Prakash Ambedkar RSS Headquarters Protest : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आक्रमक भूमिकेसाठी ओळखले जातात. मंगळवारी त्यांनी मुंबईत जाहीर पत्रकार परिषद घेऊन केंद्रातील भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारवर हल्ला चढवला. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही प्रकाश आंबेडकर यांनी गंभीर आरोप केले. इतक्यावरच न थांबता, नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयासमोर आंदोलन करण्याची घोषणाही त्यांनी केली. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर अचानक आक्रमक का झाले? त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर काय आरोप केले? त्याविषयीचा हा सविस्तर आढावा…

प्रकाश आंबेडकरांचे आरोप काय?

देशाच्या सार्वभौमत्व आणि आर्थिक स्वायत्ततेशी तडजोड केल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीने नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयासमोर मोठे आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर १० मार्च रोजी मुंबईतल्या फोर्ट परिसरातील ठाकरसी हाऊस येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत २३ मार्च रोजी आरएसएस मुख्यालयासमोर धरणे आंदोलन आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीनंतर बोलताना अ‍ॅड्. प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तीव्र टीका केली. देशाच्या आर्थिक धोरणांपासून ते राजकीय निर्णयांपर्यंत अनेक बाबतीत सरकारने शरणागती पत्करल्याचा आरोप त्यांनी केला.

आरएसएसच्या मुख्यालयावर मोर्चा कशासाठी?

अ‍ॅड्. आंबेडकर म्हणाले की, भारत सरकार एकंदरीत ‘सेल आऊट’ झालेले आहे. हा केवळ आर्थिक सेल आऊट नाही, तर देशाचे सार्वभौमत्वही गहाण ठेवण्यात आले आहे. आर्थिक बाजारपेठवरील आपला ताबा सोडण्यात आला आहे. तसेच राजकीय निर्णय घेण्याची शक्तीही दुसऱ्यांच्या प्रभावाखाली गेली आहे. अमेरिकेने भारताला केवळ ३० दिवसांसाठी पेट्रोलियम उत्पादने खरेदी करण्याची परवानगी दिल्याची बाब देशाच्या धोरणात्मक स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते. या सर्व घडामोडींमुळे भारताची राजकीय स्वायत्तता अमेरिकेकडे गहाण ठेवली गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत देशाच्या हिताचे प्रश्न उपस्थित करणे आवश्यक आहे. त्यामुळे २३ मार्च रोजी नागपूर येथील आरएसएस मुख्यालयासमोर धरणे आंदोलन आयोजित केले जाणार आहे. आरएसएसला आम्ही विचारणार आहोत की, अशा प्रकारच्या दबावाखाली असलेल्या व्यक्तीला तुम्ही देशाच्या पंतप्रधानपदी कसे ठेवू शकता?

आणखी वाचा : मुख्यमंत्रिपद सोडल्यानंतर पुढे काय? नितीश कुमार कोणत्या वाटेवर? बिहारमध्ये काय घडणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही केलं लक्ष्य

पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करताना आंबेडकर म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी देशाचे सार्वभौमत्व अमेरिकेकडे गहाण ठेवले आहे. अमेरिकेतील बाललैंगिक गुन्ह्याशी संबंधित एपस्टीन फाईलमध्ये त्यांचे नाव आलेले आहे. या प्रकरणात नाव आलेल्या जगभरातील अनेक देशांनी आपापल्या नेत्यांना पदावरून पायउतार केले आहे. मात्र, मोदी यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही आणि त्यांनी खुद्द या प्रकरणाचा खुलासा केलेला नाही. त्यामुळे अशा व्यक्तीला देशाच्या पंतप्रधानपदी कसे काय ठेवू शकता, याचा जाब आम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विचारायचा आहे. राज्यासह देशातील मध्यमवर्गीय नागरिकांनी या आंदोलनात सामील व्हावे, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या आर्थिक निर्णयांमुळे सर्वसामान्य जनतेवर गंभीर परिणाम होत आहे. आगामी काळात देशातील बँकिंगसह अनेक औद्योगिक क्षेत्रांवर हा परिणाम आणखी तीव्र स्वरूपात दिसून येईल, असा दावाही त्यांनी केला.

वंचितच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा

प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनादेखील पत्र लिहून एपस्टीन फाईलप्रकरणी मोदी यांच्या विरोधातील आंदोलनात सहभागी होण्याची विनंती केली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या मते, अलीकडेच अमेरिकेच्या ऑफिस ऑफ फॉरेन ॲसेट्स कंट्रोल (OFAC) या संस्थेने जारी केलेल्या ‘जनरल लायसन्स १३३’मुळे भारताला रशियाकडून कच्चे तेल आणि पेट्रोलियम उत्पादने खरेदी करण्याची मुभा देण्यात आली आहे. या निर्णयामुळे भारताच्या आर्थिक आणि धोरणात्मक स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचा आरोप पक्षाने केला आहे. त्यांच्या या आंदोलनाला काँग्रेस पक्षानेही पाठिंबा दर्शविला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी मांडलेली भूमिका ही काळाची गरज आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली २३ मार्च रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या आंदोलनाला काँग्रेस पक्षाचा पूर्ण पाठिंबा राहील. त्यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या कार्यक्रमात काँग्रेस सक्रियपणे सहभागी होईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

हेही वाचा : मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून कसे हटवले जाते? नेमकी काय असते प्रक्रिया?

आरएसएस-मोसादचा संबंध असल्याचा आरोप

मुंबईतील पत्रकार परिषदेनंतर प्रकाश आंबेडकर यांनी लोकशाही मराठी या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यादरम्यान त्यांनी इराण व इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षावर भाष्य करताना भारताच्या परराष्ट्र धोरणावर टीका केली. इराणने सातत्याने काश्मीरच्या प्रश्नावरून भारताला पाठिंबा दिलेला असून, मुस्लीम राष्ट्रांच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतलेली आहे. दुसरीकडे इस्रायलने आपल्याला फक्त दोन ते तीन वेळा हत्यारे दिली असून, त्यापलीकडे काहीही दिलेले नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि इस्रायलच्या ‘मोसाद’ या गुप्तचर संघटनेचे घनिष्ठ संबंध असल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. नरेंद्र मोदी यांच्याकडून मध्यमवर्गीयांना फक्त स्वप्न दाखवले जात आहे. देशात जातवर्चस्व पुन्हा उभे करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. मात्र, मी मध्यमवर्गीयांना सांगू इच्छितो की, आणखी १५ दिवसांनंतर या सर्वांचा फटका तुम्हाला बसणारच आहे. घरगुती गॅस सिलिंडरचे भाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील लोक स्वत:ला सुसंस्कृत समजतात, मग त्यांचा पंतप्रधान सुसंस्कृत का नाही, याबाबत आम्ही सरसंघचालक मोहन भागवत यांना जाब विचारणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.