सोलापूर : सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करून निवडून आलेल्या काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी याअगोदर सलग तीनवेळा प्रतिनिधित्व केलेल्या सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात त्यांचे उत्तराधिकारी म्हणून संधी मिळण्यासाठी काँग्रेसमध्ये मोठी भाऊगर्दी झाली आहे. या मतदारसंघातून आमदारकीचे स्वप्न रंगवत १८ जणांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. यात ज्या त्या समाजाची नावे पुढे करून दावे केले जात आहेत. विधानसभा निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर झालेला नसताना उमेदवारीसाठी सुरू झालेली अहमअहमिका पाहता काँग्रेसची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. एकीकडे सोलापूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा दिल्याच्या मोबदल्यात खासदार प्रणिती शिंदे यांचा रिकामा झालेला हक्काचा सोलापूर शहर मध्य मतदारसंघावर माकपचे नेते, माजी आमदार नरसय्या आडम यांनी यापूर्वीच दावा सांगितला आहे. त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आदींना भेटून साकडे घातले आहे. एवढेच नव्हे ही जागा आपणासच सुटणार, हे गृहीत धरून आडम यांनी प्रचारही सुरू केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये सोलापूर शहर मध्यच्या जागेचा तिढा कायम असताना दुसरीकडे याच महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार पक्षासह शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्याही काही स्थानिक नेत्यांनी हा मतदारसंघ आपल्यासाठी सुटावा म्हणून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे राजकीय गोंधळाची स्थिती दिसत असताना त्यातून यथावकाश मार्ग काढला जाण्याची अपेक्षा आहे. हेही वाचा - मुंबई महानगरपालिका आयुक्त निवडणूक निर्णय अधिकारी; लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची जबाबदारी या पार्श्वभूमीवर आता स्वतः काँग्रेस पक्षाच्या छोट्या-मोठ्या नेते व कार्यकर्त्यांनीही या मतदारसंघावर उमेदवारीचा दावा करीत तशी पक्षाकडे थेट मागणी केली आहे. यात पक्षाचे शहराध्यक्ष चेतन नरोटे व कार्याध्यक्ष तथा माजी महापौर संजय हेमगड्डी यांच्यासह १८ जणांनी आपापले घोडे दामटायला सुरुवात केली आहे. मुस्लीम आणि मोची समाजातून उमेदवारीचा जोरदार आग्रह होत असून इतरांना संधी दिल्यास पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही देण्यात मागेपुढे पाहिले जात नसल्याचेही पाहायला मिळत आहे. मुस्लीम समाजातून माजी महापौर आरीफ शेख यांच्यासह अन्य सहाजणांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. तर अनुसूचित प्रवर्गात मोडल्या जाणाऱ्या मोची समाजातून माजी महापौर संजय हेमगड्डी, महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती देवेंद्र भंडारे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास करगुळे आदींनी हक्क सांगितला आहे. उमेदवारीसाठी मुस्लीम व मोची समाजाच्या बैठकांचे सत्र सुरू असून त्या माध्यमातून जोर लावला जात असल्याचे दिसून येते. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात मुस्लीम समाजाचा मोठा प्रभाव असून त्याखालोखाल तेलुगू समाजाची ताकद दिसून येते. मोची समाजही प्रभावशाली मानला जातो. याशिवाय लोधी, आंबेडकरी समाज, धनगर, भटके विमुक्त जाती-जमाती व अन्य समाजाचे मतदार आहेत. याच मतदारसंघातून मुस्लीम मतदारांच्या जोरावर एमआयएम पक्षाने यापूर्वी २०१४ आणि २०१९ अशा दोन्हीवेळा तगडे आव्हान देऊन काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना अक्षरशः झुंजविले होते. लोकसभा निवडणुकीत एमआयएम पक्षाने तटस्थ राहणे पसंत केले होते. हेही वाचा - गडचिरोलीत जागा वाटपाआधीच आघाडी, युतीत कुरघोड्या! आतापर्यंत भाजप-शिवसेनेच्या तत्कालीन युतीच्या जागा वाटपात सोलापूर शहर मध्यची जागा शिवसेनेकडे होती. त्याचा विचार करता शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख तथा आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे बंधू प्रा. शिवाजी सावंत हे या जागेवर डोळा ठेवून आहेत. तथापि, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांना त्यांच्या हक्काच्या शहर मध्य विधानसभा क्षेत्रात रोखले होते. धार्मिक ध्रुवीकरणासह अन्य डावपेच आखण्यात भाजपला यश आले होते. परिणामी, लोकसभा लढतीत याच शहर मध्यमध्ये खासदार प्रणिती शिंदे यांना अवघ्या ७९६ मताधिक्यावर समाधान मानावे लागले होते. या पार्श्वभूमीवर आता भाजपने या मतदारसंघात पुन्हा जोर लावला आहे. भाजपच्या संभाव्य धार्मिक ध्रुवीकरणासारख्या राजकीय प्रयोगाचा विचार करता आणि लोकसभा लढतीत मिळालेल्या अत्यल्प मताधिक्याचा विचार करता काँग्रेसकडून मुस्लीम समाजातील कार्यकर्त्याला कितपत संधी देताना विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागणार आहे. दुसरीकडे एमआयएम पक्षाशीही टक्कर द्यायची आहे. इकडे भाजपने मोची समाजात शिरकाव करून काँग्रेसची ही मतपेढी फोडण्याचा डाव आखला आहे. त्यादृष्टीनेही काँग्रेसची डोकेदुखी वाढणार असल्याचे मानले जाते.