काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘रावण’ असा उल्लेख केला होता. त्यामुळे गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेस आणि भाजपा यांच्यात राजकीय चिखलफेक सुरु होती. खरगे यांच्या मोदींवरील उपहासात्मक टिप्पणीमुळे भाजपाच्या हाती आयते कोलीत मिळाले होते. तसेच, ‘गुजराती अस्मिते’ला विरोध करणाऱ्या काँग्रेसला मतदान न करण्याचे आवाहन भाजपा नेते करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘तुम्ही १०० तोंडांचे रावण आहात का?’ असा खोचक प्रश्न खरगे यांनी अहमदाबादमधील बेहरामपुरा येथे प्रचारसभेत विचारला होता. “मोदी सगळीकडे दिसतात, महापालिकेच्या निवडणुकीत, विधानसभेच्या निवडणुकीत, लोकसभा निवडणुकीत, सगळ्याच निवडणुकीत मोदींचा चेहरा पुढे केला जातो. महालिकेच्या निवडणुकीत उमेदवारांच्या नावे मत मागा, पालिकेत गरज लागली तर मोदी काम करायला येणार आहेत का?,” असा सवाल खरगे यांनी केला होता.

हेही वाचा :  “मेहनत घेणं चांगलंच, पण त्यात…”; अमित शाहांची राहुल गांधींवर मार्मिक टिप्पणी

खरगेंच्या या टीकेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “मी खरगेंचा सन्मान करतो. पण, हे रामभक्तांचे गुजरात आहे, हे काँग्रेसला माहित नाही. रामभक्तांच्या या भूमीवर खरगेंना ‘१०० तोंडाचे रावण’ म्हणण्यास सांगण्यात आलं. कारण, काँग्रेसला रामाचे अस्तित्व मान्य नाही. अयोध्येतील राममंदिरावर त्यांचा विश्वास नाही हे आम्हाला माहित आहे. त्यांना राम सेतूचीही समस्या आहे. आता माझ्याबद्दल वाईट बोलण्यासाठी काँग्रेसने रामायणातून रावण आणला आहे,” असा हल्लाबोल मोदींनी खरगेंवर केला आहे.

“काँग्रेसने माझ्यावर टीका केल्याचं आश्चर्य वाटत नाही. पण, माझ्यावर खालच्या पातळीवर टीका करूनही काँग्रेसला आणि त्यांच्या नेत्यांना कधीही पश्चाताप आणि दु:ख झाले नाही. पंतप्रधानांबद्दल वाईट बोलणे, हा आपला हक्क आहे, असे काँग्रेसला वाटते. कारण, काँग्रेसचा लोकशाहीवर विश्वास असता तर ते कधीच या थराला गेले नसते. परंतु, त्यांचा लोकशाहीवर नाहीतर एका कुटुंबावर विश्वास आहे. एका कुटुंबाला खूश करण्यासाठी कोणत्याही स्तराला जाऊ शकतात,” अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली आहे.

हेही वाचा : स्वत: भाजपाच्या उमेदवार पण सासरेबुवांकडून काँग्रेसचा प्रचार! रवींद्र जडेजाच्या पत्नी रिवाबा म्हणाल्या “माझे सासरे…”

“मोदींना कोण जास्त वाईट शब्द बोलेल, यासाठी काँग्रेसमध्ये स्पर्धा सुरु आहे. मात्र, आता त्यांना धडा शिकवायचा आहे. त्यामुळे येत्या ५ तारखेला कमळाला मतदान करावे,” असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पंतप्रधान मोदी दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी कलोलमध्ये प्रचार करताना बोलत होते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi hits back mallikarjun kharge ravan jibe ssa
First published on: 01-12-2022 at 15:30 IST