उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी ( २८ जानेवारी, २०२६) विमान अपघातात निधन झाले. अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर महायुतीतील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा ही भाजपापेक्षा वेगळी आहे, परंतु, तरीही अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांचे वैयक्तिक तसेच राजकीय संबंध स्थिर होते. अजित पवारांना महायुतीत घेतल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला थोपवण्यात भाजपाला मदत मिळत होती. अजित पवारांनंतर राष्ट्रवादीतील नव्या नेतृत्वाबरोबर महायुतीतील भाजपा व शिवसेनेला (शिंदे) जुळवून घ्यावे लागणार आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजपाने २८८ पैकी १३२ जागा जिंकल्या होत्या. विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर भाजपा व एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मुख्यमंत्री पदासाठी ओढाताण सुरू होती. एकनाथ शिंदे यांनी काही अटींसह वाटाघाटी करत उपमुख्यमंत्री पद स्वीकारले. परंतु, त्यानंतर महायुतीत सहभागी झालेल्या अजित पवारांनी सरकारला कोणत्याही शर्तींशिवाय पाठिंबा दिला. महायुतीच्या स्थिरतेत अजित पवारांनी आणखी भर घातली होती. अजित पवार हे महायुतीत सहभागी झाल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला थोपवण्यात भाजपाला मदत मिळत होती.

देवेंद्र फडणवीसांसमोरील आव्हान वाढणार

अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ मध्ये सरकार स्थापनेसाठी पहाटेचा शपथविधी केला होता. तेव्हापासून दोघांमधील वैयक्तिक व राजकीय संबंध वाढत गेले. आता अजित पवार यांच्या अकाली निधनाने देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांशी फडणवीसांना नव्याने वाटाघाटी कराव्या लागू शकतात.

“माझा दमदार आणि दिलदार मित्र निघून गेला”, अशी प्रतिक्रिया अजित पवारांच्या निधनानंतर देवेंद्र फडणवीसांनी दिली होती. फडणवीस म्हणाले होते, “अजित पवार यांचा प्रशासकीय अनुभव व महाराष्ट्राचा अभ्यास यांमुळे सरकारला मोठी मदत मिळत होती.” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महायुती सरकारला निर्णय घेताना अजित पवारांचा अनुभव कामी येत होता, तो यापुढे मिळणार नाही.

भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने प्रतिक्रिया देताना म्हटले की, “अजित पवार यांच्यावर अवलंबून असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी हा मोठा धक्का आहे. अजित पवार यांच्या अनुपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पक्षांचं एकत्रीकरण होऊ शकतं.”

भाजपामधील अस्वस्थता

२०२३ मध्ये शरद पवार यांची साथ सोडत अजित पवार भाजपाबरोबर महायुतीत सहभागी झाले होते. भाजपाच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी अजित पवार यांचे स्वागत केले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह त्यावेळी अजित पवार यांना म्हणाले, “ही तुमची योग्य जागा होती, पण तुम्ही इथे येण्यासाठी खूप उशीर केला.” दरम्यान, राज्यातील भाजपात मात्र अजित पवार यांच्या येण्याने अस्वस्थता होती.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला फटका बसला. त्यावेळी भाजपातील काही नेत्यांनी अजित पवार यांना महायुतीत सहभागी करून घेतल्याने भाजपाचे नुकसान झाले, अशी प्रतिक्रिया दिली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत एका साप्ताहिकात भाजपाला लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात आलेल्या अपयशाची कारणमिमांसा करण्यात आली होती. त्यात सिंचन घोटाळ्याचा आरोप असलेल्या अजित पवारांना बरोबर घेतल्याने भाजपा कार्यकर्ते व समर्थकांनी युतीला नाकारले, असे म्हटले होते. दरम्यान, २०२३ मध्ये अजित पवार यांनी काका शरद पवार यांच्याविरोधात बंड करण्याच्या एका आठवड्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंचन घोटाळ्यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका केली होती.

२०१९ मध्ये उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले होते. महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा राजकीय प्रभाव कमी करण्यासाठी भाजपाने राष्ट्रवादीतील अजित पवार यांना बरोबर घेतले. अजित पवार यांची सत्तेत राहण्याची महत्वाकांक्षा आणि भाजपाचा महाविकास आघाडीला शह देण्याचा डाव या दोन राजकीय अपरिहार्यतेमुळे अजित पवार हे महायुतीत सहभागी झाले होते. अजित पवारांच्या पश्चात भाजपातील नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांबरोबर कसा ताळमेळ साधतात ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महायुती सरकारला अजित पवारांची कमतरता जाणवणार

अजित पवार यांच्या आर्थिक ज्ञानाचा तसेच प्रशासकीय अनुभवाचा महायुती सरकारला धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी फायदा व्हायचा. कृषी, सहकार, जल संधारण, ग्रामीण विकास या महत्वाच्या विभागांचा अजित पवारांकडे अनुभव होता. दरम्यान, मागील काही वर्षांपासून महायुतीत अजित पवार यांच्यासमोर अनेक अडथळे आले. बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्याशी संबंध असल्याने धनंजय मुंडे यांना मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. तर माणिक कोकाटे यांचे नाव एका घोटाळ्यात समोर आल्यानंतर त्यांनाही मंत्रि‍पदावरून पायउतार व्हावे लागले. राष्ट्रवादीच्या दोन मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला होता.

भाजपाच्या विजयानंतर अजित पवारांची सावध भूमिका

२०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाला जोरदार विजय मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सावध झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ग्रामीण भागात विस्तारलेला मानला जातो. त्या ग्रामीण भागात भाजपाचा वाढता प्रभाव राष्ट्रवादीसाठी एक इशारा होता. हा इशारा लक्षात घेऊन अजित पवार यांनी पुन्हा एकदा काका शरद पवार यांच्या संधान बांधणे सुरू केले होते. त्यातूनच पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी एकत्रीत लढवल्या होत्या. दरम्यान, अजित पवार यांचे मुख्यमंत्री पदाचे स्वप्न अपूर्ण राहिले. मुख्यमंत्रीपदाबाबत त्यांना अनेकदा पत्रकार परिषदेत विचारणा व्हायची. त्यावेळी ते म्हणायचे, “कार्यकर्ते जेव्हा मी मुख्यमंत्री व्हावं, अशा घोषणा देतात तेव्हा छान वाटतं. पण, वास्तव मला माहिती आहे. राजकारण हे आकड्यांवर चालतं.”