मुंबई : कोणत्याही परिस्थितीत आपल्या लोकांना सत्तेत बसवायचे आहे. आपल्याला किमान २०० ते २२५ जागा लढायच्या आहेत. त्यासाठी कोणाच्या युतीच्या प्रस्तावाची वाट पाहू नका, स्वबळावर निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी राज ठाकरे बोलत होते. यावेळी मनसेचे सर्व नेते, सरचिटणीस, विभागप्रमुख, विभाग अध्यक्षांसह इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच जण तयारीला लागलो आहोत. युती होणार की नाही, हा विचार तुम्ही करू नका, परंतु आपण २०० ते २२५ जागा लढणार आहोत. तसेच १ ऑगस्टनंतर राज्याच्या दौरा करणार असल्याचे ठाकरे यांनी जाहीर केले. त्यामुळे महायुतीने समाधानकारक जागा दिल्या नाहीत तर स्वबळावर निवडणुका लढण्याची तयारी मनसेने सुरू केली आहे.राज्याच्या खऱ्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला कोणालाच वेळ नाही. लोकांच्या प्रश्नांकडे आपण लक्ष दिले पाहिजे. जनहिताचे प्रश्न हाच मनसेच्या प्रचाराचा मुद्दा असला पाहिजे, असे त्यांनी यावेळी नमूद केले.