Priyanka Gandhi Vadra FIle Lok Sabha Candidate Nomination from Wayanad : काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी-वाड्रा यांनी वायनाड (केरळ) मतदारसंघातून लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वायनाड व अमेठी (उत्तर प्रदेश) मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. दोन्ही मतदारसंघात त्यांनी विजय मिळवला. त्यानंतर राहुल गांधी यांनी वायनाडच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे, त्यामुळे आता या मतदारसंघात पोटनिवडणूक होत असून प्रियांका गांधी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. २००८ साली देशभर मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतर हा नवा मतदारसंघ अस्तित्वात आला. तेव्हापासून आतापर्यंत झालेल्या चारही लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचे उमेदवार येथून विजयी झाले आहेत. वायनाड हा काँग्रेसचा बालेकिल्ला बनला असून येथे त्यांना केवळ डावे पक्षच काही प्रमाणात विरोध करू शकतात अशी स्थिती आहे.

२००९ व २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेस नेते, केरळ स्टुडंट्स युनियनचे माजी अध्यक्ष एम. आय. शानवास यांनी विजय मिळवला होता. ते वायनाडचे पहिले खासदार ठरले होते. वायनाडचा किल्ला जिंकण्यापूर्वी शानवास यांचा तीन विधानसभा व दोन लोकसभा निवडणुकांमध्ये पराभव झाला होता. मात्र, २००९ च्या लोकसभा निवडणुकीत शानवास यांनी कम्युनिस्ट पार्टीचे उमेदवार एम. रहमतुल्लाह यांचा तब्बल दीड लाख मतांनी पराभव केला. शानवास यांनी २०१४ मध्ये पुन्हा एकदा वायनाडची लोकसभा निवडणूक जिंकली.

राहुल गांधींचा सलग दोन वेळा बलाढ्य विजय

२०१८ मध्ये शानवास यांचं निधन झालं, त्यामुळे काँग्रेसला येथे नवा उमेदवार द्यावा लागणार होता. मात्र, २०१९ च्या निवडणुकीवेळी पंतप्रधान मोदींची लाट व भाजपा नेत्या स्मृती इराणींची अमेठीमधील (काँग्रेसचा पारंपरिक लोकसभा मतदारसंघ) वाढती लोकप्रियता पाहून काँग्रेसने राहुल गांधी यांना वायनाड व अमेठी या दोन्ही मतदारसंघांतून लोकसभेच्या रिंगणात उतरवलं. इराणी यांनी अमेठीत राहुल गांधींचा पराभव केला. मात्र, वायनाडवासियांनी राहुल गांधींवर विश्वास दर्शवत त्यांना लोकसभेत पाठवलं. राहुल गांधी यांना अमेठीमध्ये तब्बल ७,०६,३६७ मतं मिळाली, तर कम्युनिस्ट पार्टीच्या पी. पी. सुनीर यांना २,७४,५९७ मतं मिळाली होती. २०२४ मध्ये मात्र राहुल गांधी यांनी अमेठी व वायनाड या दोन्ही मतदारसंघांत विजय मिळवला. यंदा राहुल गांधी यांना वायनाडमध्ये ६,४७,४४५ मतं मिळाली, तर कम्युनिस्ट पार्टीच्या अ‍ॅनी राजा यांना २,८३,०२३ मतं मिळाली.

सलग दोन निवडणुकांमध्ये राहुल गांधी यांनी या मतदारसंघात साडेतीन ते चार लाख मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे. या मुस्लीमबहुल लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला मुस्लीम लीगचीदेखील साथ मिळत असल्यामुळे काँग्रेसला या मतदारसंघात आव्हान देणं अवघड आहे, म्हणूनच काँग्रेसने प्रियांका गांधी यांना येथून लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे.

प्रियांका गांधींची स्थिती मजबूत

वायनाड लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या एकूण सात जागा आहेत. यापैकी तीन मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत, तर एका मतदारसंघात मुस्लीम लीगचा आमदार आहे. एका मतदारसंघात अपक्ष आमदार असून कम्युनिस्ट पार्टीकडे दोन जागा आहेत. भाजपासह इतर पक्षांना वायनाडसह केरळमधील जनता फारसा प्रतिसाद देत नसल्याचं अलीकडच्या निवडणुकांमधील मतदानावरून स्पष्ट होत आहे, त्यामुळे वायनाडमध्ये प्रियांका गांधींना पराभूत करणं त्यांच्या विरोधकांसाठी अवघड आहे.

चार दशकांपासून काँग्रेसचा प्रभाव

मतदारसंघ पुनर्रचना होण्यापूर्वी (१९७७ ते २००४ पर्यंत) आजच्या वायनाडमधील विधानसभेचे मतदारसंघ हे कालिकत, कन्नूर आणि मांजेरी या मतदारसंघांमध्ये विभागलेले होते. १९७७ ते २००४ पर्यंत झालेल्या नऊ लोकसभा निवडणुकांपैकी सहा वेळा काँग्रेसने कालिकतची व कन्नूरची जागा जिंकली होती. मात्र, मंजेरीची जागा काँग्रेसला कधी जिंकता आली नव्हती. तर डाव्या पक्षांनी कालिकतमध्ये एकदा व कन्नूरमध्ये तीन वेळा विजय मिळवला होता. मांजेरीची जागा मुस्लीम लीगने जिंकली होती. याचाच अर्थ मतदारसंघांच्या पुनर्रचनेआधीसुद्धा येथील जनतेवर काँग्रेसचा प्रभाव राहिला आहे.

Story img Loader