२०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाचा दारूण पराभव झाला होता. जनसुराज पक्षाला एकही जागा जिंकता आली नव्हती. पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी त्यावेळी विधानसभेची निवडणूक लढवली नव्हती. आपण विधानसभा निवडणुकीत उभे राहिलो तर राज्यातील प्रचारावर लक्ष केंद्रित करता येणार नाही, तसेच जनसुराज पक्षाची सगळी यंत्रणा आपल्याला निवडून आणण्यासाठी कामा लागेल, असा युक्तिवाद करत प्रशांत किशोर यांनी त्यावेळी विधानसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला होता. परंतु, आता प्रशांत किशोर त्यांच्या आयुष्यातली पहिलीच निवडणूक लढवणार आहेत. निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
बिहारमधील बांकीपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन निवडून आले होते. त्यानंतर नितीन नबीन हे राज्यसभेवर गेले. त्यामुळे त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे बांकीपूर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. नितीन नबीन हे पाच वेळा आमदार राहिले होते. त्यांच्यात मतदारसंघात प्रशांत किशोर नशीब आजमावून पाहणार आहेत. ३० जुलै रोजी मतदान होणार असून ३ ऑगस्ट रोजी निकाल जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांच्यासह जनसुराज पक्षाने कंबर कसली आहे.
जनसुराज पक्षाने घेतलेल्या या निर्णयाबद्दल व दाखवलेल्या विश्वासाबद्दल प्रशांत किशोर यांनी पक्षाच्या नेतृत्वाचे, कार्यकर्त्यांचे व समर्थकांचे आभार मानले आहेत. बिहारला बदलण्याच्या मोहिमेत ही एक मोठी जबाबदारी आपल्यावर टाकण्यात आल्याचे प्रशांत किशोर म्हणाले. “जनसुराज हे मागील चार वर्षांपासून माझे जीवन आहे. तसेच बिहारमध्ये बदल घडवून आणेपर्यंत पुढील दहा वर्षे ते माझे जीवन असणार आहे. याशिवाय माझ्यासमोर दुसरे कोणतेही ध्येय नाही”, असे ते म्हणाले. २०२५ च्या विधानसभा निवडणुकीनंतर अनेक समर्थकांची निराशा झाली. बांकीपूरमध्ये विजय झाल्यास बिहारमध्ये राजकीय बदल घडवून आणण्याच्या मोहिमेचे पुनरूज्जीवन होईल, असेही किशोर म्हणाले.
प्रशांत किशोर यांची पहिल्या निवडणुकीसाठी तयारी कशी?
प्रशांत किशोर यांनी त्यांच्या नावाची घोषणा होण्यापूर्वीच बांकीपूर मतदारसंघात काम करणे सुरू केले होते. मोठ्या प्रमाणात रॅली किंवा सभा घेण्याऐवजी त्यांनी स्थानिक पातळीवर काम करणे सुरू केले. त्यांच्या राजकीय धोरणात झालेला हा बदल यातून दिसून येतो. त्यांनी मायक्रो-लेवलवर काम करण्यास सुरूवात केली असून बांकीपूरच्या आजूबाजूला असलेल्या गावांनाही भेट दिली आहे.
जनसुराज पक्षाच्या नेत्यांनी बांकीपूरमधील जनतेच्या समस्या जाणून घेण्यास सुरूवात केली आहे. या मतदारसंघात शहरी मतदारांची संख्या अधिक आहे. “तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी जनसुराज पक्षाला मत द्या”, असे थेट आवाहन प्रचारसभांमधून किशोर यांनी केले आहे. दरम्यान, मागील तीन दशकांपासून बांकीपूर हा भाजपाचा बालेकिल्ला राहिला आहे.
किशोर यांनी भाजपाला लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे. नितीन नबीन व त्यांचे वडील नबीन किशोर प्रसाद सिन्हा यांच्याशी निष्ठा ठेवल्याचे कोणते फळ बांकीपूरमधील जनतेला मिळाले? असा सवाल त्यांनी केला आहे. मूलभूत पायाभूत सुविधाही मतदारांना देण्यात आल्या नाहीत, असा आरोप त्यांनी केला आहे. बिहारमध्ये भाजपाप्रणित एनडीएचे सरकार आल्यापासून त्यांनी प्रशासनावर टीका केली आहे. जोपर्यंत सामान्य माणसाशी संबंधित प्रश्नांकडे पाहून लोक मतदान करणार नाहीत, तोपर्यंत परिस्थिती सुधारणार नाही, असा इशाराही प्रशांत किशोर यांनी मतदारांना दिला.
बांकीपूर मतदारसंघात ३० वर्षांपासून भाजपाची सत्ता
२००८ मध्ये मतदारसंघांची पुनर्रचना होण्याआधी बांकीपूर हे पटना पश्चिम विधानसभा मतदारसंघात होते. या मतदारसंघातून नितीन नबीन यांचे वडील नबीन किशोर प्रसाद सिन्हा हे कायस्थ समाजातील नेते १९९५ पासून सलग चार वेळा निवडून आले होते. २००६ मध्ये त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र नितीन नबीन हे पोटनिवडणूक निवडून आले. २००८ मध्ये बांकीपूर मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतर २०१०, २०१५, २०२० आणि २०२५ च्या विधानसभा निवडणुकीत नितीन नबीन आमदार म्हणून निवडून आले. बांकीपूर विधानसभा मतदारसंघ हा शहरी भागातील मतदारसंघ आहे. २०२१ मध्ये नितीन नबीन यांची बिहारच्या मंत्रिमंडळात नियुक्ती करण्यात आली. २०२५ मध्ये त्यांची भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष पदावर तर जानेवारी २०२५ मध्ये त्यांची भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.
“१५६०० कोटी रूपयांची सरकार पुरस्कृत लाच”
नितीन नबीन यांच्या बालेकिल्ल्यात पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय किशोर यांनी घेतला आहे. जनसुराज पक्षाचे पुनरूज्जीवन होईल, अशी अपेक्षा त्यांना आहे. २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी प्रशांत किशोर यांनी स्वीकारली होती. सभांमध्ये होणाऱ्या गर्दीला मतांमध्ये रूपांतरित करता आले नाही, असे ते म्हणाले होते. तसेच विधानसभा निवडणुकीपूर्वी १.५६ कोटी महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेअंतर्गत प्रत्येकी दहा हजार रूपये जमा करण्यात आले होते. या योजनेवर टीका करत “१५६०० कोटी रूपयांची सरकार पुरस्कृत लाच” देण्यात आल्याचा आरोप किशोर यांनी केला होता. यामुळे निवडणुकीपूर्वी विरोधकांना शह देण्यात आल्याची टीका किशोर यांनी केली होती.
