Prashant Kishor Bankipur Bypoll Win : तुम्ही स्वतः निवडणूक जिंकू शकता का? असा प्रश्न इतरांसाठी निवडणुकीची रणनीती आखणाऱ्या राजकीय रणनीतीकारला कधी ना कधी विचारला जातोच. आज जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी प्रत्यक्ष निवडणूक जिंकून या प्रश्नाचे उत्तर दिले. निवडणूक रणनीतीकार ते राजकारणी असा प्रवास करणाऱ्या प्रशांत किशोर यांनी बिहारच्या बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत दणदणीत विजय मिळवला. गेल्या वर्षीच्या बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला भोपळाही फोडता आला नव्हता. त्या पार्श्वभूमीवर जनसुराज्य पक्षासाठी आजचा विजय विशेष महत्वाचा ठरला असून त्यांच्या नव्या राजकीय वाटचालीला सुरुवात झाली आहे. या पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर यांच्यासमोर भाजपाच्या बलाढ्य उमेदवाराचे आव्हान होते. बांकीपूर विधानसभा मतदारसंघावर भाजपाचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या कुटुंबाचे तब्बल ३५ वर्षांपासून एकहाती वर्चस्व होते.

सोमवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर भाजपा बाजी मारणार की जनसुराज्य पक्षाच्या विजयाचे खाते उघडणार, अशी चर्चा संपूर्ण बिहारमध्ये रंगली होती. मतमोजणीच्या ३६ पैकी ३१ फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर प्रशांत किशोर यांनी तब्बल १८ हजारांहून अधिक मतांची विजयी आघाडी घेतली. हा आकडा त्यांना एका निर्णायक आणि मोठ्या विजयाच्या दिशेने घेऊन गेला. या चुरशीच्या लढतीत प्रशांत किशोर यांनी भाजपाचे उमेदवार नीरज कुमार सिन्हा आणि राष्ट्रीय जनता दलाच्या (RJD) उमेदवार रेखा कुमारी यांचा तब्बल १८,९५३ मतांच्या फरकाने दारुण पराभव केला. या निकालावर प्रतिक्रिया देताना ३५ वर्षांचे अंतर आम्ही अवघ्या ३० दिवसांत भरून काढले, असा चिमटा प्रशांत किशोर यांनी काढला. त्यांच्या या वक्तव्याकडे बिहारच्या राजकारणातील बदलत्या समीकरणांचे संकेत म्हणून पाहिले जात आहे.

भाजपाच्या बालेकिल्ल्याला कसा लागला सुरूंग?

जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून उदयास आलेल्या भाजपासमोर आव्हान निर्माण करण्यासाठी प्रशांत किशोर यांच्याकडे निवडणूक यंत्रणा आणि कार्यकर्त्यांचे बळ नव्हते. त्यांच्या हाती केवळ नुकत्याच स्थापन झालेल्या जनसुराज्य पक्षाचा झेंडा होता. तरीही प्रशांत किशोर यांनी भाजपाच्या ३५ वर्षांच्या अभेद्य बालेकिल्ल्यात आपल्याकडे खेचून आणत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन राज्यसभेत प्रवेश केल्यानंतर बांकीपूर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. भाजपासाठी हा मतदारसंघ कायमच सुरक्षित मानला जात होता. नितीन नबीन यांनी सलग २० वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्याआधी त्यांचे वडील नबीन किशोर प्रसाद सिन्हा यांनी १५ वर्षे हा मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवला होता. ही पोटनिवडणूक केवळ प्रशांत किशोर यांच्या राजकीय प्रयोगाचीच नव्हे, तर भाजपासाठीही प्रतिष्ठेची ठरली होती. कारण, सम्राट चौधरी यांनी बिहारचे मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर सत्ताधारी पक्षाची राज्यातील ही पहिलीच परीक्षा होती. या निवडणूक निकालामुळे २०२५ मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीतील जन सुराज पक्षाचा पराभव म्हणजे पक्षाचा शेवट नव्हता हे स्पष्ट झाले.

पराभवानंतर प्रशांत किशोर यांनी पक्ष कसा उभारला?

२०२५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवातून धडा घेत प्रशांत किशोर यांनी आपल्या राजकीय यंत्रणेत मोठे बदल केले. त्यांनी जनसुराज पक्षाची अवाढव्य मोहीम गुंडाळून अवघ्या १०० जणांची एक अत्यंत कार्यक्षम टीम तयार केली. या टीमला महिला मतदार, जातीय समीकरणे, बूथ व्यवस्थापन आणि मोहीम विश्लेषणासाठी विशेष उपक्रमांची जोड देण्यात आली. गेल्या वर्षी एकही जागा जिंकू न शकणाऱ्या जनसुराजने यावर्षी एकही सभा किंवा रँली न घेता थेट घरोघरी जाऊन मतदारांशी संपर्क साधण्यावर भर दिला. भाजपा आणि राष्ट्रीय जनता दलाने प्रचार सुरू करण्याच्या तब्बल दोन महिने आधीच प्रशांत किशोर यांनी बांकीपूरमध्ये स्वतःचा प्रचार सुरू केला होता. त्यांनी चहाच्या टपऱ्यांवर नागरिकांशी गप्पा मारल्या, रात्री उशिरापर्यंत पदयात्रा काढल्या आणि वॉर्ड स्तरावर लहान-लहान बैठका घेतल्या. मतदारांना मोठमोठी आश्वासने देण्याऐवजी प्रशांत किशोर यांनी बांकीपूरमधील पायभूत सुविधा, रोजगार आणि स्थानिक प्रशासनातील त्रुटी यांसारख्या रोजच्या नागरी समस्यांवरच चर्चा केंद्रित केली.

प्रशांत किशोर यांनी निवडणुकीचा प्रचार कसा केला?

प्रशांत किशोर निवडणुकीच्या रिंगणात उतरले असताना जनसुराज पक्षाने त्यांच्या प्रचारासाठी अत्यंत पद्धतीशीर रणनीती आखली होती. पक्षाचे तरुण कार्यकर्ते दररोज सकाळी गावागावांतील पारांवर, चहाच्या टपऱ्या आणि गांधी मैदानावर नागरिकांशी संवाद साधत होते. त्याचवेळी दुपारच्या वेळी महिलांची टीम घरोघरी जाऊन थेट महिला मतदारांची भेट घेत होती. संपूर्ण मतदारसंघाची वेगवेगळ्या झोनमध्ये विभागणी करण्यात आली होती. प्रशांत किशोर स्वतः पक्षाचा सर्वात मोठा चेहरा, मुख्य प्रचारक आणि या मोहिमेचा मुख्य भाग झाले होते. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात त्यांनी बिहारमधील भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारवर टीकेची तोफ डागली. तसेच मतदानाच्या दिवशी भाजपाकडून पैसे वाटले गेल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. प्रशांत किशोर यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे भाजपाची मोठी कोंडी झाली होती. अखेर त्यांच्या या नियोजनाने भाजपाची ३५ वर्षांची सत्ता मोडून काढत बांकीपूरवर जनसुराज पक्षाचा झेंडा फडकवला

भाजपानेही निवडणुकीत झोकून दिली होती ताकद

प्रशांत किशोर यांचा वाढता प्रभाव पाहून भाजपानेही आपल्या प्रभावशाली नेत्यांची फौज प्रचारासाठी बांकीपूरमध्ये पाठवली होती. पोटनिवडणुकीच्या सुरुवातीला ३५ वर्षांपासून आपल्याकडे असलेला गड यावेळीही सहज राखता येईल, असा भाजपाला विश्वास होता. या मतदारसंघातून भाजपाने सुरुवातीला अभिषेक कुमार सिन्हा यांना उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांच्या कुटुंबासंदर्भातील वाद निर्माण झाल्यानंतर पक्षाने ऐनवेळी उमेदवार बदलत ३२ वर्षीय नीरज कुमार सिन्हा यांना रिंगणात उतरवले. उमेदवार बदलण्याच्या निर्णयामुळे प्रशांत किशोर यांच्या प्रचार मोहिमेमुळे भाजपामध्ये वाढती अस्वस्थता निर्माण झाल्याची सगळीकडेच चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर भाजपाने प्रचारात आपली सर्व ताकद पणाला लावून दिली होती. पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी नितीन नवीन स्वतः मैदानात उतरले होते. बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्यासोबत त्यांनी पाटण्यात अनेक ‘रोड शो’ केले. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी नितीन नवीन यांनी शहरातील प्रमुख मंदिरांना भेटी दिल्या. त्यानंतर बूथस्तरीय कार्यकर्ते, नगरसेवक, युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन मतदार संपर्क मोहिमेचा आढावा घेतला.

४० स्टार प्रचारकांची फौज मैदानात, तरीही पराभव!

बांकीपूरची पोटनिवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने तब्बल ४० स्टार प्रचारकांना मैदानात उतरवले होते. त्यात केंद्रीय मंत्री, राज्य सरकारमधील मंत्री, मुख्यमंत्री सम्राट चौधरी, चिराग पासवान, रविशंकर प्रसाद, मनोज तिवारी, रवि किशन तसेच विविध समाजघटकांतील नेत्यांचा समावेश होता. भाजपाकडून विविध जातीय समीकरणे मजबूत करण्यासाठीही विशेष प्रयत्न करण्यात आले. एनडीएच्या प्रचारात माजी मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनीही व्हिडीओ संदेशाद्वारे मतदारांना मतदानाचे आवाहन केले. मात्र, प्रशांत किशोर यांनी हा व्हिडीओ कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरून तयार केलेला ‘डीपफेक’ असल्याचा आरोप करत त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. २८ जुलै रोजी प्रचार संपल्यानंतर ३० जुलैला मतदान झाले. या पोटनिवडणुकीत ३४.२४ टक्के मतदानाची नोंद झाली. प्रचाराच्या अखेरीस ही केवळ एक साधी पोटनिवडणूक राहिली नव्हती, तर बिहारच्या बदलत्या राजकीय समीकरणांची कसोटी ठरली होती. प्रशांत किशोर यांनी या निवडणुकीत एक महत्त्वाचा राजकीय टप्पा गाठला, असे मानले जात आहे. तब्बल ३५ वर्षे अभेद्य मानल्या गेलेल्या मतदारसंघात भाजपाला आपली संपूर्ण संघटनात्मक ताकद उतरवण्यास भाग पाडणे, हीच त्यांच्या प्रचार मोहिमेची मोठी राजकीय उपलब्धी ठरली आहे. शून्यातून पक्षाची उभारणी करून, पहिल्यांदाच निवडणूक लढणाऱ्या नेत्याने बिहारच्या प्रस्थापित राजकीय व्यवस्थेला थेट आव्हान देण्याची क्षमता दाखवून दिली आहे. त्यामुळे जन सुराज पक्ष बिहारच्या राजकारणातील प्रभावी पर्याय म्हणून उदयास येत असल्याचे संकेत या निकालातून मिळाले आहेत.