वसई: नालासोपारा मतदारसंघात असलेले उत्तर भारतीयांचे वर्चस्व आणि वाढती मते लक्षात घेऊन शिवसेना शिंदे गटाने शनिवारी उत्तर भारतीय संवाद संमेलनातून जोरदार शक्तीप्रदर्शन केले. शिंदे गटाने ऐनवेळी भाजपाला गाफिल ठेवले. यामुळे भाजप नाराज होता. त्यातही संमेलनाच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करून डावलल्याने भाजप कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. त्यामुळे आता नालासोपारा मतदारसंघावरून भाजप आणि शिंदे गटात जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुमारे ५ लाख ६४ हजार मतदार असलेला नालोसापारा हा सर्वात मोठा मतदार संघ असून त्यात उत्तर भारतीयांचे मते सर्वाधिक आहेत. पालघर लोकसभा निवडणुकीत भाजपचे डॉ.हेमंत सवरा यांनी याच नालासोपार्‍यातून विजयी मताधिक्ये घेऊन खासदारकी मिळवली होती. नालासोपारा मतदार संघात लोकसभेच्या वेळी उत्तर भारतीयांची मते निर्णायक असल्याने शिवसेना आणि भाजप या दोघांचा यावर दावा आहे. शिंदे गटाने तर या मतदारसंघावर पकड मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हा समन्वयक नवीन दुबे यांचे नाव संभाव्य उमेदवार म्हणून पुढे करण्यात आले आहे. नवीन दुबे यांनी देखील ‘भावी आमदार’ म्हणून जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शनिवारी दुबे यांनी शिंदे गटातर्फे नालासोपार्‍याच्या मोरेगाव येथे उत्तर भारतीय संवाद संमेलन आयोजित केले. उत्तर भारतीय नेते व शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांनाच या संमेलनात उतरवून बाजी मारली. खासदार डॉ श्रीकांत शिंदे हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणारा होते. परंतु ठाण्यातील राड्यामुळे येऊ शकले नाही.

हे ही वाचा… कारण राजकारण: लोढांविरोधात लढण्यासाठी उमेदवाराचा शोध

संजय निरूपम यांनी संधी साधत उत्तर भारतीयांच्या अनेक मुद्द्यांना हात घातला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकांच्या हितासाठी राबविलेल्या योजनांची माहिती, उत्तर भारतीयांना निर्माण होत असलेल्या समस्या, उत्तर भारतीय भवन, अशा मुद्दयावर भाष्य केले. भूमाफियांनी येथील उत्तर भारतीय नागरिकांना फसविले असे सांगून सहानभूती मिळवली. याशिवाय महापालिकेकडून कर घेऊनही त्यांना सेवा दिली जात नाही याची चौकशी केली जाईल तसेच उत्तर भारतीय बांधवांची मुख्यमंत्री एकनाथ यांच्या सोबत बैठक लावून येथील समस्या जाणून घेतल्या जातील असेही निरुपम यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा… Assam : ‘खतं जिहाद’ अन् ‘जमीन जिहाद’नंतर आता आसामध्ये ‘पूर जिहाद’ होत असल्याचा आसामच्या मुख्यमंत्र्यांचा आरोप, नेमकं काय म्हणाले?

ऐनवेळी भाजपाला डावलले, शक्ती प्रदर्शनामुळे भाजपा नाराज

सुरवातील उत्तर भारतीय संमेलन घेणार असल्याचे भाजपाला शिदे गटाने सांगितले होते. मात्र अचानक कार्यक्रमाचे बॅनर आणि आमंत्रण पत्रिका तयार करताना भाजपाला वगळले. यामुळे भाजपाला धक्का बसला आणि त्यांनी संमेलनाकडे पाठ फिरवली. उत्तरभारतीयांचा कार्यक्रम आणि भाजपाला स्थान नसणे पक्षाच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे. उत्तर भारतीय संमेलनाच्या नावाखाली शिंदे गटाने केलेल्या या शक्तीप्रदर्शामुळे भाजप कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. भाजपाने संपूर्ण नालासोपारा मतदारसंघात आपल्या कार्यकर्त्यांचे जाळे विणले आहे. भाजपाने पूर्वीपासूनच या मतदारसंघावर हक्क सांगितला आहे. भाजपाचे उमेदवार डॉ हेंमत सवरा यांचा ७१ हजारांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे शिंदे गटाने परस्पर असे शक्तीप्रदर्शन करणे आणि ऐनवेळी भाजपाला डावलल्याने कार्यकर्ते दुखावले आहेत. नालासोपारा हा आमचा मतदारसंघ आहे. जागा वाटपही ठरले नसताना शिंदे गटाने असे शक्तीप्रदर्शन करणे हे युतीधर्माला अनुकूल नसल्याचे प्रतिक्रिया भाजपा नेत्यांनी दिली. २०१९ च्या निवडुकीत आमची जागा उध्दव ठाकरे यांनी हिसकावली होती. आता मात्र आम्ही ही जागा कुणाकडे जाऊ देणार नाही. नालासोपारा हा आमचाच हक्काचा मतदारसंघ आहे असे सांगून भाजपाने शिंदे गटाला ललकारले आहे. या शक्तीप्रदर्शनामुळे शिंदे गट आणि भाजपात दुरी निर्माण झाली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Power show of shiv sena shinde group in nalasopara claiming on constituency for assembly election 2024 print politics news asj 82poer show
Show comments