पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची केरळमधील एर्नाकुलम येथे सभा पार पडली. केरळमध्ये यावर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या भाषणात पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धावर भाष्य केले. पश्चिम आशियात सुरू असलेले युद्ध आपल्या सर्वांसाठी चिंताजनक आहे, असे मोदी म्हणाले. पेट्रोलियम क्षेत्राचा विस्तार होणे महत्वाचे आहे, सध्या उद्भवलेल्या परिस्थितीने पुन्हा एकदा दाखवून दिले की आपल्याला आत्मनिर्भर होणे आवश्यक आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदी यांनी केरळमध्ये ११ हजार कोटी रूपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी केली. भाजपा व राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) च्या पदाधिकाऱ्यांना यावेळी मोदींनी मार्गदर्शन केले. पश्चिम आशियातील परिस्थितीवर काँग्रेसकडून चिथावणी देणारी व बेजबाबदार विधाने केली जात आहेत, असा आरोप मोदींनी काँग्रेसवर केला.
“जागतिक संकटात काँग्रेसला राजकारण सूचतंय”
काँग्रेस व डाव्या पक्षांकडून आत्मनिर्भर भारत उपक्रमाची थट्टा केली जात आहे, असा आरोप मोदींनी केला. तसेच केरळ विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काँग्रेस व डाव्या पक्षांना लक्ष्य केले. पश्चिम आशियातून भारतीयांना सुखरूप भारतात आणल्याबाबत मोदींनी विधान केले. इराकमध्ये अडकलेल्या नर्सेस, येमेन मध्ये अडकलेले धर्मगुरू टॉम उझुन्नलील आणि अफगाणिस्तानात अडकलेले अलेक्सिस प्रेमकुमार यांची सुटका केल्याचे मोदींनी सांगितले. “आपले लाखो बंधु-भगिनी तिकडे (पश्चिम आशिया) काम करतात. आज भारतात भाजपा-एनडीएचे सरकार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. जेव्हा जेव्हा भारतीय नागरिक संकटात अडकले, तेव्हा आम्ही त्यांच्या मदतीसाठी पूर्ण शक्तीने धावून गेलो. आज उद्भवलेल्या जागतिक संकटात काँग्रेसला राजकारण सूचत आहे. परिस्थिती आणखी बिकट व्हावी म्हणून काँग्रेस जाणीवपूर्वक चिथावणी देणारे व बेजबाबदार विधाने करत आहे. मोदींवर रिल्स बनवून टीका करण्याची मोहीम त्यांनी सुरू केली आहे. हा त्यांचा खेळ आहे.” , असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
भारताला आत्मनिर्भर होण्याची गरज – मोदी
भारताच्या सगळ्या मित्र देशांमधील सरकार तेथील भारतीयांची काळजी घेत आहे, असे सांगत मोदी म्हणाले, “नागरिकांना मदत करण्यासाठी आपले दूतावास चोवीस तास काम करत आहेत. कोणाला अन्न, औषधे, राहण्यासाठी जागा तसेच कायदेशीर मदत हवी असल्यास ती पुरवली जात आहे.” पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, या युद्धाने पुन्हा एकदा दाखवून दिले की आपण आत्मनिर्भर व स्वावलंबी होणे आवश्यक आहे. ऊर्जा क्षेत्रासह इतर क्षेत्रांमध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. “कोविड काळात तसेच युक्रेन संकटात आत्मनिर्भर होणे किती महत्वाचे आहे हे आपल्याला लक्षात आले. सध्या उद्भवलेल्या परिस्थितीने देखील पुन्हा एकदा आपल्याला आत्मनिर्भर होण्याची गरज असल्याचे दाखवून दिले आहे.”, असे मोदी म्हणाले.
काँग्रेस व डाव्या पक्षांकडून आत्मनिर्भर भारताची थट्टा – मोदी
भारताने सोलार ऊर्जा क्षमता वाढवली आहे, तसेच इलेक्ट्रिक वाहनांवर जोर दिला आहे, असे भारताच्या ऊर्जा क्षेत्राबाबत मोदी यांनी सांगितले. ते म्हणाले, “आत्मनिर्भर भारत उपक्रमाची काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी थट्टा केली आहे. काँग्रेस व डाव्या पक्षांनी सरकार चालवताना विदेशी शक्तींवर भारताला अवलंबून राहावे लागेल, अशी परिस्थिती निर्माण केली होती. आता ते एकत्र मिळून अफवा पसरवत आहेत. युद्धासारख्या परिस्थितीत काँग्रेस व डावे पक्ष त्यांची सगळी शक्ती वापरून देशात भीतीचे वातावरण निर्माण करत आहेत. काँग्रेस व डाव्या पक्षांकडून होणाऱ्या अपप्रचाराला बळी पडू नका.”, असे आवाहन मोदींनी केले.
भारतीय तरूणांचे ड्रोन निर्मितीत योगदान
काँग्रेसचे नेते व लोकसभेचे विरोध पक्षनेते राहुल गांधी यांनी ड्रोन बाबत विधान केले होते. त्यावर पंतप्रधान मोदींनी टीका केली. देशातील तरूणांमध्ये असलेल्या क्षमतेवर काँग्रेसला विश्वास नाही, असे मोदी म्हणाले. ते म्हणाले, “भारतातील तरूण ड्रोन निर्मितीत काय योगदान देत आहेत, याबाबत काँग्रेसच्या युवराजांना (राहुल गांधी) माहिती नाही. भारतात सध्या किती कंपन्या ड्रोन निर्मिती करत आहेत, हेदेखील काँग्रेस नेत्यांना ठाऊक नाही”, अशी टीका मोदींनी केली.
शबरीमला मंदिराची लूट
केरळच्या राजकीय पक्षांवर मोदींनी टीका केली. केरळ मध्ये काँग्रेस-यूडीएफ व सीपीएम-एलडीएफ या पक्षांविरोधात भाजपाचा लढा आहे. मोदी म्हणाले, दोन्ही यूडीएफ व एलडीएफ हे पक्ष भ्रष्टाचार, गुन्हेगारीत एकमेकांचे भागीदार आहेत. “शबरीमला मंदिराची लूट करण्यात या पक्षांची पार्टनरशीप होती. एलडीएफच्या लोकांवर मंदिरातील सोने लुटल्याचा आरोप आहे. तर यूडीएफवर ती लूट विकल्याचा आरोप आहे” अशी टीका मोदींनी केली. शबरीमाला मंदिर गोल्ड स्कँडलवरून मोदींनी सत्ताधारी सीपीएम-एलडीएफ पक्षांवर टीका केली.
११ हजार कोटींच्या अनेक प्रकल्पांचे उद्घाटन
केरळच्या जनतेनेच आता डावे पक्ष तसेच काँग्रेसकडे आलटून-पालटून सत्ता देण्याची रचना बदलावी असे आवाहन मोदी यांनी केले. राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला विजय मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शबरीमला मंदिरातील लुटीबाबत हेच दोघे भागीदार असल्याचा आरोपही मोदींनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केरळ दौऱ्यात ११ हजार कोटींच्या अनेक प्रकल्पांचे उद्घाटन केले. कोचीमध्ये झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, ग्रामीण विकास मंत्रालय, नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालयासह विविध केंद्र सरकारच्या मंत्रालयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन केले.
