PM Modi Independence Day Speech : यंदाच्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ सरकारच्या कामगिरीचा आढावाच मांडला नाही, तर आगामी काळातील राजकीय आणि धोरणात्मक उद्दिष्टेही स्पष्ट केली. ‘युवाशक्ती फॉर विकसित भारत @2047’ या केंद्रस्थानी असलेल्या संकल्पनेतून मोदी यांनी तरुणाई, आत्मनिर्भरता आणि विकसित भारताच्या उद्दिष्टांवर भर दिला.

भारताच्या स्वातंत्र्यदिनी मोदींनी केलेले हे सलग १३ वे भाषण होते. तब्बल १०३ मिनिटांच्या या भाषणात त्यांनी देशाच्या विकासाचा रोडमॅप, सरकारच्या धोरणांची दिशा आणि भारताची जागतिक पातळीवरील भूमिका यांवर भाष्य केले.

‘विकसित भारत @2047’ या व्यापक उद्दिष्टाला मोदी यांनी युवाशक्तीशी जोडले आहे. देशाच्या पुढील वाटचालीत तरुणांची भूमिका महत्त्वाची असल्याचा संदेश त्यांनी यावेळी दिला. तर ‘युवाशक्ती फॉर विकसित भारत @2047’ या माध्यमातून भारताच्या विकासासोबतच जागतिक पातळीवर अधिक ठाम आणि आत्मनिर्भर भूमिका घेण्याचा संदेश त्यांनी दिला आहे.

घराणेशाहीला आव्हान देण्याचा प्रयत्न

स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या एक लाख तरुणांना राजकारण आणि सार्वजनिक जीवनात आणण्याचे आवाहन केले. हा मुद्दा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात.

मोदींच्या या आवाहनामागे घराणेशाहीच्या राजकारणाला आव्हान देण्याचा स्पष्ट संदेश दिसतो. राजकीय कुटुंबांची पार्श्वभूमी नसलेल्या तरुणांना संधी देऊन पहिल्या पिढीतील नेतृत्व पुढे आणण्यावर त्यांनी भर दिला आहे.

त्यातून भाजप स्वतःला गुणवत्तापूर्ण नव्या नेतृत्वाला संधी देणारा पर्याय म्हणून मांडत असल्याचे दिसते. त्यामुळे एक लाख तरुणांचा मुद्दा केवळ युवा सहभागापुरता मर्यादित राहत नाही, तर तो आगामी राजकारणातील नेतृत्वाच्या नव्या पिढीचा संकेतही देतो.

‘वंदे मातरम्’ला विशेष स्थान देण्यामागचा संदेश

यंदाच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात ‘वंदे मातरम्’ च्या १५० वर्षांच्या प्रवासाला विशेष महत्त्व देण्यात आले. लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात प्रथमच राष्ट्रगीतासोबत ‘वंदे मातरम्’चे अधिकृतपणे सादरीकरण करण्यात आले.

सरकारने अधिकृत राज्य शिष्टाचारात ‘वंदे मातरम्’ला स्थान देऊन सरकारने या गीताचे सांस्कृतिक आणि राष्ट्रीय महत्त्व अधिक ठळक केले आहे. या निर्णयातून विरोधकांसमोरही एक राजकीय आव्हान उभे राहिले आहे. ‘वंदे मातरम्’ला मिळालेल्या या विशेष स्थानाचे समर्थन करायचे की त्यावर वेगळी भूमिका मांडायची, याचा निर्णय विरोधकांना घ्यावा लागेल. त्याबाबतची भूमिका स्पष्ट करताना त्यांना देशभक्ती आणि राष्ट्रीय भावनेशी संबंधित राजकीय चर्चेलाही सामोरे जावे लागू शकते.

सीमावर्ती भागांबाबत कठोर भूमिका

सीमावर्ती भागातील लोकसंख्येची बदलती रचना आणि अवैध स्थलांतराचा राष्ट्रीय सुरक्षेवर होणारा परिणाम हा मुद्दा उपस्थित करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका विशेष मिशनची घोषणा केली.

लोकसंख्येतील बदलांचा मागोवा घेण्याचा मुद्दा राष्ट्रीय सुरक्षेशी जोडला जात आहे. सीमावर्ती भागातील लोकसंख्येतील बदल आणि अवैध घुसखोरी यांकडे सरकार अधिक गांभीर्याने पाहणार असल्याचा संदेश यांतून दिला जातो.

या निर्णयामुळे भाजपाच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या भूमिकेला अधिक ठोस आधार मिळतो. विशेषतः सीमा सुरक्षित राहाव्यात आणि घुसखोरी रोखली जावी, अशी चिंता असलेल्या मतदारांशी हा मुद्दा थेट जोडला जातो.

आर्थिक ताकद आणि सामरिक स्वावलंबनावर भर

विकसित भारत रोजगार योजना

पंतप्रधान मोदींनी यावेळीही एक लाख कोटींची भव्य रोजगार योजना हाती घेतली आहे. नोकरीच्या औपचारिक क्षेत्रात नव्याने प्रवेश करणाऱ्या तरुणांना सुरुवातीच्या काळात मदत म्हणून दरमहा १५ हजार रुपये देण्यात येतील.

रोजगार वाढत नसल्याच्या विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्याचा सरकारचा प्रयत्न दिसत आहे. अंदाजे तीन कोटी तरुणांना या योजनेचा फायदा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तरुणांच्या हातात पैसा येऊन बाजारातील खरेदी वाढण्यास मदत होऊ शकते. तसेच अधिक तरुण औपचारिक रोजगाराच्या क्षेत्रात आल्याने EPFO मध्ये नोंदणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्याही वाढू शकते.

चिपनिर्मितीत आत्मनिर्भर होण्यावर भर

भारतामध्ये तयार झालेल्या पहिल्या ‘मेड इन इंडिया’ सेमीकंडक्टर चिप्स २०२६ च्या अखेरपर्यंत बाजारात आणण्याचे लक्ष्य पंतप्रधान मोदी यांनी मांडले. तसेच पुढील दशकात पाच ते आठि नवीन सेमीकंडक्टर प्रकल्प उभारणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

चिपनिर्मितीला केवळ उद्योग नव्हे, तर संरक्षण, इलेक्ट्रिक वाहने आणि महत्त्वाच्या खनिजांच्या सुरक्षेशी जोडण्यात आले आहे. जागतिक पुरवठा साखळीतील अडथळ्यांपासून भारताचे संरक्षण करणे आणि चिपनिर्मितीत आत्मनिर्भर होणे, हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे.

ऊर्जा क्षेत्रातही आत्मनिर्भरतेवर भर

परदेशी इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी मोदी यांनी नॅशनल डीपवॉटर एक्स्प्लोरेशन मिशनची घोषणा केली. तसेच आगामी काळात पाच नवीन अणुभट्ट्यांच्या मदतीने अणुऊर्जा क्षमता २०० गिगावॅटपर्यंत नेण्याचे लक्ष्य त्यांनी मांडले आहे.

जागतिक ऊर्जासंकटाच्या पार्श्वभूमीवर भारताने स्वतःची ऊर्जा व्यवस्था मजबूत करणे गरजेचे असल्याचा संदेश यातून देण्यात आला आहे. जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करून, अणुऊर्जा आणि हरित ऊर्जेचा विस्तार करण्याचा सरकारचा प्रयत्न या धोरणातून दिसतो.

शेतीमालाला जागतिक बाजारपेठेची दिशा

भारताने ४० देशांसोबत मुक्त व्यापार करार (FTA) केला असल्याचे मोदींनी नमूद केले. या करारांचा फायदा घेण्यासाठी शेतकरी आणि एमएसएमईंनी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उत्पादनावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. ‘गुणवत्ता, गुणवत्ता, गुणवत्ता’ या मंत्रावर त्यांनी विशेष भर दिला.

भारतीय शेतीमालाला केवळ देशांतर्गत बाजारपेठेपुरता मर्यादित न ठेवता, निर्यात वाढविण्याचे लक्ष्य ठेवणे हा यामागचा उद्देश आहे. त्यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि छोट्या उद्योगांना मिळणाऱ्या बाजारपेठेच्या संधी वाढविण्याचा प्रयत्न दिसतो.

‘सप्तधारा’तून विकसित भारताचा रोडमॅप

या सर्व राजकीय आणि धोरणात्मक मुद्द्यांना एकत्र जोडत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सप्तधारा’ ही सात सूत्री विकासाची दिशा मांडली. २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी या सात क्षेत्रांवर विशेष भर देण्याचा त्यांचा मानस आहे.

यातून भारताने पूर्वीच्या ‘फ्रॅजाईल फाइव्ह’ म्हणजेच आर्थिकदृष्ट्या अस्थिर मानल्या जाणाऱ्या देशांच्या यादीतून बाहेर पडण्यासाठी विकसित राष्ट्र म्हणून स्वतःची ओळख निर्माण करावी, असा व्यापक रोडमॅप मांडण्यात आला आहे.