निलेश पानमंद /जयेश सामंत
ठाणे : येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता व्यक्त होत असतानाच, त्यापूर्वी विविध कार्यक्रम आणि पक्षांच्या बैठकानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे राज्यासह ठाणे जिल्ह्यात उपस्थिती राहणार र आहे. १ ऑक्टोबरला अमित शाह यांचा दौरा निश्चित झाला आहे तर, पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याची तारीख निश्चित झाली नसली तरी ५ ऑक्टोबरला हा दौरा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या निमित्ताने विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजण्याआधी भाजपची मोर्चेबांधणी सुरू केल्याचे चित्र आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात फटका बसला. त्याची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत होऊ नये यासाठी महायुतीमधील पक्ष सतर्क झाले आहेत. विरोधकांना नामोहरम करण्यासाठी महायुतीमधील शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाचे नेते संघटनात्मक बैठका घेत आहेत. याशिवाय, विविध प्रकल्पाचे उदघाटन, भूमिपूजन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत केले जात आहेत.

हेही वाचा >>>नवीन योजनांचा राज्याच्या तिजोरीवर भार ;वित्त विभागाच्या नकारानंतरही १,७०० कोटी रुपयांच्या क्रीडा संकुलांना मंजुरी

येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यामुळे आचारसंहित्यापूर्वी विविध प्रकल्प उदघाटन, भूमिपूजन कार्यक्रम करून वातावरण निर्मिती करण्याची तयारी महायुतीकडून सुरू असून त्याचबरोबर भाजपने मतदार संघनिहाय आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित केली आहे. ही बैठक १ ऑक्टोबरला अमित शहा यांच्या उपस्थितीत सिडकोच्या वाशी येथील एक्झिबिशन सेंटर येथे होणार आहे. याठिकाणी ते कोकण विभागातील मतदार संघांचा आढावा घेऊन पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत. तर, नवी मुंबई विमानतळावर विमान उतरविण्याची पहिली चाचणी आणि घोडबंदर भागात लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत करण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याची तारीख निश्चित झाली नसली तरी ५ ऑक्टोबरला हा दौरा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यानिमित्ताने भाजपने निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केल्याचे चित्र दिसून येत आहे.

हेही वाचा >>>महायुतीचा विरोधी पक्षनेता कोण हे फडणवीस यांनी ठरवावे’; बाळासाहेब थोरात यांना १८० जागा जिंकण्याचा विश्वास

ठाणे जिल्हा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड मानला जातो. या जिल्ह्यात १८ विधानसभा मतदार संघ येतात. २०१४ च्या निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात भाजपने सात तर शिवसेनेने ६ जागा जिंकल्या होत्या. २०१९ च्या निवडणुकीत भाजपने ८ तर शिवसेनेने ५ जागा जिंकल्या होत्या. यामुळे गेल्या काही वर्षात ठाणे जिल्ह्यात भाजपची ताकद वाढल्याचे चित्र दिसत असून यातूनच महायुतीच्या जागा वाटपात भाजपकडून जिल्ह्यातील इतर जागांवर दावे केले जात आहे. लोकसभा निवडणुकीवेळी हे चित्र दिसून आले होते. ठाणे लोकसभा मतदार संघावर भाजपने दावा केला होता. पण, युतीच्या जागा वाटपात मुख्यमंत्र्यांनी ही जागा मिळवत तिथे विजय संपादन केला. त्यामुळे लोकसभेप्रमाणेच विधानसभेच्या निवडणुकीत ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील इतर जागांवर भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून दावा करण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात असून या पार्श्वभूमीवर या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prime minister narendra modi home minister amit shah visit thane district amy