Prashant Kishor Bankipur Bypoll Win BJP Defeats : बिहारमधील बांकीपूर मतदारसंघातील पोटनिवडणुकीत सत्ताधारी भाजपाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची राज्यसभेवर निवड झाल्याने येथे पोटनिवडणूक घेण्यात आली होती. या निवडणुकीत जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी सत्ताधारी पक्षाच्या परंपरागत बालेकिल्ल्याला सुरूंग लावत ऐतिहासिक विजय मिळवला. राजकीय रणनीतीकार ते राजकारणी असा प्रवास करणाऱ्या प्रशांत किशोर आणि त्यांच्या पक्षाचा हा पहिलाच विजय ठरला आहे. त्यांना मिळालेल्या या अभूतपूर्व यशामागील पाच प्रमुख कारणांचा घेतलेला हा सविस्तर आढावा…
प्रशांत किशोर यांचा विजय कशामुळे?
राजकीय प्रतिमा आणि प्रभावी व्यक्तीमत्व हे प्रशांत किशोर यांच्या विजयामागील सर्वात महत्वाचे कारण ठरले. निवडणूक रणनीतीकार म्हणून ओळख निर्माण केल्यानंतर त्यांनी गेल्या वर्षी राजकारणात प्रवेश करत स्वत:चा जनसुराज पक्ष स्थापन केला होता. २०२५ मध्ये झालेल्या बिहार निवडणुकीत या पक्षाने २४३ पैकी २३८ जागांवर उमेदवार उभे केले होते; पण त्यांना एकही जागा जिंकता आली नव्हती. त्या अनुभवातून धडा घेत प्रशांत किशोर यांनी इतर कोणत्याही पक्षनेत्याला उमेदवारी न देता स्वतःच बांकीपूर मतदारसंघाची पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या उमेदवारीमुळे भाजपाचे नीरज कुमार सिन्हा यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. यापूर्वी भाजपाचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या कुटुंबाचे ३५ वर्षांपासून या मतदारसंघावर वर्चस्व होते. मात्र, प्रशांत किशोर यांच्या वैयक्तिक लोकप्रियतेमुळे आणि त्यांच्या राजकीय प्रतिमेमुळे भाजपाच्या उमेदवारावर सुरुवातीपासूनच दबाव निर्माण झाला आणि तो त्यांच्या विजयातील एक महत्त्वाचा घटक ठरल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
बदलाच्या जनभावनेचा प्रशांत यांना फायदा
प्रशांत किशोर यांच्या विजयामागील दुसरा महत्त्वाचा घटक भाजपाच्या परंपरागत बालेकिल्ल्यात निर्माण झालेली बदलाची जनभावना मानली जाते. अनेक मतदारांनी जनसुराज पक्षाच्या प्रमुखांकडे अधिक सक्षम, प्रामाणिक आणि जनहिताचा विचार करणारे उमेदवार म्हणून पाहिल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. प्रचारादरम्यान प्रशांत किशोर यांनी या पोटनिवडणुकीला मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वावरील जनमत चाचणी असल्याचे सांगितले. तसेच बांकीपूर हा भाजपाचा अभेद्य बालेकिल्ला असल्याचा दावा करणाऱ्या नेत्यांवर त्यांनी टीकेची तोफ डागली. हा मतदारसंघ कोणत्याही राजकीय पक्षाचा गड नाही आणि गड उभारण्याचे काम फक्त जनताच करते, असे त्यांनी ठामपणे सांगितले. त्यांच्या या आक्रमक प्रचारशैलीला आणि बदलाच्या संदेशाला मतदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे निकालावरून स्पष्ट झाले.
भाजपा-राजदचे पारंपरिक मतदार दुरावले
प्रशांत किशोर यांच्या विजयामागील तिसरे महत्वाचे कारण भाजपा आणि राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रीय जनता दल (राजद) यांच्या पारंपरिक मतदारांमध्ये निर्माण झालेली फूट मानले जाते. या पोटनिवडणुकीत भाजपाच्या पाठीशी केवळ उच्चवर्णीय कायस्थ समाज ठामपणे उभा राहिला; तर इतर उच्चवर्णीय आणि इतर मागासवर्गीय (OBC) मतदारांचा एक मोठा वर्ग किशोर यांच्याकडे वळल्याचे दिसून आले. दुसरीकडे, राजदच्या पारंपरिक मुस्लrम-यादव मतदारांपैकीही काही मतदारांनी प्रशांत किशोर यांना पसंती दिली. विशेषतः भाजपाचा पराभव करण्याची क्षमता प्रशांत किशोर यांच्यात असल्याचा विश्वास निर्माण झाल्याने काही मुस्लीम मतदारांनी राजदऐवजी जनसुराज पक्षाला पाठिंबा दिल्याचे मानले जाते.
जाती-धर्माऐवजी विकासाच्या मुद्द्यांवर प्रचार
प्रचारादरम्यान प्रशांत किशोर यांनी जाती आणि धर्माच्या पारंपरिक राजकारणापासून दूर राहून शिक्षण, रोजगार, नागरी सुविधा आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने भर दिला. त्यांच्या प्रचाराचा केंद्रबिंदू विकास आणि लोकांच्या दैनंदिन समस्यांवर उपाय शोधणे हा होता. त्यामुळे विविध समाजघटकांतील मतदारांशी त्यांचा थेट संवाद प्रस्थापित झाला. याउलट, भाजपeच्या प्रचारात माजी आमदार नितीन नवीन यांनी बांकीपूरच्या जनतेशी असलेल्या भावनिक नात्यावर अधिक भर दिला. मात्र, या महत्त्वाच्या मतदारसंघाच्या भविष्यातील विकासासाठी पक्षाचा ठोस आराखडा मांडण्यात भाजपाला अपेक्षित प्रभाव निर्माण करता आला नाही.
‘जनसुराज’ची प्रभावी निवडणूक रणनीती
प्रशांत किशोर यांनी आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांपेक्षा अत्यंत प्रभावी आणि सूक्ष्म निवडणूक रणनीती आखली होती. आपल्या प्रचारात त्यांनी मोठ्या सभांपेक्षा गल्लीबोळांतील बैठका आणि थेट पदयात्रांमधून लोकांच्या प्रत्यक्ष भेटीगाठींवरच भर दिला. या प्रचारपद्धतीमुळे त्यांना मतदारांपर्यंत थेट पोहोचता आले आणि स्थानिक पातळीवर विश्वासाचे नाते निर्माण करण्यात यश मिळाले. याच रणनीतीच्या जोरावर त्यांनी भाजपाचे पारंपरिक सामाजिक समीकरण भेदण्यात यश मिळवले. तसेच सत्ताधारी पक्षाच्या स्थानिक संघटनेतील अंतर्गत मतभेद, नाराजी आणि गटबाजीचाही त्यांनी प्रभावीपणे राजकीय फायदा करून घेतला. राजकीय विश्लेषकांच्या मते, स्थानिक पातळीवरील सूक्ष्म नियोजन, मतदारांशी थेट संपर्क आणि संघटनात्मक रणनीती यांचा प्रभावी वापर केल्यामुळेच प्रशांत किशोर यांनी भाजपाचा परंपरागत गड भेदत आपल्या राजकीय कारकिर्दीतील महत्त्वाचा विजय मिळवला.
