पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातील विधान परिषदेच्या जागेवर भाजपा पिछाडीवर आहे. वाराणसीतील शिक्षक मतदारसंघाच्या जागेवर समाजवादी पक्षाने पुन्हा विजय मिळवला असून, पदवीधर मतदारसंघातही सपा आघाडीवर आहे, त्यामुळे भाजपासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

उत्तर प्रदेशातील विधान परिषदेच्या ११ जागांपैकी भाजपाने सहा, तर समाजवादी पक्षाने चार जागा जिंकल्या आहेत. वाराणसीच्या पदवीधर मतदारसंघाचा निकाल अद्याप बाकी आहे. मागील निवडणुकीत या ११ जागांपैकी समाजवादी पक्षाला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले होते. यंदा वाराणसीची पदवीधर मतदारसंघाची जागाही पक्षाने जिंकल्यास त्याच्या जागांची संख्या पाचवर पोहोचणार आहे. हा विजय समाजवादी पक्षासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत आशेचा किरण ठरू शकतो.

वाराणसीच्या पदवीधर मतदारसंघात तब्बल ४९ तास उलटूनही मतमोजणी सुरूच आहे. मतमोजणी केंद्रावर भाजपा आणि समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी तळ ठोकला असून दोन्ही बाजूंनी मतमोजणीत गैरप्रकार झाल्याचे आरोप केले जात आहेत, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघातील ही निवडणूक दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची लढत ठरली आहे.

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत सुशिक्षित मतदार सध्याच्या राजकीय आणि सामाजिक प्रश्नांकडे कसं पाहतात, याचे प्रतिबिंब निकालात उमटते. स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी आणि बेरोजगारीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले, त्यामुळे सुशिक्षित मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने असणार यावर विधान परिषदेसोबतच आगामी निवडणुकांतील चित्र स्पष्ट होणार आहे.

वाराणसीत समाजवादी पक्षाची पकड कायम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघात विधान परिषद निवडणुकीत समाजवादी पक्षाने शिक्षक मतदारसंघात विजय मिळवला आहे. सपाचे लाल बिहारी यादव यांनी भाजपाच्या प्रमोद कुमार मिश्रा यांचा ५,०१५ मतांनी पराभव केला. २०२० मध्येही यादव यांनी मिश्रा यांना पराभूत केले होते; मात्र त्या वेळी विजयाचे अंतर केवळ ९३६ इतकेच होते. भाजपाने २०२० मध्ये पाठिंबा दिलेले चेत नारायण सिंह यंदा अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरले होते. मात्र, त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

पदवीधर मतदारसंघातही समाजवादी पक्षाचे विद्यमान आमदार आशुतोष सिन्हा विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. सध्याच्या आकडेवारीनुसार, यंदा त्यांचे मताधिक्य २०२० मधील ३,८५० पेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. गेल्या निवडणुकीत सिन्हा यांनी भाजपाचे केदारनाथ सिंह यांचा पराभव केला होता. यंदाही केदारनाथ सिंह दुसऱ्या क्रमांकावर आहेत, त्यामुळे वाराणसीतील दोन्ही मतदारसंघांतील समाजवादी पक्षाची विजयी कामगिरी भाजपासाठी राजकीयदृष्ट्या मोठे आव्हान ठरू शकणार आहे.

४९ तासांपासून मतमोजणी सुरू, दोन्ही पक्षाची धाकधूक

वाराणसीच्या पदवीधर मतदारसंघातील मतमोजणी ४९ तासांपासून सुरूच आहे, त्यामुळे भाजपा आणि समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्रावर तळ ठोकला आहे. दोन्ही पक्षांकडून गैरप्रकारांचे आरोप होत असून केंद्राबाहेर नाट्यमय दृश्ये पाहायला मिळत आहेत.

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी गुरुवारी सकाळी ‘एक्स’ पोस्टच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना मतमोजणी केंद्रावरच थांबण्याचे निर्देश दिले आहेत. यादव यांनी मतमोजणी केंद्राबाहेर बसलेल्या पक्षाच्या नेत्यांचा फोटो पोस्ट करत म्हटले की, “विजयाचं प्रमाणपत्र हातात मिळेपर्यंत कोणीही तिथून निघू नये.” वाराणसीतील कार्यकर्त्यांनी केंद्रावर उपस्थित असलेल्या सहकाऱ्यांसाठी जेवण, पिण्याचे पाणी, छत्र्या आणि टॉवेलची व्यवस्था करावी आणि त्यांचे मनोबल कायम ठेवावे, असे निर्देश यादव यांनी दिले.

वाराणसीतील मतमोजणीवरून भाजपा आणि समाजवादी पक्षातील संघर्ष आता अधिकच तीव्र झाला आहे. बुधवारी रात्री भाजपाचे उमेदवार केदारनाथ सिंह यांनी मतमोजणीत अनियमितता झाल्याचा आणि निकालात फेरफार करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत फेरमतमोजणीची मागणी केली. त्यानंतर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही मतमोजणीच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केले.

यादव यांनी एका पोस्टमध्ये म्हटले की, वाराणसीत फेरमतमोजणी होत असल्याचे समजताच काही लोक मतमोजणी केंद्रावर गंगाजल घेऊन पोहोचत असल्याचे माझ्या कानावर आले, अधिकाऱ्यांनी हे पाणी हातात घेऊन आपल्या प्रामाणिकपणाची परीक्षा द्यावी, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. दरम्यान, ताज्या कलांनुसार, समाजवादी पक्षाचे उमेदवार आशुतोष सिन्हा यांनी भाजपाच्या उमेदवारावर लक्षणीय आघाडी घेतली होती, त्यामुळे या मतदारसंघातील निकालावर उत्तर प्रदेश वासीयांच्या नजरा खिळल्या आहेत.

वाराणसीतील निकाल का महत्त्वाचा ठरतो?

वाराणसी विभागात आठ जिल्ह्यांतील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांचा समावेश होतो. बलिया, गाझीपूर, जौनपूर, वाराणसी, चंदौली, भदोही, मिर्झापूर आणि सोनभद्र या आठ जिल्ह्यांत विधानसभेचे एकूण ४७ मतदारसंघ आहेत, त्यामुळे या भागातील निकालांना राजकीय महत्त्व प्राप्त होते.

२०२२ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएने ४७ पैकी २८ जागा जिंकल्या होत्या. त्यात भाजपाने २२, तर अपना दल (एस) आणि निषाद पक्षाने प्रत्येकी तीन जागांवर विजय मिळवला. समाजवादी पक्षाला १४, तर त्या वेळी त्याचा मित्रपक्ष असलेल्या ओमप्रकाश राजभर यांच्या सुहेलदेव भारतीय समाज पक्षाला चार जागा मिळाल्या होत्या. उर्वरित एका जागेवर बहुजन समाज पक्षाने विजय मिळवला होता. राजभर यांचा पक्ष आता एनडीएमध्ये असून, राजभर उत्तर प्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत.

या आठ जिल्ह्यांना उत्तर प्रदेश सरकारमध्येही मोठे प्रतिनिधित्व मिळाले आहे. या भागातील नऊ नेते राज्य सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत, त्यामुळे या क्षेत्रातील राजकीय प्रभाव टिकवणे भाजपासाठी महत्त्वाचे आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपानेही आपल्या प्रमुख नेत्यांना प्रचारासाठी मैदानात उतरवले होते. अशा परिस्थितीत वाराणसीतील पदवीधर मतदारसंघात आघाडी मिळवणे भाजपासाठी गरजेचे आहे, मात्र येथील चित्र विरुद्ध दिसत आहे.

भाजपाने या निवडणुकीसाठी प्रभावी नेत्यांना प्रचारात उतरवले होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी १४ ऑक्टोबरला शिक्षक आणि पदवीधर मतदारांच्या मेळाव्याला संबोधित करत समाजवादी पक्षावर निशाणा साधला होता. त्यांनी समाजवादी पक्षाला ‘शिक्षणविरोधी’ म्हटले आणि पक्षाच्या पूर्वीच्या सरकारांच्या काळात सरकारी नोकऱ्यांमधील भरती प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील पक्षावर विश्वास ठेवू नका, असे त्यांनी म्हटले होते.

मात्र, विधान परिषद निवडणुकीतील भाजपाच्या या निराशादायी कामगिरीबाबत स्वपक्षातील नेत्यांनीच आता आत्मपरीक्षणाची गरज व्यक्त केली आहे. उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री सुरेश खन्ना यांनी प्रचारादरम्यान म्हटले होते की, ‘२०२० मध्ये पक्षाला अतिआत्मविश्वास नडला.’ यंदाच्या निकालाबाबत भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्यानेही पक्षातील नेत्यांमधील अतिआत्मविश्वास आणि दुर्लक्षामुळे पक्षाला फटका बसल्याचे मान्य केले. मतदानाचे जिल्हानिहाय विश्लेषण करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.

भाजपाच्या आणखी एका नेत्याने म्हटले की, मतदार नोंदणीच्या कामात समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते भाजपापेक्षा अधिक सक्रिय होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या लोकप्रियतेवर अवलंबून राहण्याऐवजी उमेदवार आणि पक्षसंघटनेने थेट मतदारांपर्यंत पोहोचायला हवे होते, असे या नेत्याने नमूद केले.

एकूणच, पंतप्रधान मोदींच्या मतदारसंघातील या निकालाने भाजपासमोरील पुढील आव्हान पुन्हा अधोरेखित केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा यातून काय धडा घेणार आणि समाजवादी पक्ष आपली विजयी घोडदौड टिकवू शकणार का, याकडे लक्ष असणार आहे.