सुजित तांबडे

कसबा पोटनिवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाल्यानंतर या निकालाने पुण्यातील पक्षीय राजकारणामध्ये आगामी काळात उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपमधील अंतर्गत धूसफूस यानिमित्ताने चव्हाट्यावर आल्याने भविष्यातील महापालिका निवडणुकीत त्याचे पडसाद उमटणार आहेत. ,या साऱ्या घडामोडींनंतर शहरातील नेतृत्त्वबदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

Doordarshan logo, saffron logo,
दूरदर्शनचा भगवा लोगो… रंगांना राजकारणात एवढं महत्त्व का?
CJI Chandrachud says enactment of three new criminal laws
नवीन फौजदारी कायदे समाजासाठी ऐतिहासिक! न्याय व्यवस्थेचे नवीन युगात संक्रमण झाल्याची सरन्यायाधीशांकडून प्रशंसा
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
mumbai high court marathi news, cm eknath shinde marathi news
शहीदांच्या कुटुंबीयांप्रती मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा, शहीद मेजर सूद यांच्या पत्नीच्या मागणीबाबत उच्च न्यायालयाची टिपण्णी

हेही वाचा >>> बालेकिल्ल्यांमध्येच भाजपला पराभवांचे धक्के

काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा या मतदार संघातून झालेला विजय आणि भाजपचे हेमंत रासने यांना पत्करावा लागणारा मानहानीकारक पराभव हा सर्वच पक्षांसाठी राजकीय समीकरणे बदलविणारा ठरणार आहे. भाजपच्या राज्य पातळीवरील नेतृत्त्वाने पराभवाबाबतचा अहवाल मागितला असल्याचे सांगण्यात येते. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी प्रचाराच्या काळात पुण्यात तळ ठोकला होता. त्यामुळे हा अहवाल तयार करताना या दोघांचे म्हणणे विचारात घेतले जाणार आहे. कसबा विधानसभा मतदार संघात भाजपचे १६ नगरसेवक आहेत. त्यापैकी एकाही नगरसेवकाच्या प्रभागात भाजपला मताधिक्य मिळालेले नाही. त्यावरून संबंधित नगरसेवकांनी उमेदवाराचे काम केले नसल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यादृष्टीने भाजपने माहिती संकलित करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे रासने हे प्रतिनिधित्त्व करत असलेल्या शनिवार पेठ या प्रभागातही त्यांना मताधिक्य का मिळाले नाही, याचीही कारणमीमांसा या अहवालाद्वारे करण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी काळात भाजपच्या शहर नेतृत्त्वामध्ये बदलाची चिन्हे असल्याचे समजते.

काँग्रेसला नवसंजीवनी

या निकालानंतर मरगळलेल्या काँग्रेसला नवसंजीवनी लाभली आहे. रवींद्र धंगेकर यांच्या विजयानंतर अनेक वर्षांनंतर काँग्रेसमध्ये उर्जितावस्था आली आहे. कायम शुकशुकाट असलेले काँग्रेस भवन पुन्हा गजबजले. मात्र, काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत गटबाजी असल्याने ही गटबाजी थोपविण्याचे आव्हान असणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने कसब्याच्या निमित्ताने आगामी महापालिकेच्या प्रचाराची रंगीत तालीम करून घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसची या निवडणुकीत ‘नरो वा कुंजरो वा’ भूमिका होती. या पक्षाच्या नेत्यांनी या निवडणुकीची नामी संधी साधून पक्षाचा प्रचार करून घेतला. कसब्यामध्ये या पक्षाचे फारसे अस्तित्त्व नसले, तरी पक्ष वाढीसाठी ही निवडणूक कारणीभूत ठरली.

हेही वाचा >>> नागपूरकरांची मते जिंकण्यासाठी भाजप काय जादू करणार ?

या निवडणुकीत ठाकरे गटाने त्त्वेषाने काम केल्याने पुन्हा ‘मशाली’ पेटविण्यासाठी ऊर्जा या गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आली आहे. या मतदार संघात ठाकरे गटाची ताकद असल्याचे कार्यकर्त्यांनी दाखवून दिले.

शिवसेना शिंदे गटावर नामुष्की

या मतदार संघात शिवसेना शिंदे गटाची ताकद नाही. या पक्षाचे पुण्यातील प्रमुख नेते हे पुण्याच्या उपनगरी भागातील आहेत. त्यामुळे प्रचाराच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाण्यावरून कुमक मागवावी लागली. आता शिवसेना शिंदे गटाने आत्मपरीक्षण करून अस्तित्त्व दाखविण्याची वेळ आली आहे.

मनसेचा आत्मघातकी निर्णय

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) अवस्था ‘बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना’ सारखी झाली आहे. निवडणुकीची लढाई भाजप, शिवसेना शिंदे गट आणि महाविकास आघाडीमध्ये असताना मनसेने या लढाईत उडी घेऊन आत्मघातकीपणा केला. भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा प्रचार केला नाही म्हणून मनसेने पक्षातील काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर कारवाईचा आसूड ओढला. त्यामुळे पक्षांतर्गत नाराजी उफाळून आली आहे.