बाळासाहेब जवळकर 

आगामी पालिका निवडणुकांच्या तोंडावर आलेल्या आणि दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त वातावरणात साजरा होणाऱ्या यंदाच्या गणेशोत्सवात मतदारांशी थेट संवाद साधतानाच, कार्यकर्त्यांशी भेटीगाठी करण्याचा सपाटा सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी लावला आहे. वेळ कमी, परिसर मोठा आणि भेटू इच्छिणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने नेत्यांचीही दमछाक होताना दिसत आहे.

पालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. पालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी सर्वच पक्षांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यादृष्टीने शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. गणेशोत्सव हा मतदारांशी तसेच कार्यकर्त्यांशी गाठीभेटी घेण्याकरिता तसेच राजकीयदृष्ट्या वातावरणनिर्मितीसाठी पर्वणीचा काळ मानला जातो. त्यानुसार, गेल्या काही दिवसांपासून राजकीय पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या फौजफाट्यासह शहरभरातील गणेश मंडळांच्या गाठीभेठींचा सपाटा लावला आहे. गणेश मंडळांची आरती करणे, मंडळांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना हजेरी लावणे, प्रमुख कार्यकर्त्यांच्या घरी जाणे, जास्त संख्येने नागरिक उपस्थित असलेल्या ठिकाणी त्यांच्याशी संवाद साधणे या प्रकारचे कार्यक्रम प्राधान्याने सुरू आहेत.

राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, भाजपचे आमदार महेश लांडगे, युवा नेते शंकर जगताप आदींसह इतरही नेते याच कामात व्यग्र असल्याचे दिसून येते. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार शुक्रवारी (८ सप्टेंबर) पिंपरी-चिंचवडचा धावता दौरा करणार आहेत. यावेळी ते प्रमुख मंडळांना भेटी देणार आहेत. भोसरी गणेश महोत्सवात अनेक भिन्न राजकीय पक्षांचे नेते एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. त्याचप्रमाणे, पिंपरी पालिका कर्मचारी महासंघाच्या कार्यक्रमात श्रीरंग बारणे व शंकर जगताप एकत्र आल्याचे दिसून आले. गणेशोत्सवातील गाठीभेठी झाल्यानंतर याच पध्दतीने विसर्जनाच्या दिवशी मोक्याच्या ठिकाणी स्वागत कक्ष स्थापन करून अधिकाधिक मंडळांशी संपर्क साधण्याचे नेत्यांचे नियोजनही सुरू आहे.