Narendra Modi Mauritius trip Bihar Political impact : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिकडेच दोन दिवसांचा मॉरिशसचा दौरा केला. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना भोजपुरीमध्ये भाषणं केलं. त्याचं भाषण ऐकून तेथील भारतीयांनी जल्लोष करीत टाळ्यांचा कडकडाट केला. पंतप्रधानांच्या या भाषणामुळं राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या वर्षाच्या अखेरीस ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. पंतप्रधानांच्या या दौऱ्याचा संबंध थेट बिहारच्या निवडणुकीबरोबर जोडला जात आहे. त्यामागचं कारण म्हणजे, मॉरिशसला मिनी बिहार असंही म्हटलं जातं. १८३४ मध्ये बिहारमधील लोक मोठ्या संख्येनं या देशात करारबद्ध कामगार म्हणून स्थायीक झाले होते.

मोदींच्या मॉरिशस दौऱ्याचं महत्व काय?

पंतप्रधानांच्या मॉरिशस दौऱ्यादरम्यान, त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर भोजपुरी भाषेतील अनेक पोस्ट पोस्ट करण्यात आल्या होत्या, ज्या बिहारमधील भाजपाचे वरिष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर शेअर केल्या. यावेळी मोदींनी मॉरिशसचे पंतप्रधान नवीन रामगुलाम यांनाही मखाना भेट दिला, ज्याला बिहारमध्ये मोठी लोकप्रियता आहे. पंतप्रधान मोदींच्या मॉरिशस दौऱ्यादरम्यान एक महत्त्वाची गोष्ट दिसून आली. ती म्हणजे, या दौऱ्यात त्यांनी बिहार आणि तेथील लोकांचा अनेकदा उल्लेख केला. बिहारची भाषा, खाद्यपदार्थ आणि संस्कृती यावरही मोदींनी चर्चा केली.

आणखी वाचा : भारतीय चलनाचं ₹ हे चिन्ह बदलण्याचा अधिकार कुणाचा? स्टॅलिन यांना कारवाईला सामोरं जावं लागणार का?

मॉरिशसमध्ये भोजपुरी गाण्यानं मोदींचं स्वागत

विशेष म्हणजे, पंतप्रधान पोर्ट लुईस येथील विमानतळावर उतरले, तेव्हा तेथील महिलांनी पारंपारिक भोजपुरी गाणी गाऊन त्यांचं स्वागत केलं. या गाण्याला ‘गवई’ असं म्हटलं जातं. लग्न किंवा इतर आनंदाच्या समारंभात ते गायलं जातं. २०१६ मध्ये हे गाणं युनेस्कोच्या सांस्कृतिक वारशात समाविष्ट करण्यात आलं होतं. महिलांनी गायलेल्या गाण्याच्या ओळी काहीशा अशा होत्या – “राजा के सोभे ला माथे मौरिया, कृष्ण के सोभे ला हाथे बांसुरी, अहो राजा नाचेला नाचेला, कृष्ण बजावे बांसुरी.” या गाण्याचा मराठीत अर्थ – “राजाच्या डोक्यावर मुकुट शोभून दिसतो, कृष्णाच्या हातात बासरी छान दिसते, राजा नाचतो, कृष्ण बासरी वाजवतो”, असा आहे.

मॉरिशसमधील ५० टक्के भारतीयांची भाषा भोजपुरी

मॉरिशसबद्दल एक आश्चर्यकारक गोष्ट अशी की, त्यांच्या एकूण १२ लाख लोकसंख्येपैकी सुमारे ७० टक्के लोक भारतीय वंशाचे आहेत. त्यातील जवळपास ५० टक्के लोक भोजपुरी बोलतात. बिहारमधील किती जिल्ह्यांमध्ये भोजपुरी भाषेचा प्रभाव हे जाणून घेणंही महत्वाचं ठरेल. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, बिहारमधील १० जिल्ह्यांमध्ये भोजपुरी भाषा बोलली जाते. या दहा जिल्ह्यांमध्ये विधानसभेच्या एकूण ७३ जागा आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत, बक्सर, आरा, सासाराम आणि औरंगाबाद सारख्या भोजपुरी भाषिक जिल्ह्यांमध्ये भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवारांचा दारुण पराभव झाला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या मनात ही गोष्ट निश्चितच असेल.

मोदींच्या दौऱ्याचा बिहार निवडणुकीवर परिणाम होणार?

पंतप्रधान मोदींनी मॉरिशसमधील पंतप्रधानांना दिलेली मखाना भेटही बिहार विधानसभा निवडणुकीशी जोडली जात आहे. त्यामागचं कारण म्हणजे, फेब्रुवारीमध्ये मोदी सरकारनं केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला होता. तेव्हा सरकारनं बिहारमध्ये मखाना बोर्ड स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्यावेळीही अशी चर्चा होती की, भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून मल्लाह समुदायाच्या (मच्छीमार आणि खलाशी) मतांवर विशेष लक्ष्य केंद्रित केलं जात आहे.

पंतप्रधानांकडून नालंदा विद्यापीठाचा उल्लेख

मॉरिशसमधील भाषणात पंतप्रधान मोदींनी बिहारमधील नालंदा विद्यापीठाचाही आवर्जून उल्लेख केला. “बिहारशी तुमचे भावनिक नातं मलाही समजतं. जेव्हा जगातील अनेक लोक शिक्षणापासून वंचित होते, तेव्हा बिहारमध्ये नालंदासारखी जागतिक विद्यापीठाची स्थापना झाली. आमच्या सरकारनं नालंदा विद्यापीठ आणि त्याच्या उर्जेला पुनरुज्जीवित केलं आहे”, असं पंतप्रधान म्हणाले. गेल्या वर्षी पंतप्रधान मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे १७ देशांच्या राजदूतांना बिहारमधील राजगीर येथे घेऊन गेले होते, जिथे त्यांनी प्राचीन नालंदा विद्यापीठाच्या अवशेषांजवळील नवीन कॅम्पसचे उद्घाटन केले.

हेही वाचा : Bihar Sita Mandir : बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सीता मंदिराचा मुद्दा आणून अमित शाह यांनी राजकारणात कशी खळबळ उडवली आहे?

नालंदा विद्यापीठाची पुनर्बांधणी हा मोदी सरकारच्या धोरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. यावेळी पंतप्रधान मोदी महाकुंभातील संगमचे पाणीही आपल्याबरोबर घेऊन गेले होते. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी बिहारमधील आदिवासी समुदायाशी चर्चा करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी गयाना, फिजी, त्रिनिदाद, टोबॅगो, सुरीनाम आणि सेशेल्समध्ये स्थायिक झालेल्या भारतीय आदिवासी समुदायातील नागरिकांशी चर्चा केली होती. यावेळी पंतप्रधानांनी त्यांच्या समस्याही जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता.

गयानाच्या राष्ट्रपतींना मधुबनी चित्राची भेट

गेल्या वर्षी मोदींनी गयाना देशाला भेट दिली होती. तेव्हा त्यांनी राष्ट्रपती इरफान अली यांना मधुबनी चित्र भेट म्हणून दिलं होतं. पंतप्रधानांनी १८३८ मध्ये कॅरिबियन बेटांवर भारतीय करारबद्ध कामगारांच्या पहिल्या जहाजाच्या आगमनाच्या स्मरणार्थ बांधलेल्या स्मारकालाही मोदींनी भेट दिली होती. गयानामधील भारतीय वंशाचे एकूण ४३. ५ टक्के लोक राहतात. त्यातील बहुतांश लोक बिहारमधील आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या राष्ट्राध्यक्षा क्रिस्टीन कांगलू यांना भारतानं प्रवासी भारतीय दिवसाला प्रमुख पाहुण्या म्हणून आमंत्रित केलं होतं. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मॉरिशस दौऱ्याचा बिहारच्या निवडणुकीवर काय परिणाम होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.