अकोला : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सण व उत्सवांमधून निवडणुकीची तयारी करण्याची आयती संधीच नेत्यांसह इच्छुकांना मिळाली. उत्सवांतील गर्दीला आकर्षित करण्याचे प्रयत्न प्रमुख राजकीय नेत्यांनी सुरू केले. अकोला शहरातील कावड व पालखी महोत्सव, गणेशोत्सव, गौरी पूजन आदींच्या माध्यमातून नेत्यांनी दर्शन, भेटीगाठी व स्वागत करून निवडणुकीच्या मोर्चेबांधणीवर भर दिल्याचे चित्र आहे. मतदारांना प्रभावित करण्यासाठी नेत्यांवर धार्मिक उत्सवाचे रंग चढले आहेत.
राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होऊ घातली. या निवडणुकीसाठी प्रमुख पक्षांसह इच्छुक जोमाने कामाला लागले आहेत. अकोला जिल्ह्यात अकोला पूर्व, अकोला पश्चिम, बाळापूर, अकोट व मूर्तिजापूर असे पाच विधानसभा मतदारसंघ येतात. सर्वच ठिकाणी प्रमुख पक्षांमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी आहे. निवडणूक लढण्यासाठी अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. निवडणुकीच्या अगोदरच अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचून वातावरण निर्मिती करण्याचे नेत्यांचे लक्ष्य असते. त्यातच सणासुदीचा काळ म्हणजे जनसंपर्क वाढविण्यासाठी सुवर्ण संधीच. चातुर्मासामध्ये सण व उत्सवांची रेलचेल असते. या चार महिन्यांमध्ये अनेक मोठे उत्सव सार्वजनिकरित्या साजरे केले जातात. श्रावणात मध्य भारतातील सर्वात मोठ्या कावड व पालखी महोत्सवाची ८० वर्षांची प्राचीन परंपरा अकोला शहरात जोपासली जाते. गणेशोत्सव व गौरी पूजन देखील भक्तिभावाने मोठ्या प्रमाणावर साजरे करण्याची जिल्ह्यात प्रथा आहे. त्या उत्सवांतील गर्दीतून आगामी निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय मशागत सुरू झाली.
हेही वाचा – वडेट्टीवारांना घेरण्याचे काँग्रेसमधूनच प्रयत्न सुरू
उत्सवांमध्ये पुढे-पुढे करण्यासाठी इच्छुकांमध्ये प्रचंड स्पर्धा लागली आहे. सणासुदीतील गर्दी आपल्याकडे वळविण्यासाठी नेत्यांची लगबग दिसून येते. कावड यात्रेमध्ये राजकीय पक्षांकडून चौकाचौकात स्वागत केल्यानंतर आता गणेशोत्सवामध्ये मंडळांना भेटी देण्यासाठी इच्छुकांनी पायाला भिंगरी लावली. गणेशोत्सवात दर्शनासोबतच जनसंवादावर जोर दिला जातो. यामध्ये सर्वपक्षातील इच्छुक आहेत. गणपती मंडळांना भेटी देताना नेते दिसताच विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू असल्याची चर्चा सुरू होते. त्या इच्छुकांकडून मंडळाच्या कार्यकर्त्यांना वर्गणी व इतर माध्यमातून खुश ठेवण्याचे देखील प्रयत्न केले जातात. जागा वाटप, उमेदवारी याचा पत्ता नसताना भाजप, काँग्रेस, वंचित, शिवसेनेचे शिंदे गट, ठाकरे गट, राष्ट्रवादीचे दोन्ही गट आदी पक्षांतील इच्छुक सणासुदीतील गर्दीचा लाभ मिळविण्यासाठी पुढे सरसावले आहेत. इच्छुकांचे प्रयत्न निवडणुकीत उपयुक्त ठरतील का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
हेही वाचा – कारण राजकारण : लिंगायत मतांमुळे अक्कलकोटमध्ये भाजप सुरक्षित
इच्छुकांमध्ये चढाओढ
निवडणुकीच्या काळात जनमानसात पक्षाची प्रतिमा उजळण्यासाठी जनसंवाद, लोकसंवाद सारख्या मोहीम राबविण्यात येत आहेत. प्रमुख पक्षांमध्ये इच्छुकांची गर्दी असल्याने उमेदवारीसाठी त्यांच्यात प्रचंड चढाओढ सुरू आहे. आपणच कसे योग्य हे पटवून देण्याचा प्रयत्न इच्छुकांकडून केला जातो. पक्षांतर्गत कुरघोडी, गटातटाचे राजकारण देखील जोमाने सुरू आहे.