Pratap Sarnaik Slams BJP : महायुतीमध्ये गेल्या काही काळापासून अंतर्गत धुसफूस वाढल्याचे दिसून येते. रिक्षा आणि टॅक्सीचालकांना मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ दिल्याने भाजपा आणि शिवसेनेत श्रेयवाद रंगल्याचे पाहायला मिळाले होते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मुदतवाढीचा निर्णय मान्य केला होता, तरी मराठी शिकण्याच्या अंमलबजावणीची राजकीय दिशा कोण ठरवतं आणि त्याचं नेतृत्व कोण करतं, यावरून भाजपा आणि शिवसेनेत एकप्रकारे दरी निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. यातच आता मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर अनियमितता असल्याचा आरोप सरनाईकांनी केला आहे. यामुळे पुन्हा भाजपा-शिवसेनेत कटूता निर्माण झाल्याचे चित्र आहे.

जानेवारी २०२६ मध्ये पार पडलेल्या मिरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीत ९५ पैकी ७८ जागांवर विजय मिळवत भाजपाने सत्ता काबीज केली, तर शिवसेनेला अवघ्या ३ जागांवर समाधान मानावे लागले. या पराभवानंतर मंत्री प्रताप सरनाईक यांनी मतदार यादीत ‘मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार’ झाल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. मतदार यादीतील फेरफारामुळेच भाजपाचा इतका मोठा विजय झाला, असा थेट दावा सरनाईक यांनी केला आहे.

राजकीय वैमनस्य

प्रताप सरनाईकांनी भाजपावर आरोप केला एवढ्यापुरताच हा प्रश्न मर्यादित नाही; तर सरनाईकांचे भाजपाचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यासोबत राजकीय वैमनस्य आहे. सरनाईक हे ओवळा-माजिवडा मतदारसंघाचे आमदार आहेत, मात्र मिरा-भाईंदरच्या स्थानिक पालिकेवर भाजपा आणि नरेंद्र मेहता यांचे एकहाती वर्चस्व निर्माण झाले आहे, त्यामुळे एकीकडे हा वाद मतदार यादीबद्दल आहे तर दुसरीकडे मिरा-भाईंदरवर कोणाचे नियंत्रण असेल, हा महत्त्वाचा राजकीय प्रश्न आहे.

सरनाईकांनी दावा केला की, विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेनंतर मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघातील मतदारसंख्या ५.१४ लाखांवरून ३.०१ लाखांवर आली. म्हणजेच तब्बल २.१३ लाख नावे वगळण्यात आली. ४७,९०१ मतदारांची कोणतीही नोंद किंवा पत्ता आढळला नाही, तर ४८ हजारांहून अधिक नावांमध्ये त्रुटी आढळल्या. हाच धागा पकडत सरनाईक यांनी बोगस मतदारांमुळे भाजपाला फायदा झाल्याचा आरोप केला. निवडणूक आयोगाच्या प्रशासकीय नियमांनुसार, एखादे नाव यादीतून वगळले किंवा ‘असंकलनीय’ ठरवले गेले म्हणजे ते नाव ‘बोगस’च होते असा निष्कर्ष थेट काढता येत नाही. यामध्ये अशा प्रकरणांचाही समावेश असू शकतो, ज्यांचे अर्जच गोळा करता आले नाहीत, मतदारांशी संपर्क साधता आला नाही किंवा तपशिलांची पडताळणी पूर्णच झाली नाही.

नरेंद्र मेहता यांनी सरनाईक यांचे आरोप ‘हास्यास्पद’ असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, शिवसेनेचे उमेदवार आणि नेते ज्या मतदार याद्या वापरत होते, त्याच याद्यांवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करणे हास्यास्पद आहे.

महापालिकेतील राजकीय संघर्ष

जानेवारीतील महापालिका निवडणुकीत मिरा-भाईंदरमध्ये नाट्यमय घडामोडी घडल्या. राज्यात शिवसेना आणि भाजपा एकत्र असले तरी जागावाटपावर एकमत न झाल्याने दोन्ही पक्षांनी काही महापालिकांमध्ये स्वतंत्र निवडणूक लढवण्याचे ठरवले. या निवडणुकीत भाजपाने ७८ जागांवर विजय मिळवला, तर शिवसेनेला केवळ तीन जागा मिळाल्या. काँग्रेसने १३ जागांवर विजय मिळवला आणि एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला. त्यानंतर भाजपाच्या डिंपल मेहता ७९ मतांची आघाडी घेत महापौरपदी विराजमान झाल्या.

भाजपाच्या या यशामुळे महापालिकेवर पक्षाचे वर्चस्व निर्माण झाले, तर स्थानिक राजकारणात मेहतांचे स्थान लक्षणीयरीत्या मजबूत झाले आहे. प्रताप सरनाईक हे ओवळा-माजिवडा मतदारसंघाचे आमदार आहेत. या मतदारसंघाचा काही भाग मिरा-भाईंदर महापालिकेच्या अखत्यारित येतो. पण, शिवसेनेचे या महापालिकेत फारसे अस्तित्व नाही. राज्यात शिवसेना-भाजपाची युती असूनही दोन्ही पक्षांनी या महापालिकेची निवडणूक स्वतंत्र लढवली, ज्यामध्ये शिवसेनेला फटका बसला.

शिवसेनेतील एका सूत्राने दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, ‘मिरा-भाईंदरवर कोणाचे नियंत्रण असेल’ या मुद्द्यावरून सरनाईक आणि मेहता यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे.

निवडणुकीच्या प्रचारात सरनाईक यांनी भाजपाच्या राज्य नेतृत्वावर टीका न करता नरेंद्र मेहता यांच्यावर वैयक्तिक हल्ले चढवले होते आणि स्थानिक भाजपाला “मेहतांची कंपनी” असे संबोधले होते. तसेच शहरातील भाजपा-शिवसेनेतील युतीच्या अपयशासाठीही सरनाईकांनी मेहतांनाच जबाबदार धरले.

भाजपा-शिवसेना युतीत आधीपासूनच स्पर्धा

मिरा-भाईंदरच्या माजी महापौर गीता जैन यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मेहता यांच्या राजकीय वर्चस्वाला आव्हान दिले. मेहता यांना ६४,०४९ मते मिळाली, तर गीता जैन यांनी अपक्ष म्हणून उभे राहत ७९,५७५ मते मिळवली. गीता जैन यांनी नंतर शिवसेनेत प्रवेश केला आणि मेहतांचा निवडणुकीतील पराभव शिवसेनेच्या पथ्यावर पडला. पण, २०२४ मध्ये मेहता यांनी ५४.८७% मते मिळवून मिरा-भाईंदर विधानसभा निवडणूक जिंकली आणि पुनरागमन केले. दरम्यान, सरनाईक यांनी एक लाखांहून अधिक मतांच्या फरकाने ओवळा-माजिवडा मतदारसंघ स्वत:कडे कायम राखला. या संघर्षामुळे येथे नेहमीच राजकीय संघर्षाचे वातावरण राहिले आहे.

मराठी मुद्दाही महत्त्वाचा

मिरा-भाईंदरमधील राजकीय स्पर्धेत भाषिक मुद्दाही महत्त्वाचा ठरतो. डिंपल मेहता महापौरपदी निवडून आल्यानंतर, त्या अमराठी असल्याने त्यांच्या महापौरपदावर मराठी गटांनी आक्षेप घेतला आणि आंदोलनेदेखील करण्यात आली. मात्र, सरनाईक यांनी या वादाला कमी लेखले आणि निदर्शनास आणून दिले की, पूर्वी जेव्हा अमराठी नेते या पदावर होते तेव्हा असा आक्षेप घेण्यात आला नव्हता. राजकीय पक्षांनी या मुद्द्यांऐवजी नागरी प्रश्नांवर आणि विकासावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहनही प्रताप सरनाईक यांनी केले, त्यामुळे मतदार यादीच्या वादामुळे एका जुन्या राजकीय संघर्षात आता आणखी एक अस्त्र जोडले गेले आहे.

राज्य सरकारमधील स्वतःचे स्थान टिकवून ठेवण्यासोबतच मिरा-भाईंदरमध्ये शिवसेनेची पकड सैल होऊ नये याचीही काळजी सरनाईक घेताना दिसत आहेत; तर महापालिकेवरील भाजपाचे नियंत्रण टिकवणे आणि आपली स्थानिक राजकीय यंत्रणा मजबूत करणे हे मेहतांचे प्राधान्य आहे. या पार्श्वभूमीवर सरनाईक यांचे सध्याचे आरोप ‘मिरा-भाईंदरचे राजकीय भवितव्य कोण ठरवणार,’ यावरून सुरू असलेला व्यापक संघर्ष अधोरेखित करतात.