमुख ठाकरे गटाचे अधिक वर्चस्व आहे.

हेही वाचा- गोवा काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर,दिगंबर कामत यांच्यावर शिस्त भंगाची कारवाई

सध्या शिंदे गटातील पाच नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार असून अपात्रतेसंदर्भात २६ जुलै रोजी औरंगाबाद खंडपीठात सुनावणी होणार आहे. गुलाबराव पाटील यांना शिवसेनेत असताना मिळणारा मान, सन्मान पाहता त्यांनी सेना सोडल्यावर जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर त्यांच्यामागे जातील, असा अंदाज होता. परंतु, सध्या तरी शिंदे गटात गेलेले त्या त्या भागातील आमदारांचे काही समर्थक वगळता जिल्ह्यात शिवसेनेची फारशी पडझड झालेली नाही. गुलाबराव पाटील यांच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघात पडझडीचे प्रमाण अधिक असले तरी त्यांचा प्रभाव जिल्ह्यात इतरत्र पडू शकला नाही, हेच यावरून दिसून येत आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-07-2022 at 11:12 IST
Next Story
राज्यसभेतील कामकाज कमी झाल्याने मावळते उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू नाराज