छत्रपती संभाजीनगर : राज्यातील प्रमुख पक्षांमध्ये झालेल्या फुटींमुळे व पक्षांतरांमुळे मराठवाड्यातील ४६ जांगापैकी जिंकलेल्या २२ जागांवरील उमेदवार प्रमूख पक्षांना बदलावे लागणार आहेत. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटास नऊ जागांवर, शरद पवार यांना सहा ठिकाणी उमेदवार बदलावे लागतील. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे तसेच विधान परिषदेतील फुटीनंतर काँग्रेसला जिंकलेल्या तीन जागांवर उमेदवार बदलावे लागणार आहेत. हरिभाऊ बागडे यांची राजस्थान राज्यपाल पदी नियुक्ती झाली असल्याने फुलंब्री मतदारसंघात भाजपला नवा उमेदवार शोधावा लागेल. परळीतील पंकजा मुंडे यांची भाजपची जागा आता कमी होईल. या मतदारसंघात आता राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होऊ शकते. मराठवाड्यातील ४६ मतदारसंघात भाजपचे वर्चस्व आहे. २०१९ मध्ये भाजपला १६ जागांवर यश मिळाले होते. जरांगे यांच्या आंदोनानंतर हे वर्चस्व टिकवून धरण्याचे आव्हान भाजप नेत्यांसमोर आहे. नुकतीच भाजपच्या कोअर कमेटीची बैठकही घेण्यात आली. या बैठकीस रावसाहेब दानवे, डॉ. भागवत कराड यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. भाजपने २०१९ मधील सर्व उमेदवार जशास तसे ठेवण्याचा निर्णय घेतला तरी भोकरमध्ये भाजपच्या उमेदवार म्हणून श्रीजया चव्हाण यांचे नाव पुढे केले जात आहे. पंकजा मुंडे आता विधान परिषदेमध्ये निवडून आल्याने परळीची जागेवरील दावा भाजपकडून सोडला जाईल. धनंजय मुंडे यांना ‘ महायुती’ पाठिंबा देण्यासाठी हे घडेल, असा दावा केला जात आहे. याशिवाय फुलंब्रीमध्येही हरिभाऊ बागडे यांच्या जागी नवा उमदेवार द्यावा लागणार आहे. आणखी वाचा-नितीश कुमारांची नक्कल करणे आरजेडी नेत्याला पडले महाग, विधान परिषदेतील सदस्यत्व रद्द; कोण आहेत सुनील सिंह? २०१९ च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला १२ जागांवर यश मिळाले होते. यातील नऊ आमदार फुटले. संजय शिरसाठ, प्रदीप जैस्वाल, रमेश बोरनारे, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार हे पाच जण तर उस्मानाबाद जिल्ह्यातील तानाजी सावंत, ज्ञानराज चौगुले, नांदेडमधील बालाजी कल्याणकर, हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर या नऊ जिंकलेल्या जागांवर उद्धव ठाकरे यांचा उमेदवारांचा शोध सुरू आहे. यातील औरंगाबाद पश्चिम म्हणजे आमदार संजय शिरसाठ यांच्या विरोधात लढण्यासाठी राजू शिंदे यांचा पक्ष प्रवेश घडवून आणण्यात आला. याच मतदारसंघातून शिवेसना नेते चंद्रकांत खैरे यांनाही निवडणूक लढवायची असल्याचे इच्छा त्यांनी नुकतीच व्यक्त केली. ठाकरे गटाच्या नेत्याचा सिल्लोडमधील उमेदवाराचा शोध संपलेला नाही. त्यामुळे ही जागा महाविकास आघाडीत बदलली जाऊ शकते. या मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध शिंदे सेना अशी लढत होण्याची शक्यता आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेने मराठवाड्यात २२ जागा लढविल्या होत्या. आणखी वाचा-‘आनंदाचा शिधा’ योजनेत पारदर्शकता; ठराविक ठेकेदारांची मक्तेदारी संपुष्टात; ठेका मिळविण्यासाठी नऊ कंपन्या स्पर्धेत राज्याच्या राजकारणातील दुसरी फूट राष्ट्रवादीमध्ये घडवून आणण्यात आली. या फुटीमध्ये शरद पवार यांच्या बाजूने मराठवाड्यात केवळ दोन आमदार राहिले. राजेश टोपे आणि संदीप क्षीरसागर वगळता निवडून आलेले बीड जिल्ह्यातील माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके, आष्टीचे बाळासाहेब आसबे, धनंजय मुंडे वसमतचे राजू नवघरे, अहमदपूरचे बाबासाहेब पाटील व उदगीरचे संजय बनसोडे असे सहा आमदार अजित पवार यांच्याबरोबर राहिले. या सहा मतदारसंघात शरद पवार यांना नवे उमेदवार शोधावे लागणार आहेत. शिवेसेनेच्या शिंदे गटासही एक उमेदवार नवा द्यावा लागेल. संदीपान भुमरे छत्रपती संभाजीनगरचे खासदार झाल्याने त्यांच्या पैठण मतदारसंघात त्यांचे चिरंजीव निवडणुकीची तयारी करत आहेत. विलास भुमरे यांना उमेदवारी मिळेल असा दावा केला जात आहे. फुटी व पक्षांतरामुळे सक्षम उमेदवारांची शोधाशोध सुरू असल्याने आता मराठवाड्यातील राजकारणाला गती मिळू लागली आहे.