आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : देशातील तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या मोदी-शाहांनी तातडीने आपल्या पदांचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली… दिल्लीत विद्यार्थी आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमारानंतर वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेत २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली… दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनात अनेक स्वार्थी मंडळी घुसल्याने हे आंदोलन भरकटले असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला… विद्यार्थ्यांना दहशतवादी म्हणणारे सदाभाऊ खोत आता ‘गुंडाभाऊ’ झाले असल्याची घणाघाती टीका काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली… मोदी पंतप्रधान असताना विद्यार्थ्यांचं आंदोलन निर्दयीपणे चिरडले गेले हे इतिहास लक्षात ठेवेल, असा संताप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केला… या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…
पंतप्रधान मोदींच्या राजीनाम्याची मागणी
दिल्लीतील विद्यार्थी आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमारानंतर काँग्रेसने अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील निवास्थानाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले. या आंदोलनात काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते. देशातील तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या मोदी-शाहांनी तातडीने आपल्या पदांचा राजीनामा द्यावा, अशी मागणी राहुल यांनी केली. दिल्लीतील पंतप्रधानांचे निवासस्थान हा सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा परिसर मानला जातो. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी आंदोलकांना तेथून हटवण्यास सुरुवात केल्याने मोठा गदारोळ निर्माण झाला होता.
येत्या २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक
दिल्लीत विद्यार्थी आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचे पडसाद आता महाराष्ट्रातही उमटू लागले आहेत. पोलिसांच्या या कारवाईचा आणि दडपशाहीचा निषेध नोंदवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने येत्या २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. पक्षाचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून शेअर केलेल्या पोस्टमधून ही घोषणा केली आहे. “दिल्लीत शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून अमानुष लाठीचार्ज करण्यात केला. या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी आणि त्या विद्यार्थ्यांच्या समर्थनासाठी वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. सर्व समविचारी पक्ष, विद्यार्थी संघटना आणि नागरिकांनी या बंदला पाठिंबा द्यावा,” असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पोस्टमधून केले आहे.
मुख्यमंत्री फडणवीसांचा गंभीर आरोप
दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनात अनेक स्वार्थी मंडळी घुसल्याने हे आंदोलन भरकटले असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. लोकशाहीमध्ये परवानगी घेऊन आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. मात्र, जाणीवपूर्वक राजकीय अशांतता तयार करण्याकरता विनापरवानगी आंदोलन करणे, हिंसा करणे हे मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये योग्य नाही. त्याच्यावर आवश्यक ते कारवाई केली पाहिजे. ज्यावेळेस आंदोलन फेसलेस असते त्यावेळी काही प्रवृत्ती त्या आंदोलनात फिरतच असतात आणि त्या प्रवृत्ती आंदोलनाचा फायदा घेऊन आपला स्वार्थ कसा पूर्ण करता येतील असा प्रयत्न करतात. नीट परीक्षा आता पेपर कुठेशी काही संबंध नाही असे मंडळीही केवळ अराजकता माजवण्यासाठी या आंदोलनात बसली आहेत. कुठल्याही सरकारला आपल्या नागरिकांवर लाठी चार्ज करणे हे कधीच आवडत नाही; पण काल ज्या प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी होती, जर पोलिसांनी कंट्रोल घेतला नसता तर अनेक अनावश्यक अशा गोष्टी त्या ठिकाणी घडल्या असत्या, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
सदाभाऊ खोत यांच्या विधानामुळे वाद
नीट पेपरफुटीच्या प्रकरणामुळे देशभरातील विद्यार्थी संतप्त असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत आंदोलन सुरू आहे. मात्र, या आंदोलनाबाबत माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची गरज नाही, विद्यार्थीच दहशतवादी आहेत, असे विधान केले. त्यांच्या या विधानावरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला. त्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सदाभाऊंचा चांगलाच समाचार घेतला. सदाभाऊ खोत हे आता ‘सदाभाऊ’ नसून ‘गुंडाभाऊ’ झाले आहेत. विद्यार्थ्यांना दहशतवादी म्हणणाऱ्या खोत यांनी तातडीने जाहीर माफी मागावी, अशी मागणी अतुल लोंढे यांनी केली. दुसऱ्यांच्या मुलांवर लाठ्या-काठ्यांचा मारा होत असताना त्याचे समर्थन करून मंत्रिपद मिळवण्याचा प्रयत्न करणे, हे अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे, अशी टीकाही लोंढे यांनी केली.
विद्यार्थ्यांवरील लाठीमारानंतर ठाकरेंचा संताप
मोदी पंतप्रधान असताना विद्यार्थ्यांचे आंदोलन निर्दयीपणे चिरडले गेले हे इतिहास लक्षात ठेवेल, असा संताप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केला. केंद्र सरकारने शनिवार १८ जुलै २०२६ रोजी सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने उचलून रुग्णालयात भरती केले. त्यांना ज्या पद्धतीने फरफटत नेले त्यावरून सरकारला वांगचुक यांची काळजी नव्हती हे नक्की. त्यानंतर काल आंदोलकांवर केलेला बेफाम लाठीचार्ज, हे पाहून हे सरकारच मानसिक रुग्ण झाले आहे आणि त्यांनाच रुग्णालयात भरती करण्याची गरज आहे असं दिसतंय, अशी टीका राज यांनी समाजमाध्यमांवर शेअर केलेल्या पोस्टमधून केली. माझी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती आहे. ती ‘परीक्षा पे चर्चा’ इत्यादी करता ना मग आता विद्यार्थ्यांशी चर्चा करा. त्यांच्या मागण्या रास्त आहेत. धर्मेंद्र प्रधान आणि सरकारचा इगो यापेक्षा या देशातील विद्यार्थ्यांचा आक्रोश महत्वाचा आहे, असा सल्लाही राज यांनी दिला.
