Jansuraj defeated in Bihar Elections बिहार विधानसभेच्या निवडणुकीत एनडीएने घवघवीत यश मिळवत २०२ जागा जिंकल्या आहेत, तर महाआघाडीला फक्त ३५ जागा मिळाल्या आहेत. बिहारच्या निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाची सर्वाधिक चर्चा होती. प्रशांत किशोर यांनी म्हटले होते की “त्यांचा पक्ष एकतर शिखरावर जाईल नाही तर तळ गाठेल”. एवढेच नाही तर प्रशांत किशोर यांनी निवडणुकीच्या आधी अनेक मोठे दावे केले होते.

मात्र, त्यांचे सर्व दावे फोल ठरले असून जनसुराज पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. त्यामुळे प्रशांत किशोर यांना मोठा धक्का बसला. बिहार निवडणुकीनंतर त्यांनी ‘एनडीटीव्ही’ला पहिली मुलाखत दिली. या मुलाखतीत प्रशांत किशोर यांनी मान्य केले की, निवडणुकीचा निकाल त्यांच्यासाठी अत्यंत निराशाजनक होता. त्यांनी पराभवाची अनेक कारणे सांगितली, तसेच एनडीएवर अनेक आरोपही केले. या मुलाखतीत ते नक्की काय म्हणाले? जाणून घेऊयात….

“निकाल लागल्यापासून झोप नाही”

निवडणुकीचा निकाल त्यांच्यासाठी अत्यंत निराशाजनक होता, असे प्रशांत किशोर यांनी या मुलाखतीत मान्य केले. “निकाल लागल्यापासून मला झोप लागली नाहीये,” असेही त्यांनी नमूद केले. याचबरोबर काही गोष्टींमध्ये आपण यशस्वी झालो आहोत. बिहारच्या राजकारणाची चर्चा (डिस्कोर्स) बदलण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत,” असे त्यांनी नमूद केले. “आम्ही बिहारमध्ये सरकार स्थापन करण्याचे स्वप्न पाहत होतो, पण आम्हाला शून्य जागा मिळाल्या आहेत,” असेही ते म्हणाले.

जेडीयूला २५ जागा मिळतील या दाव्यावर प्रशांत किशोर काय म्हणाले?

प्रशांत किशोर म्हणाले की, “जेडीयूची २५ पेक्षा जास्त जागा जिंकण्याची स्थिती नव्हती. त्यांना तेवढ्याच जागा मिळायला हव्या होत्या, पण त्यांना ८०-८२ जागा मिळाल्या. आता लोक म्हणत आहेत की तळागळातील परिस्थिती वेगळी होती. पण, जर तुम्ही निवडणूक लक्षपूर्वक पाहिली तर एक मोठा घटक होता, तो म्हणजे प्रत्येक विधानसभेत सुमारे १०० ते १२५ कोटी रुपये थेट जनतेला देण्यात आले. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ६०-६५ हजार लोकांना थेट १० हजार रुपये देऊन सरकारने मत विकत घेतले.”

“४० वर्षांची व्यवस्था एका फटक्यात बदलता येत नाही”

प्रशांत किशोर म्हणाले, “मला फक्त ३ टक्के मते मिळाली. जनतेने जनसुराजला सांगितले की, आता नेट प्रॅक्टिस करा. आम्ही (जनसुराज) तर शर्यतीतच नव्हतो. जेव्हा तुम्हाला तीन ते चार टक्के मते मिळतात, तेव्हा तुम्ही शून्यापासून सुरुवात करता.” ते म्हणाले, “प्रशांत किशोरचे बोलणे बिहारच्या जनतेला केवळ ऐकायला चांगले वाटले. जी व्यवस्था इथे ४० वर्षांपासून आहे, ती एकाच वेळी बदलणे शक्य नाही.” प्रशांत किशोर यांनी मतखरेदीचादेखील आरोप केला. मतदानाच्या दोन दिवस आधी २५०० कोटी रुपये खर्च करण्यात आले असे ते म्हणाले. त्यांनी सांगितले की, “प्रत्येक विधानसभा मतदारसंघात १२५ कोटी रुपये खर्च झाले.”

नितीश कुमारांच्या आरोग्यावरही टीका

प्रशांत किशोर यांना जेव्हा विचारले गेले की, तुमची तर एकही जागा आली नाही. त्यावर त्यांनी उत्तर दिले, “२०१४ मध्ये नितीश कुमारांना लोकसभेत फक्त दोन जागा मिळाल्या होत्या, तेव्हा नितीश कुमार माझ्याकडे आले होते, माझ्याकडून मदत घेण्यासाठी आले होते. पण, आता जो जिंकला तोच सिकंदर आहे, नितीश कुमार जिंकले आहेत. पण, याचा अर्थ असा नाही की फक्त त्यांनाच समज आहे.” त्यांनी पुन्हा एकदा नितीश कुमार यांच्या आरोग्याबद्दल वक्तव्य केले. ते म्हणाले, “मला आजही असे म्हणायला चुकीचे वाटत नाही की नितीश कुमार मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या स्वस्थ नाहीत. तुम्ही मुख्यमंत्री आहात, मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या स्वस्थ दिसत नाही, म्हणूनच मी हे बोललो आहे.”

स्वतः निवडणूक न लढणे ही प्रशांत किशोर यांची चूक होती का?

निवडणूक न लढण्याच्या निर्णयाला चूक मानू शकतो असे प्रशांत किशोर म्हणाले. “मला जर आधीच माहिती असते की मी हरणार आहे, तर मी माझ्या जीवनातील सर्वकाही, माझा पैसा, माझा वेळ, माझी शक्ती आणि माझी बुद्धिमत्ता पणाला का लावली असती? मला माहिती असते तर मी एवढा मोठा धोका का पत्करला असता?,” असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, “पण माझी स्वतःची अपेक्षा होती की १२ ते १५ टक्के मते मिळतील, पण केवळ ३ टक्केच मते मिळाली. मी गांधी आश्रमात मौन उपवास करेन आणि गांधींकडून प्रेरणा घेऊन पुढे जाईन, मी थांबणार नाही,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

पत्रकार परिषदेत काय म्हणाले प्रशांत किशोर?

बिहार निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर प्रशांत किशोर यांनी पराभवाबाबत पत्रकार परिषद घेत पहिली प्रतिक्रिया दिली होती. तसेच पराभवाची जबाबदारीही स्वीकारली होती. “मी पराभवाची जबाबदारी १०० टक्के स्वतःवर घेतो”, असे प्रशांत किशोर पत्रकार परिषदेत म्हणाले. “आम्ही प्रामाणिक प्रयत्न केले, पण ते पूर्णपणे अयशस्वी झाले, हे मान्य करण्यात काही गैर नाही. आम्ही बिहारच्या सत्तेत बदल घडवून आणू शकलो नाही, मात्र बिहारचे राजकारण बदलण्यात आम्ही नक्कीच काही महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. आमच्या प्रयत्नांमध्ये म्हणजे जनतेने आम्हाला निवडून दिले नाही, त्यात काही चूक झाली असेल. जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला नाही, त्याची जबाबदारी पूर्णपणे माझी आहे. मी ती जबाबदारी १०० टक्के स्वतःवर घेतो की मी बिहारच्या लोकांचा विश्वास जिंकू शकलो नाही”, असे प्रशांत किशोर यांनी म्हटले.