कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांनी उमेदवारीचा दावा केला असला तरी हातकणंगले पाठोपाठ शिरोळ तालुक्यातून उमेदवारीला नव्याने आव्हान दिले जात आहे. उमेदवारी मिळवण्याचे प्रयत्न महायुतीतून सुरु आहेत. शिंदे गटाचे आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी त्यांचे बंधू संजय पाटील-यड्रावकर यांच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. शिवसेनेतून भाजपात आलेले संजय पाटील यांनी उमेदवारी समर्थनासाठी थेट दौराच सुरु केला आहे.

हातकणंगलेत मविआ आणि महायुतीच्या उमेदवारी निश्चितीची प्रक्रिया सुरूच आहे. स्वतंत्र लढण्याची भाषा करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मातोश्रीवर दोन वेळा धडक मारली असली तरी मविआने कोणताही निर्णय घेतला नाही. ठाकरे गटाचे सुजित मिणचेकर, सत्यजित पाटील, उल्हास पाटील या माजी आमदारांनीही सेनेला मतदारसंघ मिळावा असा रेटा लावला असल्याने कोंडी झाली आहे. महायुतीत देखील जागा, उमेदवारीचा वाद खदखदत आहे.

हेही वाचा – जरांगे यांच्या रविवारी होणाऱ्या बैठकीबाबत उत्सुकता, ‘मराठा मतपेढी’ दिशा देणार

माने विरोधात मोर्चेबांधणी

खासदार धैर्यशील माने यांनी राजकीय वादग्रस्त विधाने टाळत प्रचाराची सुरुवात केली आहे. त्यांच्याबाबत मतदारसंघात प्रतिकुल परिस्थिती असल्याचा मुद्दा पुढे करून उमेदवार बदलावा अथवा भाजपला जागा द्या अशी मागणी होत आहे. भाजपला जागा दिल्यास प्रामुख्याने हातकणंगले व शिरोळ तालुक्यातून अनेक बडी नावे पुढे येत आहेत. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक, आमदार प्रकाश आवाडे, राहूल आवाडे ही नावे चर्चेत आहेत. अलीकडे शिरोळ तालुक्यातून मयूर सहकार समूहाचे नेते संजय पाटील, जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर यांनी दंड थोपटले असल्याने संथ वाहणाऱ्या कृष्णाकाठचे राजकारण गतिमान झाले आहे. संजय पाटील यांनी शिवसेनेकडून निवेदिता माने यांच्या विरोधात २००४ सालाची लोकसभा निवडणूक लढवून सव्वातीन लाख मते खेचली होती. यड्रावकर आणि माने कुटुंबीय यांच्यात फारसे मधुर संबंध नाहीत. दोन्ही पाटीलांच्या मनात माने कुटुंबीयांविषयी अढी आहे.

यड्रावकरांचा तुल्यबळ लढतीचा दावा

सध्यस्थितीत मुख्यमंत्री शिंदे यांनी माने यांना हिरवा कंदील दाखवला असल्याचे या गटाच्यावतीने सांगितले जात आहे. तरीही माने यांना मोठा विरोध झाल्यास पर्याय गृहीत धरून संजय यड्रावकर यांचे नाव पुढे आले आहे. मुख्यमंत्री शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर असताना माजी मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी उमेदवार चर्चेत सहभागी करून घेतले जात नसल्याबद्दल जाहीरपणे नाराजी दर्शवली होती. त्याही पुढे जात यड्रावकर बंधूंनी शिंदे यांची मुंबईत भेट घेऊन सेनेच्यावतीने उमेदवारी देण्याची मागणी केली. साखर कारखाना, शिक्षण संस्था, सूतगिरणी यासह मंत्री, आमदार म्हणून केलेल्या विकास कामाच्या जोरावर शेट्टी यांना तुल्यबळ टक्कर देऊ शकतो. विशेषतः जैन समाजाच्या मतांची विभागणी होण्यासाठी यड्रावकरांची उमेदवारी कशी महत्त्वाची आहे, हेदेखील सांगितले आहे.

हेही वाचा – मनसेचे परप्रांतीयांविरोधातील ‘खळ्ळ्य खट्ट्याक’ बंद ? महायुतीसाठी भाजपची अट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संजय पाटील पुन्हा आखाड्यात

अलीकडे भाजपात प्रवेश केल्यावर मयूर संघाचे संजय पाटील यांना केंद्रीय रसायन व खत मंत्रालय, भारत सरकार केंद्रीय महामंडळाचे संचालकपद तर त्यांचे पुत्र अँड. सुशांत पाटील यांना भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिवपद देण्यात आले. पाटील यांनी भाजपाची उमेदवारी मिळण्यासाठी आमदार विनय कोरे, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे – आमदार प्रकाश आवाडे आधीच्या गाठीभेटी घेतल्या असून मतदारसंघात संपर्क वाढवला आहे. मराठा कार्ड, मतदारसंघात संपर्क, निवडणूक लढवण्याचा अनुभव यामुळे उमेदवारी फायदेशीर ठरेल असा युक्तिवाद त्यांच्या गटाचा आहे. खेरीज, सदाभाऊ खोत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार धैर्यशील माने यांची समोरच उमेदवारी देण्याची मागणी केली होती. त्यासाठी ते वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहेत.