सोलापूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सोलापूर जिल्ह्यातील राजकीय हालचालींसह विकास कामांचे श्रेय घेण्यावरून प्रमुख राजकीय पक्षांत संघर्ष वाढत आहे. करमाळा तालुक्यात एसटी बसस्थानकासाठी उपलब्ध झालेल्या विकास निधी आणि विकास कामांचे भूमिपूजन करण्यावरून सत्ताधारी शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटात चांगलीच जुंपली आहे. आगामी करमाळा विधानसभा निवडणुकीतील संघर्षाची ही नांदी मानली जात आहे. सोलापूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या आणि पुणे, अहमदनगर, नाशिक, नागपूर आदी महानगरांना जोडलेला करमाळा तालुका राजकीयदृष्ट्या नेहमीच संवेदनशील मानला जातो. माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते हे निवडून आल्यानंतर त्यांनी करमाळ्यासह संपूर्ण मतदारसंघात विरोधकांना नामोहरम करण्याचा प्रयत्न हाती घ्यायला सुरूवात केली. माढ्याचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ आमदार बबनराव शिंदे व त्यांचे धाकटे बंधू तथा करमाळ्याचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सहयोगी अपक्ष आमदार संजय शिंदे या दोन्ही पारंपारिक विरोधकांसह सांगोल्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार ॲड. शहाजीबापू पाटील आणि माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात ताकद वाढविण्यासाठी मोहिते-पाटील गट सक्रिय झाला आहे. या पार्श्वभूमीवर करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांच्या प्रयत्नांतून आणि सध्या तांत्रिकदृष्ट्या भाजपमध्ये असलेले आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या माध्यमातून करमाळा एसटी बसस्थानकाच्या विकासासाठी दोन कोटी तर नारायण पाटील यांच्या स्वतःच्या जेऊर गावातील एसटी बसस्थानकासाठी तीन कोटी ४२ लाख रूपयांचा विकास निधी उपलब्ध झाला आहे. यापैकी जेऊर एसटी बसस्थानकाच्या नूतनीकरणाचा शुभारांभ अमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते व माजी आमदार नारायण पाटील यांच्या हस्ते नुकताच झाला. हेही वाचा.जिलेबीचा गोडवा अन् बोरसुरी डाळीची फोडणी ! मतदारांना खुश करण्यासाठी असाही बेत तथापि, या भूमिपूजनास शिवसेना शिंदे गटाने आक्षेप घेतला असून केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केलेल्या विकास निधीतून करमाळा व जेऊर एसटी बसस्थानकात विकास कामे होत असल्याचा दावा शिवसेना शिंदे गटाचे माढा विभाग जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केला आहे. आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील हे भाजपचे असूनही त्यांनी करमाळ्यातील महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकू नये, अशा शब्दात चिवटे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जेऊर एसटी बसस्थानकाच्या विकास कामाचे भूमिपूजन शिवसेना शिंदे गटाचे ओबीसी व भटक्या विमुक्त विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब किसने यांच्याहस्ते तर करमाळा बसस्थानकात झालेल्या रस्ते काँक्रिटीकरण कामाचे लोकार्पणही शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार असल्याचे चिवटे यांनी परस्पर जाहीर केले आहे. यातून शिवसेना शिंदे गट आणि भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील आणि त्यांचेच अनुयायी; परंतु राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार नारायण पाटील यांच्यात जुंपली आहे. आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील हे वरकरणी, तांत्रिकदृष्ट्या भाजपमध्ये असले तरी करमाळ्याच्या राजकारणात ते भाजपविरोधी मोहिते-पाटील कुटुंबीयांचे प्रतिनिधित्व करतात. हेही वाचा.अपप्रचारांविरोधात व्यापक मोहीम राबवा करमाळ्याच्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासक मंडळावर यापूर्वी महेश चिवटे हे नियुक्त होते. परंतु आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील मंत्रालयात चाव्या फिरवून चिवटे यांचा समावेश असलेले प्रशासक मंडळ बरखास्त करून डॉ. वसंत मुंडे व इतरांची वर्णी लावली आहे. त्यामुळे चिवटे हे मोहिते-पाटील यांच्यावर दुखावल्याचे बोलले जाते. उल्लेखनीय म्हणजे या घडामोडीत मोहिते-पाटील यांचे मूळ विरोधक असलेले आमदार संजय शिंदे यांची भूमिका समोर आली नाही. तर नारायण पाटील यांची राष्ट्रवादी शरद पवार गटाने आगामी करमाळा विधानसभेची उमेदवारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यापूर्वीच घोषित केली आहे. त्यांनी मोहिते-पाटील यांच्या ताकदीवर करमाळा विधानसभा मतदारसंघात गावभेट दौरे वाढविले आहेत. खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनीही करमाळ्याशी संपर्क वाढविला आहे. त्यांना अजितनिष्ठ अपक्ष आमदार संजय शिंदे यांच्यापेक्षा शिवसेना शिंदे गटानेच अंगावर घेतल्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला आहे.