राजकारणात अनोळखी विदर्भात सहकार महर्षी म्हणून ओळख असलेल्या दिवंगत यादवराव पडोळे यांचे पुत्र डॉ. प्रशांत यादोराव पडोळे यांना भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली तेव्हा काँग्रेसप्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे ‘डमी’ उमेदवार म्हणून त्यांची टर उडविण्यात आली.

प्रशांत पडोळे यांची राजकीय क्षेत्रात विशेष ओळख नाही. उच्च वैद्यकीय शिक्षण युक्रेन येथून पूर्ण केल्यावर ते भंडारा येथे स्थायिक झाले. वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून त्यांनी गरिबांची सेवा अविरत सुरू ठेवली. २००५ पासून भंडारा जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्याच्या ठिकाणी ते वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केल आहे. तसेच सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत.

हेही वाचा…काँग्रेसचे वर्चस्व कायम राखले वसंतराव चव्हाण (नांदेड, काँग्रेस)

राजकीय क्षेत्रात त्यांनी २००५ साली पाऊल टाकले. भंडारा जिल्हा दुग्ध संघाची निवडणूक लढून त्यांनी संचालक म्हणून काम पाहिले. डॉ. पडोळे यांनी सन २०१४ मध्ये शिवसेनेच्या तिकीटावर साकोली विधानसभेची निवडणूक लढवली पण त्यांची अनामत जप्त झाली होती. लोकसभा निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने त्यांनी जिल्ह्यात संपर्क वाढविला होता. भाजपचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या मतदारसंघातून त्यांनी भाजपचा पराभव करून खासदारकी मिळवली आहे.