scorecardresearch

Premium

“काँग्रेस शहरी नक्षलवाद्यांद्वारे चालवली जाते”, पंतप्रधान मोदींची टीका; पण सरकारचे म्हणणे वेगळेच

काँग्रेस आणि आम आदमी पक्षावर टीका करण्यासाठी भाजपाने ‘शहरी नक्षलवादी’ हा शब्द वापरला होता. शहरी नक्षलवादी कोणाला म्हटले जाते? असा प्रश्न संसदेत विचारला असता मार्च २०२० साली लेखी उत्तर देताना गृह मंत्रालयाने म्हटले की, असा शब्द सरकारने वापरलेला नाही.

Pm Narendra Modi in Bhopal
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळ येथे बोलत असताना काँग्रेसवर शहरी नक्षलवादाचा आरोप केला. (Photo – PTI)

“काँग्रेस पक्ष हा गंज आलेल्या लोखंडासारखा असून त्याचा ताबा आता ‘शहरी नक्षलवाद्यां’कडे आहे”, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी मध्य प्रदेशातील भोपाळ येथील जाहीर सभेत केला. “काँग्रेस पक्ष भाडेतत्त्वावर चालविण्यास दिला गेला असून त्याचे ‘कंत्राट’ शहरी नक्षलवाद्यांना मिळाले आहे. आता शहरी नक्षलवाद्यांकडून काँग्रेसची धोरणे आणि घोषणा तयार केल्या जातात, नेत्यांकडून नव्हे. शहरी नक्षल्यांकडे पक्षाचा ताबा गेल्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता जाणवत आहे. त्यामुळेच काँग्रेसची सगळीकडे पडझड होत आहे, असा आरोपही मोदी यांनी भोपाळच्या सभेत बोलत असताना केला.

जुलै आणि ऑगस्ट २०१८ मध्ये पुण्यातील एल्गार परिषदेच्या निमित्ताने देशभरातून अनेक कार्यकर्त्यांची अटक झाल्यानंतर ‘शहरी नक्षलवादी’ हा शब्द अधिक प्रचलित झाला. तेव्हापासून भाजपाने अनेकदा हा शब्द वापरला आहे. पुण्यातील एल्गार परिषदेनंतर (३१ डिसेंबर २०१७) भीमा कोरेगाव येथे हिंसाचार उसळला होता. या प्रकरणाशी संबंधित असलेल्या कार्यकर्त्यांचे अटकसत्र राबविण्यात आले होते, पोलिसांनी या लोकांना शहरी नक्षलवादी असा शब्द वापरला होता.

AAP-MP-Sanjay-Singh
‘कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही’, ‘आप’च्या संजय सिंह यांच्या अटकेनंतर काँग्रेसची भूमिका
Haryana-BJP-leader-Birendra-Singh
इंडिया आघाडी एकजुटीने लढली, तर भाजपाला मिळेल कडवी झुंज; भाजपा नेत्याचे स्पष्टीकरण
veerappa moily congress
ओबीसींना राजकीय प्रतिनिधित्व नसेल तर लोकशाहीला काहीही अर्थ नाही; काँग्रेस नेत्याची प्रतिक्रिया
Narendra Modi (9)
“काही अर्बन नक्षलवादी काँग्रेस पक्ष चालवतात, घोषणांपासून धोरणांपर्यंत…”, पंतप्रधान मोदींचं टीकास्त्र

हे वाचा >> काँग्रेसवर शहरी नक्षल्यांचा ताबा!; पंतप्रधानांची घणाघाती टीका; मध्य प्रदेश, राजस्थानात प्रचाराला धार

या वादात मध्यंतरी चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री यांनीही उडी घेतली होती. जे लोक शहरी नक्षलवाद्यांचे समर्थन करतात त्यांची यादी तयारी करावी, असे आवाहन अग्निहोत्री यांनी ट्विटरवरून केले होते.

नोव्हेंबर २०१८ मध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाने एक निवेदन काढले होते. ज्यात म्हटले, “पुढील सहा महिन्यात डाव्या विचारसरणीच्या कट्टरतावादाविरोधात प्रभावी आणि निर्णायक मोहीम राबवावी, असे निर्देश गृहमंत्री देत आहेत. शहरी नक्षलवादी आणि त्यांचे सूत्रधार यांच्यावर कारवाई केली जावी.” त्याच महिन्यात भाजपाचे खासदार मनोज तिवारी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ‘शहरी नक्षलवादी’ म्हटले. पत्रकार परिषदेत तिवारी म्हणाले, “काही शहरी नक्षलवादी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याचा कट रचत आहेत. अरविंद केजरीवाल हे शहरी नक्षलवादाचे सर्वात मोठे उदाहरण आहे.”

सुप्रसिद्ध कन्नड लेखक आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते गिरीश कर्नाड यांनी पत्रकार गौरी लंकेश यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या निषेध आंदोलनात “मीदेखील शहरी नक्षलवादी” (Me too Urban Naxal) असे फलक झळकावले. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

ऑक्टोबर २०१८ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी मेळाव्यात बोलत असताना सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, “शहरी माओवाद समाजात खोटा प्रचार करून द्वेष पसरवत होता. हे लोक (माओवादी) राष्ट्राच्या शत्रूकडून मदत घेतात आणि ते कुठेही गेले तरी राष्ट्राची बदनामी करत असतात. आपल्या अंध अनुयायांच्या पाठिंब्यावर राष्ट्रविरोधी नेतृत्व प्रस्थापित करणे हा शहरी नक्षलवाद्यांचा नवा डावा सिद्धांत आहे.”

शहरी नक्षलवाद सरकारचा शब्द नाही

तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार शांता छेत्री यांनी विचारलेल्या लेखी प्रश्नाला उत्तर देत असताना गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी मार्च २०२० मध्ये संसदेत सांगितले की, शहरी नक्षलवाद हा शब्द गृहखात्याने किंवा भारत सरकारने वापरलेला नाही. रेड्डी पुढे असेही म्हणाले की, सरकारचे राष्ट्रीय धोरण आणि कृती आराखड्यातून डाव्या विचारसरणीच्या कट्टरतावादाविरोधात भाष्य करण्यात येते. ज्यामध्ये शहरातील घडामोडींचाही समावेश होतो.

छेत्री यांनी प्रश्न विचारला होता की, गृह मंत्रालयाने शहरी नक्षलवादी आणि त्यांच्या सूत्रधारांविरोधात प्रभावी कारवाई केली, हे खरे आहे काय आणि मंत्रालयाने शहरी नक्षलवादी म्हणजे काय? तसेच त्याची व्याख्या नेमकी काय? तसेच शहरी नक्षलवादी या श्रेणीत कोण मोडतो, हे ठरविले आहे का?

हे वाचा >> शहरी नक्षलवाद : मिथक की वास्तव?

ऑक्टोबर २०२२ रोजी, गुजरातमधील भरूच जिल्ह्यातील बल्क ड्रग पार्कचे भूमिपूजन करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा शहरी नक्षलवादाचा विषय उपस्थित करून विरोधकांवर टीका केली होती. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाचा उल्लेख न करता मोदींनी ही टीका केल्याचे बोलले गेले. या निवडणुकीत आम आदमी पक्षाने आपले उमेदवार उभे केले होते. मोदी म्हणाले, “शहरी नक्षलवादी नव्या वेशात गुजरातमध्ये शिरत आहेत. त्यांनी त्यांचा वेश बदलला आहे. ते आमच्या भोळ्याभाबड्या युवकांची दिशाभूल करत आहेत. हे लोक परकीय शक्तीचे हस्तक म्हणून काम करत आहेत.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pm narendra modi says congress run by urban naxals a term used by bjp not by govt kvg

First published on: 26-09-2023 at 18:45 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×