Prashant Kishor Bankipur victory and RJD Political Crisis : आठ महिन्यांपूर्वी पार पडलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसल्यानंतर आता बांकीपूरमधील निकालामुळे राष्ट्रीय जनता दलासमोरील (RJD) संकट आणखी गडद झाले आहे. २४३ सदस्यांच्या बिहार विधानसभेत आरजेडीच्या जागा ७५ वरून थेट २५ वर आल्या होत्या. आता नुकत्याच झालेल्या बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीतही आरजेडीला पराभवाचा सामना करावा करावा लागल्याने पक्षासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

बांकीपूरमध्ये जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी सत्ताधारी भाजपाचे उमेदवार नीरज कुमार सिन्हा यांचा १९ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला; तर आरजेडीच्या रेखा कुमारी गुप्ता मात्र मोठ्या फरकाने मागे राहिल्या, त्यांचं डिपॉझिटही जप्त झालं.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन हे सलग पाच वेळा बांकीपूर मतदारसंघातून निवडून आले होते. नितीन नबीन यांची राज्यसभेवर नियुक्ती झाल्याने ही जागा रिक्त झाली होती. विशेष म्हणजे नोव्हेंबर २०२५ च्या विधानसभा निवडणुकीत याच बांकीपूर मतदारसंघात रेखा कुमारी गुप्ता दुसऱ्या क्रमांकावर होत्या; तर नितीन नबीन यांनी ही जागा जिंकली होती. त्यामुळे पोटनिवडणुकीत रेखा कुमारींचा मोठ्या फरकाने पराभव होणे आणि डिपॉझिट जप्त होणे ही आरजेडीसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

अवघ्या दोन आठवड्यांपूर्वी आरजेडीला आणखी एक मोठा धक्का बसला. पक्षाचे राज्य प्रवक्ते व पक्षाचा प्रमुख चेहरा असलेले मृत्युंजय तिवारी यांनी आरजेडी सोडून भाजपामध्ये प्रवेश केला आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आरजेडीमध्ये विविध स्तरांवर असंतोष वाढत असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दी इंडियन एक्स्प्रेसला दिली आहे. पक्षाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते शक्ती सिंह यादव यांच्याबाबतही काही वरिष्ठ नेत्यांमध्ये नाराजी असल्याचे सांगितले जाते. शक्ती सिंह यादव हे पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष व विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी प्रसाद यादव यांच्या जवळचे मानले जातात.

गेल्या काही महिन्यांत आरजेडीच्या दोन प्रमुख नेत्यांनी पक्षाच्या ‘मनमानी कारभारावर’ उघडपणे नाराजी व्यक्त केली, असे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी आरजेडी अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांची कन्या रोहिणी आचार्य यांनी त्यांचे भाऊ तेजस्वी यादव यांच्याविरोधात भूमिका घेतली होती. राज्यसभा खासदार संजय यादव यांचा पक्षातील वाढता प्रभाव आणि तेजस्वी यादव यांच्यावर संजय यांचा ‘अतिरिक्त प्रभाव’ असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता. त्याच वेळी मनेरचे आमदार भाई वीरेंद्र यांनीही पक्षातील “कारभार काही मोजक्या नेत्यांच्या हातात आहे” असे म्हणत वारंवार नाराजी व्यक्त केली आहे.

आरजेडीमध्ये मोठा फेरबदल

या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आरजेडीचे प्रदेशाध्यक्ष मंगनी लाल मंडल यांनी जिल्हा, तालुका आणि पंचायत स्तरावरील पक्षाच्या सर्व समित्या बरखास्त केल्या आहेत. पक्षाने गेल्या वर्षाच्या सुरुवातीला माजी खासदार व प्रमुख ईबीसी नेते असलेल्या मंगनी लाल मंडल यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली होती. त्याआधी ज्येष्ठ नेते जगदानंद सिंह यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता.

आरजेडीच्या एका वरिष्ठ नेत्याने दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, पक्षाच्या स्थानिक समित्यांमध्ये वेळोवेळी फेरबदल करणे किंवा त्या बरखास्त करणे हा पक्षनेतृत्वाचा अधिकार आहे. मात्र, सध्याच्या निर्णयावर पक्षाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.

याच नेत्याने पुढे नमूद केले की, २०२० मध्ये आरजेडीचे ७५ आमदार होते. २०२५ च्या विधानसभा निवडणुकीत ही संख्या घसरून २५ वर आली. म्हणजेच पक्ष पुन्हा २०१० च्या स्थितीत पोहोचला आहे. २०१० मध्ये आरजेडीला केवळ २२ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे मतदारांमधील पक्षाचा प्रभाव कमी होत असल्याचे स्पष्ट दिसते, असे या नेत्याने म्हटले.

आरजेडीच्या दुसऱ्या एका नेत्याने सांगितले की, बांकीपूरची जागा आरजेडीने यापूर्वी कधीही जिंकलेली नव्हती. मात्र, यावेळी निवडणुकीत पक्षाला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आणि उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले. विशेष म्हणजे पहिल्यांदाच निवडणूक लढवणारे प्रशांत किशोर विजयी झाले. त्यामुळे पक्षात तातडीने यावर विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

आरजेडीच्या आणखी एका नेत्याने सांगितले की, नव्या समित्या तयार करताना पक्षाने लोकशाही पद्धतीचा अवलंब करावा आणि तळागाळात पक्षासाठी काम करणाऱ्या सक्रिय कार्यकर्त्यांना संधी द्यावी. भाई वीरेंद्र यांनी पक्षातील काही मोजक्या नेत्यांच्या वर्चस्वाबाबत जी नाराजी व्यक्त केली आहे, त्याकडेही पक्षनेतृत्वाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

तेजस्वी यादव यांनीही कार्यकर्ते आणि नेत्यांसाठी अधिक सहजपणे उपलब्ध राहण्याची गरज आहे. पक्षाला जेव्हा त्यांची सर्वाधिक गरज असते, त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांपासून दूर राहणे टाळले पाहिजे, असेही या नेत्याने नमूद केले आहे. त्यांनी पुढे असेही म्हटले, “प्रशांत किशोर यांना हलक्यात घेता येणार नाही. बिहारच्या राजकारणात नितीश कुमार यांच्यानंतर प्रशांत किशोर हे एनडीएविरोधातील प्रमुख विरोधी पर्याय म्हणून पुढे येण्याची क्षमता ठेवतात.”

प्रशांत किशोर यांना फायदा कसा झाला?

भाजप आणि आरजेडी या दोन्ही पक्षांच्या पारंपरिक मतदारांमधील फूट प्रशांत किशोर यांच्या पथ्यावर पडली. भाजपाला साथ देणाऱ्या सवर्ण समाजातील मोठ्या वर्गाने प्रशांत किशोर यांच्या बाजूने मतदान केले. त्याचबरोबर ओबीसी समाजातील मोठ्या वर्गानेही त्यांना पाठिंबा दिला. विशेष म्हणजे आरजेडीचा पारंपरिक मुस्लिम-यादव (M-Y) मतदारांचाही काही भाग जनसुराज पक्षाच्या बाजूने उभा राहिला.

आरजेडीसमोर मोठे आव्हान

२०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आरजेडीसमोर एक गंभीर संघटनात्मक संकट उभे राहिल्याचे राजकीय निरीक्षक सांगतात.

पक्षाचा पारंपरिक मुस्लिम-यादव मतदारांचा आधार कमी होणे आणि त्याच वेळी प्रशांत किशोर यांचा सक्रिय राजकारणातील प्रवेश यांमुळे आरजेडीची चिंता वाढली आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये आणि प्रवक्त्यांमध्येही मतभेद आहेत. त्यामुळे पक्षातील एकजूट दाखवून देणे आणि सत्ताधारी एनडीएविरोधात प्रभावी राजकीय भूमिका मांडणे, हे आरजेडीसमोरचे मोठे आव्हान बनले आहे.