Prashant Kishor and Priyanka Gandhi Meeting : जन सुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी नुकतीच काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. अलीकडेच प्रशांत किशोर यांच्या पक्षाने बिहारची विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. दुसरीकडे काँग्रेसलाही विधानसभा निवडणुकीत मोठे अपयश आले होते. यादरम्यान जन सुराज पक्षाच्या प्रमुखांनी प्रियांका गांधी यांची भेट घेतल्याने काहीतरी मोठे घडणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्याविषयीचा हा आढावा…
प्रशांत किशोर आणि प्रियांका गांधी यांची भेट राजकीयदृष्ट्या अतिशय महत्वाची असल्याचे दोन्ही पक्षांतील सूत्रांनी सांगितले आहे. कारण- मागील काही वर्षांपासून प्रशांत किशोर आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये कटूता निर्माण झालेली आहे. जन सुराज पक्षाचे प्रमुख काँग्रेसला सातत्याने लक्ष्य करताना दिसून येत आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यानही त्यांनी काँग्रेसच्या मोहिमेवर टीकेची झोड उठवली होती. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राज्यात काढलेली ‘व्होटर अधिकार यात्रा’ ही निवडणुकीचा मुद्दा असूच शकत नाही, असे किशोर म्हणाले होते.
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांना मोठा फटका
बिहार विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाने २३८ उमेदवार उभे केले होते. त्यापैकी जवळपास २३६ उमेदवारांची (९९.१६ टक्के) अनामत रक्कम जप्त झाली होती. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाची कामगिरीही अत्यंत निराशाजनक राहिली. महाआघाडीतील घटकपक्ष म्हणून काँग्रेसने ६१ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. त्यापैकी केवळ सहाच जागांवर पक्षाला यश मिळाले आहे. विशेष बाब म्हणजे- २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे १९ उमेदवार निवडून आले होते. त्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत पक्षाच्या कामगिरीत मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
किशोर यांचा गांधी कुटुंबीयांबरोबर जुना संबंध
प्रशांत किशोर आणि गांधी कुटुंबीयांत जुने संबंध आहेत. राजकारणात येण्यापूर्वी किशोर हे राजकीय रणनीतीकार म्हणून काम करीत होते. त्यानंतर नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड पक्षात त्यांनी प्रवेश केला होता. २०२१ मध्ये जेडीयूमधून हकालपट्टी झाल्यानंतर किशोर यांनी काँग्रेसला पुनरुज्जीवित करण्याच्या प्रस्तावासह प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी संपर्क साधला होता. २०२२ मध्ये त्यांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या एका बैठकीला हजेरी लावली होती. या बैठकीत किशोर यांनी पक्षाला बळकटी देण्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसमोर एक सविस्तर सादरीकरण केले होते. यावेळी राहुल गांधी, प्रियांका गांधी वाड्रा यांच्यासह पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते.
सोनिया गांधींनी केली होती समिती स्थापन
प्रशांत किशोर यांच्या सादरीकरणानंतर त्यांच्या प्रस्तावांवर विचार करण्यासाठी सोनिया गांधी यांनी ‘सशक्त कृती समिती’ (Empowered Action Group – 2024) स्थापन केली. त्याचवेळी खुद्द प्रशांत किशोर हे काँग्रेसमध्ये सामील होण्यास तयार असल्याचे सांगितले जात होते. काही दिवसानंतर काँग्रेसच्या समितीचा भाग होण्याचा प्रस्ताव प्रशांत किशोर यांनी नाकारल्यामुळे या विषयावरील चर्चा अशस्वी ठरली. त्यावेळी किशोर यांना अधिक अधिकार आणि स्वतंत्र निर्णय स्वातंत्र्य हवे होते, असे सूत्रांनी सांगितले होते. त्यानंतर काँग्रेसने एक अधिकृत निवेदनाद्वारे वाटाघाटी अयशस्वी ठरल्याची माहिती दिली होती.
काँग्रेसने दिली होती वाटाघाटी तुटल्याची माहिती
“प्रशांत किशोर यांच्या सादरीकरणानंतर सोनिया गांधी यांनी त्यांच्या प्रस्तावांवर विचार करण्यासाठी काँग्रेसने एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये सामील होण्यासाठी पक्षाने त्यांना निमंत्रण दिले होते. परंतु त्यांनी नकार दिल्यानंतर या विषयावरील चर्चा अयशस्वी ठरली. काँग्रेसला बळकटी मिळण्यासाठी किशोर यांनी केलेल्या प्रयत्नांचे आणि सूचनांचे आम्ही कौतुक करतो,” असे या निवेदनातून स्पष्ट करण्यात आले होते. त्यानंतर काही मिनिटांतच प्रशांत किशोर यांनीही आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली होती.
हेही वाचा : भाजपाच्या बड्या नेत्याचे पाय खोलात; मतचोरी प्रकरणातील आरोपपत्रात नाव; एसआयटीचा दावा काय?
किशोर यांच्या प्रस्तावाला विरोध का झाला?
सशक्त कृती समितीचा भाग होऊन निवडणुकांची जबाबदारी घेण्याचा काँग्रेसचा प्रस्ताव मी नाकारला आहे. माझ्या मते, पक्षाला सामूहिक इच्छाशक्तीची गरज आहे, असे किशोर म्हणाले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार- प्रशांत किशोर यांनी केलेल्या सादरीकरणाला काँग्रेसमधील एका गटाने तीव्र विरोध केला होता. किशोर हे काँग्रेसच्या मुशीतून घडलेले नेते नाहीत. त्यामुळे त्यांच्या प्रस्तावावर पूर्णपणे विश्वास ठेवता येणार नाही. बाहेरील व्यक्तीच्या सांगण्यावरून पक्षाची रचना बदलणे योग्य नाही, अशी भूमिका काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी मांडली होती.
प्रियांका गांधी काय म्हणाल्या होत्या?
२०२२ मध्ये प्रशांत किशोर यांच्या काँग्रेसमधील संभाव्य प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले होते. या काळात त्यांचे राहुल गांधी यांच्या घराजवळील फोटोही समोर आले होते. परंतु त्यानंतर प्रशांत किशोर यांनी सार्वजनिकपणे काँग्रेसच्या नेतृत्वावर हल्लाबोल करत काँग्रेस प्रवेशाचा निर्णय न झाल्याचे स्पष्ट संकेत दिले. त्यावेळीप्रियंका गांधी यांनी किशोर यांचा काँग्रेस प्रवेश का होऊ शकला नाही यावर भाष्य केले होते. “प्रशांत किशोर आणि काँग्रेसची भागीदारीसाठी चर्चा सुरू होती. मात्र, ही भागीदारी होऊ शकली नाही. मला वाटते यामागे अनेक कारणे होती. मी त्याच्या तपशीलात जाऊ इच्छित नाही. काही मुद्द्यांवर सहमत होणे शक्य नव्हते. त्यामुळे भागीदारीची ही चर्चा पुढे जाऊ शकली नाही,” असे प्रियांका यांनी एनडीटीव्हीला सांगितले होते.

