BJP National Office Bearers Meeting : गेल्या आठवड्यात भाजपाच्या नव्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची उपस्थिती होती. सूत्रांच्या माहितीनुसार, बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना सौम्य पण स्पष्ट शब्दांत कानपिचक्या दिल्या. गेल्या काही वर्षांतील पक्षाला मिळत असलेल्या सातत्यपूर्ण निवडणूक विजयांमुळे गाफील राहू नका, असा स्पष्ट सल्ला त्यांनी दिला, तर सत्तेमुळे भाजपाचे नेते आणि सर्वसामान्य जनता यांच्यात अंतर निर्माण होत असल्याची जाणीव पक्षाध्यक्ष नबीन यांनी करून दिली. तसेच, पक्षाच्या नेत्यांना जनतेशी पुन्हा संपर्क वाढवण्याची गरज असल्याचे त्यांनी सूचित केले.

बैठकीला उपस्थित असलेल्या भाजपाच्या एका नेत्याने नाव न घेण्याच्या अटीवर दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, पंतप्रधान मोदी यांनी नव्या टीमबाबत पूर्ण विश्वास व्यक्त केला. त्यांनी प्रत्येक पदाधिकाऱ्याचे म्हणणे सविस्तरपणे ऐकून घेतले. बैठकीला सुरुवात होण्याआधी पंतप्रधानांनी प्रत्येकाला स्वतःबद्दल आणि पक्षात त्यांचा प्रवास कसा सुरू झाला, याबद्दल बोलण्यास सांगितले. अनेक तास बसून ते प्रत्येक नव्या पदाधिकाऱ्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत होते. पंतप्रधानांची भूमिका नेहमीच स्पष्ट राहिली आहे. २०१४ मध्ये काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारविरोधातील लाटेमुळे भाजपाला सत्ता मिळाली, तर २०२९ मध्ये गरिबांसाठी राबवलेल्या कल्याणकारी योजना आणि देशाच्या अंतर्गत व बाह्य सुरक्षेमुळे जनतेने भाजपाला पुन्हा सत्तेवर आणले. २०२४ मध्ये विरोधकांच्या अपप्रचाराकडे दुर्लक्ष करून जनतेने भाजपाच्या हाती पुन्हा सत्तेची चावी दिली. सध्या बहुतांश मतदारांचा कल आपल्याकडे असला तरीही मिळालेल्या विजयांना गृहीत धरून चालणार नाही, हाच पंतप्रधानांचा मुख्य संदेश होता, अशी माहिती संबंधित नेत्याने दिली.

भाजपाच्या अंतर्गत गोटातून मिळालेल्या माहितीनुसार, नवीन संघटनात्मक कार्यकारणी जाहीर करण्यात झालेला अनेक महिन्यांचा विलंब आणि मंत्रिमंडळ फेरबदलाच्या सुरू असलेल्या चर्चांमुळे पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांमध्ये अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले होते. त्यावर मत मांडताना एका राज्यातील भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनी सांगितले की, या परिस्थितीमुळे पक्षातील अनेक नेत्यांनी स्वत:चे पद टिकवण्यासाठी धडपड सुरू केली आणि त्याचा परिणाम थेट राज्य पातळीवरही दिसून आला. अजूनही बदलाची भीती त्यांच्या मनात कायम असून त्याचा परिणाम प्रशासनावर होत आहे. त्यामुळेच भाजपाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्येही नाराजीची भावना निर्माण होताना दिसून येत आहे, असेही या नेत्याने सांगितले. यादरम्यान सत्ताधारी भाजपाच्या चिंतेत आणखी एक भर पडल्याचे सांगितले जाते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही राज्याराज्यांतील नेत्यांमध्ये वाढता दुरावा आणि निर्माण झालेली मरगळ याबद्दल सावध केल्याचे समजते.

संघाशी घनिष्ठ संबंध असलेल्या भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, तरुणांच्या आंदोलनाबाबत काही केंद्रीय मंत्र्यांनी केलेली सार्वजनिक वक्तव्ये पक्षाच्या अडचणी वाढवणारी ठरली. कॉक्रोच जनता पार्टी आणि त्यांच्या नेत्यांनी उपस्थित केलेले मुद्दे योग्य असले तरी त्यामागचे हेतू वेगळे असल्याचे मंत्री म्हणत असतील तर हा युक्तिवाद कसा योग्य ठरतो? जर मुद्दा योग्य असल्यास तो कोणाही मांडल्यास काय फरक पडतो? अशा विधानांमुळे सत्ताधारी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा संदेश जाऊ शकतो आणि मंत्र्यांच्या विधानाला हाताशी धरून विरोधक सरकारला कोंडीत पकडू शकतात, असेही या नेत्याने नमूद केले. याशिवाय, केंद्रीय मंत्र्यांना विद्यापीठांमध्ये पाठवण्याच्या योजनेवरही अनेक नेत्यांनी साशंकता व्यक्त केली. विद्यापीठ हे मुळात विद्यार्थ्यांचे आणि लोकशाही संवादाचे क्षेत्र आहे. तिथे जाऊन मंत्र्यांनी केवळ एकतर्फी भाषण केले तर त्याचे परिणाम उलटे होऊ शकतात. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मंत्र्यांनी संयम आणि परिपक्वता न दाखवल्यास त्यांच्या प्रत्येक उत्तरामुळे मोठा वादंग निर्माण होऊ शकतो. यामुळे विरोधकांना सरकार व भाजपाला लक्ष्य करण्यासाठी संधी मिळू शकते, अशी भीतीही एका नेत्याने व्यक्त केली.

भाजपाच्या आणखी एका नेत्याने सांगितले की, नीट पेपरफुटी प्रकरणात राजधानी दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीने आंदोलन केले होते. त्याकडे पक्षश्रेष्ठींनी वेळीच लक्ष दिले असते तर कदाचित आज पक्षासमोर इतकी मोठी आव्हाने निर्माण झाली नसती. सध्या झारखंडमधील रांची आणि बिहारमधील पाटण्यात तरुणांची सुरू असलेली निदर्शनांनाही विविध राज्यांतील तरुणांनी मोठा पाठिंबा दिला आहे. त्यातच या आंदोलनांमधील चर्चेचा केंद्रबिंदू आता शिक्षण आणि रोजगार यांसारख्या मूलभूत प्रश्नांकडे वळल्याने केंद्र सरकारला त्यावर ठोस तोडगा काढावाच लागणार आहे, असेही या नेत्याने नमूद केले. दरम्यान आगामी काळात उत्तर प्रदेशासारख्या महत्वाच्या राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारविरोधात तरुणांचा रोष असाच राहिल्यास त्याचे निवडणुकीत मोठे पडसाद उमटू शकतात. त्यातच पक्षातील अंतर्गत गटबाजी तसेच जातीय पातळीवरील मतभेद आणि संघर्ष यामुळे भाजपासमोरील आव्हाने वाढल्याचे पक्षातील नेत्यांचे म्हणणे आहे. उत्तर प्रदेशात १८ ते २९ वर्षे वयोगटातील तरुण मतदारांची संख्या जवळपास २० टक्के असल्याचा अंदाज आहे. स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमितता आणि बेरोजगारीसारख्या मुद्द्यांमुळे या वयोगटातील मतदारांमध्ये भाजपाविरोधात नाराजी वाढतच चालली असून, ते राजकीयदृष्ट्या अधिक अस्थिर होत असल्याचे उत्तर प्रदेशातील भाजपा नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी पक्षाच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारणीतील पदाधिकाऱ्यांना निवडणुकीत गाफिल न राहण्याचा सल्ला दिल्याचे समजते.