पिंपरी: स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा प्रस्ताव लांबणीवर टाकून दफ्तरी दाखल करणे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला प्रभाग समिती अध्यक्षपद मिळू नये, यासाठी प्रभागांची केलेली फेररचना, निधी देण्यात आखडता हात यामुळे ‘राष्ट्रवादी’ची सत्ताधारी भाजपकडून कोंडी करण्यात येत आहे. विरेाधपक्ष म्हणूनही विरोध होत नसल्याने ‘राष्ट्रवादी’ने भाजपपुढे शरणागती पत्करली का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
मोशी दुर्घटनेत नऊ कामगारांचा मृत्यू झाला. त्याचे सर्वसाधारण सभेत आणि बाहेरही पडसाद उमटले. सामाजिक संघटनांसह राज्यात भाजपबरोबर सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना (शिंदे) पक्षाने तीव्र आंदोलन केले. प्रशासनासह सत्ताधारी भाजपवर प्रश्नांची सरबत्ती केली; परंतु ‘राष्ट्रवादी’चे संदीप वाघेरे यांचा अपवाद वगळता एकाही नगरसेवकाने प्रशासन, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात भाष्य केले नाही. त्यामुळे केवळ कागदोपत्री विरोधी पक्षाची भूमिका निभावली जात असल्याचे दिसून येते.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत ‘राष्ट्रवादी’चे ३८ नगरसेवक आहेत. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडून आलेल्या नगरसेवकांची १९ जानेवारी रोजी पुण्यात बैठक घेतली होती. ‘चुकीच्या कामाला विरोध करा. आता तरी ताेंडे उघडावीत,’ असे आदेश दिले होते; परंतु अजित पवार यांच्या निधनानंतर पक्ष नेतृत्वाचे शहराकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे ‘राष्ट्रवादी’च्या नगरसेवकांकडून कोणतीही आक्रमक भूमिका घेतली जात नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दोन माजी महापौर, माजी उपमहापौर, दोन माजी विरोधी पक्षनेते अशी अनुभवी नगरसेवकांची फौज असतानाही विरोधी आवाज क्षीण झाला आहे. आक्रमकपणे मुद्दे मांडले जात नाहीत. पुनावळेतील शाळा आरक्षणाची जागा खासगी संस्थेला देण्यास सत्ताधारी भाजप नगरसेवकांनी विरोध केला; परंतु विरोधी पक्ष असलेल्या ‘राष्ट्रवादी’ने त्याबाबत ठोस भूमिकाही घेतली नाही.
‘राष्ट्रवादी’च्या शहराध्यक्षांचे म्हणणे काय?
‘मोशी येथील दुर्घटनेवर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत झालेल्या चर्चेत ‘राष्ट्रवादी’च्या काही नगरसेवकांनी विरोधाची भूमिका घेतली; परंतु भाजपने आमच्या नगरसेवकांना बोलू दिले नाही. सर्वसाधरण सभा तहकूब झाल्यानंतर चर्चा केली. त्यामुळे त्या चर्चेला काही अर्थ नाही. निष्पळ चर्चा केली. त्याचे इतिवृत्त होणार नाही. भाजपकडून सातत्याने आवाज दाबला जातो. दोन प्रभागाचे अध्यक्षपद आम्हाला मिळत असल्याने भाजपने प्रभागाची तोडफोड केली. भाजपकडून मनमानी कारभार केला जातो. चुकीच्या कामाविरोधात आम्ही भूमिका घेतो,’ असे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी सांगितले.
शिवसेना (शिंदे) पक्ष आक्रमक
राज्यात भाजपबरोबर सत्तेत आणि केवळ सहा नगरसेवक असलेल्या शिवसेना (शिंदे) पक्षाकडून आक्रमक भूमिका घेतली जात आहे. या पक्षाने कचरा दुर्घटनेनंतर आंदोलन केले. सर्वसाधारण सभेत जोरदार आवाज उठविला. खासदार श्रीरंग बारणे यांनी मोशी कचरा डेपोतील चुकीच्या कामाबाबत प्रश्न उपस्थित करुन याविरोधात लोकसभेत आवाज उठविणार असल्याचे सांगितले. मात्र, ‘राष्ट्रवादी’ ही मौनावस्थेत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
