चंद्रपूर : माजी पालकमंत्री तथा काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी मांडलेल्या २०० कोटींच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कृत्रिम अभयारण्याच्या प्रस्तावाला तत्काळ स्थगिती द्यावी, अशी मागणी भद्रावती-वरोरा विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. धानोरकर यांच्या मागणीमुळे वडेट्टीवार-धानोरकर यांच्यातील संघर्ष पुन्हा तीव्र झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वडेट्टीवार यांनी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात कृत्रिम अभ्यारण्याच्या प्रस्तावासोबतच तिथे बिबट्या सफारीची तयारी केली होती. २०० कोटींच्या या प्रकल्पाच्या प्रारूप आराखड्याच्या कामाला सुरुवातही झाली होती. दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. त्यांनी राज्यातील बहुतांश विकास कामांना स्थगिती दिली. आता काँग्रेस आमदार प्रतिभा धानोरकर यांनीच या प्रकल्पाला स्थगिती द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन केली आहे. त्यामुळे धानोरकर-वडेट्टीवार यांच्यातील संघर्ष पुन्हा पेटणार अशी चिन्हे आहेत.

हेही वाचा… Maharashtra Breaking News Live : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी आणि विविध बातम्यांचे अपडेट एका क्लिकवर…

ताडोबा अभयारण्य हे जगात वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासासाठी प्रसिद्ध आहे. असे असताना देखील लोहारा येथे कृत्रिम अभयारण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे ‘कोअर झोन’ मधील पर्यटक संख्या घट होऊन पर्यटन महसुलावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृत्रिम अभयारण्याच्या प्रस्तावास स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे प्रत्यक्ष भेट घेऊन हा विषय मांडला.

वाघांसह अन्य वन्यजीवांचा मुक्तसंचार पाहायला जगभरातून पर्यटनप्रेमी ताडोबा अभयारण्यात येत असतात. परंतु, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर व ‘कोअर झोन’ला लागून लोहारानजिक तयार होणाऱ्या कृत्रिम अभयारण्यामुळे पर्यटकांची संख्या कमी होऊन शासनाच्या महसुलात देखील घट होऊ शकते. चंद्रपूरपासून १५० किमीवरील नागपूर येथील गोरेवाडा येथे कृत्रिम अभयारण्य असल्याने चंद्रपुरातील ताडोबात अभयारण्याची गरज वाटत नाही. नवीन कृत्रिम अभयारण्य न करता ‘कोअर झोन’ मधील क्षेत्रांमध्ये वाढ करावी, वाघांसह अन्य वन्यजीवांचा नैसर्गिक अधिवास असावा याकरिता कृत्रिम अभयारण्याच्या प्रस्तावास स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

सरसकट आर्थिक मदत द्या

वरोरा-भद्रावती मतदारसंघांमध्ये गेल्या वीस दिवसांपासून अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली. संपूर्ण खरिपाचे पीक नष्ट झाले आहे. दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढवले असून, शासनाने या मतदारसंघांमध्ये ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट आर्थिक मदत करावी, अशी मागणीही प्रतिभा धानोरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pratibha dhanorkar against wadettiwar artificial sanctuary project conflict between wadettiwar dhanorkar will intensified again print politics news asj
First published on: 28-07-2022 at 11:59 IST