ब्राह्मण समाजावर टीका केल्याने पक्षातून डच्चू मिळाल्यानंतर तीन दिवसांनी मध्य प्रदेशच्या चंबळ प्रदेशातील ओबीसी नेते प्रीतम सिंग लोधी यांनी शिवपुरी जिल्ह्यातील पिचोरमधून “शक्तिप्रदर्शन” मेळावा घेतला. यावेळी ७,००० हून अधिक लोक उपस्थित होते. लोधी यांच्या समर्थकांनी २२ ऑगस्ट रोजी झालेल्या मेळाव्यात भाजपा अध्यक्ष व्ही डी शर्मा आणि गृहमंत्री नरोत्तम शर्मा यांच्या विरुद्ध घोषणाबाजी केली. हे दोन्ही नेते ग्वालियर-चंबळ पट्ट्यातील महत्त्वाचे ब्राह्मण नेते मानले जातात.

त्यानंतर पुढच्या दिवशी माजी केंद्रीय मंत्री उमा भारती यांचे नातेवाईक असलेल्या लोधी यांनी ओबीसी महासभेत प्रवेश केला. ही ग्वाल्हेरमधील राज्य ओबीसी समितीची सह-संघटना आहे. ओबीसींच्या जनगणनेची मागणी आणि त्यानुसार त्यांच्या आरक्षणात वाढ करण्यासाठी दबाव आणण्यासाठी, लोधी यांनी २८ ऑगस्ट रोजी पिचोर येथे आणखी एक मेळावा घेण्याची काढण्याची हाक दिली आहे. राज्यात ओबीसींची लोकसंख्या निम्याहून अधिक असल्याचा अंदाज आहे.

भाजपच्या तिकिटावर २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत पिचोरमधून पराभूत झालेल्या लोधी यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारला धारेवर धरले. बांदा तहसीलमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका वृद्ध सवर्ण व्यक्तीवर तातडीने कारवाई करण्यात अपयशी ठरल्याचा ठपका त्यांनी भाजपावर ठेवला. “प्रथम मुलीचे अपहरण करून, बलात्कार आणि नंतर खून करण्यात आला. आंदोलकांनी न्यायाच्या मागणीसाठी रॅली काढली असता त्यांच्यावर लाठीहल्ला झाला. _मार भी रहे हैं और रोने भी नहीं दे रहे हैं_(पीडितांवर होत असलेल्या अत्याचाराचा निषेध देखील करू शकत नाहीत),” असे उदगार त्यांनी पिचोरच्या मेळाव्यात काढले.

ब्राह्मणांवर केलेल्या शेरेबाजीबद्दल बोलताना लोधी म्हणाले, “मी माझ्या टिप्पणीबद्दल माफी देखील मागितली. तरीही माझ्या हातात भाजपाने नारळ दिला. छत्तरपूरच्या भागेश्वर धाम पंडित धीरेन्द्र शास्त्री यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली. हे सरकार दुटप्पी आहे,” असे सांगत त्यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली.