नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसची विदर्भात विशेष ताकद नसली तरी या भागातील या पक्षाचे नेते कायम चर्चेत राहिले आहेत. पूर्व विदर्भातील प्रफुल्ल पटेल हे त्यापैकीच एक.दिल्लीपर्यंत पोहोचणारी दोरी हातात ठेवणारे नेते म्हणून ते ओळखले जातात. कधीकाळी शरद पवार यांचे विदर्भातील विश्वासू सहकारी अशी त्यांची ओळख. पण सध्या ते पवार विरोधी गटाचे कार्यकारी अध्यक्ष आहेत.

पुढील काही महिन्यांत अजित पवार गटाचे भवितव्य आणि राज्यातील सत्तासमीकरणे ठरवताना त्यांची भूमिका निर्णायक ठरू शकते. जाहीर सभेत मोदींकडून गंभीर आरोप, नंतर काहीच वर्षात पटेल यांच्याडूनच मोदींनी स्वीकारलेले स्वागत यामुळे ते चर्चेत होते. अजित दादांच्या मृत्यूनंतर घडलेल्या घडामोडींमुळे ते संशयांच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

पूर्व विदर्भातील नक्षलप्रभावित जिल्ह्या असलेल्या गोंदियाचे प्रतिनिधीत्व पटेल करतात. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असा त्यांचा राजकीय प्रवास, नेत्यावर निष्ठा, त्यातून मिळालेल्या संधीतून सोयीचे राजकीय करण्यात पटेल पटाईत. अनेक वर्ष केद्रात मंत्री म्हणून काम करण्याचा अनुभव. याचा फायदा राष्ट्रवादीच्या विस्तारात किती झाला हा संशोधनाचा विषय असला तरी पक्षाची ताकद मर्यादित असतानाही त्यांचा राजकीय प्रवास मात्र दिल्लीपर्यत सुरूच राहिला.

विदर्भातील पवारांचे विश्वासू ते विरोधी

कधीकाळी शरद पवार यांचे विदर्भातील सर्वात विश्वासू सहकारी अशी पटेल यांची ओळख होती. लोकसभा पराभवानंतरही पवारांनी त्यांना केंद्रात मंत्रीपद देऊन राजकीय पुनर्वसन केले. आघाडी सरकारच्या काळात ते राष्ट्रवादीचे केंद्रीय मंत्री म्हणून ओळखले जात होते; विदर्भातील पक्षसूत्रे त्यांच्या हातात होती.मात्र २०२३ मध्ये पक्षात फूट पडली आणि अजित पवार यांनी स्वतंत्र गट स्थापन करत भाजपसोबत सत्ता वाटचाल सुरू केली, तेव्हा पटेल यांनीही शरद पवारांची साथ सोडली. हा निर्णय विदर्भातील पारंपरिक राष्ट्रवादी कार्यकर्त्यांसाठी धक्कादायक ठरला. पटेल यांची राजकीय दिशा बदलली, पण त्यांची ‘चर्चा’ मात्र कायम राहिली.

२०१९: मोदींची अप्रत्यक्ष टीका

पटेल राष्ट्रीय पातळीवर सर्वप्रथम चर्चेत आले ते २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी.तेव्हा मोदी यांची भंडारा जिल्ह्यात पटेल यांच्या विरोधाते भाजप उमेदवारासाठी प्रचार सभा घेतली व त्यामध्ये त्यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर त्यांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे टीका केली होती. ते म्हणाले होते “ येथील एका राजकीय नेत्याची जागा तुरुंगात आहे” मोदींनी प्रत्यक्ष नाव घेतले नसले, तरीही लक्ष्य कोण याबाबत राजकीय वर्तुळात शंका नव्हती, बोटे पटेल यांच्याकडेच होती. त्या विधानामुळे त्यांच्या प्रतिमेला धक्का बसला पटेल यांचे कोणाशी संबध आहे की त्यांना तुरुंगात जावे लागेल ? असा सवाल त्यावळी केला जात होता. त्याचा फटका पटेल यांना निवडणुकीत बसला होता.

गोंदिया विमानतळावरील मोदी भेटीमुळे चर्चा

२०१९ मध्ये ज्या मोदींनी पटेल यांच्यावर टीका केली होती, त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते. त्याच पटेल यांच्याकडून ५ नोव्हेंबर २०२३ मध्ये मोदींनी गोंदिया विमानतळावर स्वागत स्वीकारले होते. या घटनेची तेव्हा जोरदार चर्चा झाली होती. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार गट राज्यात भाजपसोबत सत्तेत सहभागी झाला होता व पटेल यांनी शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भाजपने त्यांना पवित्र करून घेतले अशी टीका त्यावेळी पटेल यांच्यावर झाली होती.

अजित पवार यांच्या मृत्यूनंतर

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) अध्यक्ष अजित पवार यांचा २८ जानेवारी रोजी विमान अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर तीनच दिवसांनी सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी झाला. या सर्व घडामोडींमागे पटेल आहेत, अशी टीका झाली, त्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले. त्यानंतर अजित पवार यांच्या विमान अपघातामागे घातपात आहे? अशी शंका घेताना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहीत पवार यांनी एका दूरध्वनीचा संदर्भ देत पूर्व विदर्भातील नेता म्हणून उल्लेख केला, तो नेता कोण असा सवाल पटेल यांचे राजकीय विरोधक व काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला.

राजकीय गणित: संधी की संशय?

पटेल यांची सध्याची भूमिका व्दिधा स्वरूपाची आहे, एकीकडे ते अजित पवार गटातील अनुभवी, संघटनकुशल आणि दिल्लीतील संपर्क असलेले नेते आहेत. दुसरीकडे, शरद पवार गटासाठी ते ‘घरातील विरोधक’ आहेत. अजित पवार यांच्या अनुपस्थितीत गटाचे नेतृत्व, सत्तासंतुलन आणि दिल्लीतील समीकरणे यावर त्यांचा प्रभाव वाढू शकतो. त्यामुळेच ते चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.