कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदार संघाच्या आगामी ( २०२९) निवडणुकीसाठी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी माजी खासदार संजय मंडलिक हेच उमेदवार असतील असे सांगून उमेदवारीबाबत आतापासूनच सूतोवाच केले आहे. पाठोपाठ आता हातकणंगले लोकसभा मतदारसंघात भाजपने उमेदवारी दिल्यास निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे विधान इचलकरंजीचे माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी केले आहे. यामुळे या मतदारसंघात एकनाथ शिंदे शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने आणि भाजपचे माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्यातील जुना संघर्ष पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत.
लोकसभा निवडणूक होण्यास अद्याप तीन वर्षाचा अवधी असताना कोल्हापूर आणि हातकणंगले या जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदार संघात आतापासूनच प्राथमिक हालचाली सुरू झाल्याचे दिसत आहे. भाजपच्या पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान अंतर्गत हातकणंगले व वडगाव मंडल प्रशिक्षण वर्गासाठी प्रकाश आवाडे यांना मार्गदर्शनासाठी निमंत्रित केले होते. यावेळी प्रकाश आवाडे यांनी भाजपकडून हातकणंगले लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून पक्षाकडे मागणी करणार आहोत. पक्षाने उमेदवारी दिल्यास निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचे विधान केले होते.
माने – आवाडे वादाला उकळी
आवाडे यांच्या या विधानामुळे माने – आवाडे यांच्यातील पारंपारिक संघर्ष नव्याने उफाळून येण्याची चिन्हे आहेत. या मतदारसंघात धैर्यशील माने यांच्यापूर्वी त्यांच्या मातोश्री निवेदिता माने व त्यांचे आजोबा बाळासाहेब माने यांनी निवडणुका जिंकल्या आहेत. प्रकाश आवाडे यांचे वडील कल्लाप्पाण्णा आवाडे यांनीही या मतदारसंघात दोनदा निवडणूक जिंकली आहे. यापूर्वी निवेदिता माने – कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्यातील लोकसभा लढत एक विजय – एक पराभव अशा समान पातळीवर सुटला आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकी वेळी प्रकाश आवाडे यांनी लोकसभेची जय्यत तयारी केली होती. तथापि महायुती अंतर्गत चर्चेतून आवाडे यांना थांबावे लागले व माने यांना उमेदवारी मिळाली होती. आता पुन्हा एकदा धैर्यशील माने – प्रकाश आवाडे यांच्यामध्ये लोकसभा निवडणुकीत लढण्यावरून संघर्ष होण्याची चिन्हे आहे. प्रकाश आवाडे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचे सुतोवाच केल्यानंतर लगेचच माने गटाकडून इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील भावी आमदार वेदांतिका धैर्यशील माने अशा आशयाच्या संदेश मतदारसंघात झळकवायला सुरुवात केली. तुम्ही लोकसभा मतदारसंघात आक्रमण करत असाल तर आम्हीही इचलकरंजीत तेच करू असा इरादा माने गटाकडून व्यक्त केला गेला आहे.
आवाडेंचे समीकरण कसे?
प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात सहावेळा प्रतिनिधित्व केल्यानंतर गेल्यावेळी पुत्र राहुल आवाडे यांना जिल्ह्यात सर्वाधिक मतांनी निवडून आणले. राहुल आवाडे यांचे व्याही राजेंद्र पाटील यड्रावकर हे शिरोळचे आमदार आहेत. कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या दोन्ही लोकसभा विजयासाठी आमदार विनय कोरे यांनी मदत केली होती. शिराळ्यातील भाजपचे आमदार सत्यजित देशमुख यांची मदत मिळेल असाही त्यांचा होरा आहे. वाळवा, शिराळा येथील जैन समाज बांधव पाठीशी राहण्याचा त्यांना विश्वास आहे. या आधारे लोकसभा निवडणूक जिंकण्याचे समीकरण प्रकाश आवाडे यांच्या नजरेसमोर दिसत आहे. हातकणंगलेतील काँग्रेसचे माजी आमदार राजू आवळे व राहुल आवाडे यांचे जवळचे सहकारी, नवमहाराष्ट्र सूतगिरणीचे अध्यक्ष राजू मगदूम या कुटुंबातील विवाहसंबंध घडवून आणण्यात प्रकाश आवाडे यांचा महत्वाचा सहभाग असल्याने ती राजकीय सहानुभूती सोबत राहील असाही एक अंदाज बांधला जात आहे.
जागा वाटपाचा तिढा
उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादामुळे धैर्यशील माने प्रथम लोकसभेत गेले. नंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांची साथ धरली. गेल्या वेळी ते शिंदे यांच्या ‘अर्थ’पूर्ण प्रचार यंत्रणेमुळे निवडून आले. सध्या हातकणंगले मतदारसंघ शिंदे सेनेकडे असल्याने त्यांचा मतदारसंघावरील दावा कायम राहणार आहे. त्यामुळे येथे प्रथम भाजपला हा मतदारसंघ आपल्याकडे वळवून घेण्याचा कठीण अडथळा पार करावा लागेल. शिवाय, प्रसंग पडला तर धैर्यशील माने हे भाजप कडून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतील अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत धैर्यशील माने हे अन्य विधानसभा मतदारसंघात पिछाडीवर असल्याने पराभवाच्या छायेत होते पण त्यांचा विजय सुकर झाला तो केवळ इचलकरंजीतील भाजप आणि आवाडे यांच्या संयुक्त ताकदीमुळे ; ही बाब अधोरेखित करणारी!
