Priyanka Gandhis campaign succeeds for the first time in-himachal-pradesh-election-results-2022 | Loksatta

हिमाचल प्रदेशमध्ये लोकप्रिय घोषणांनी काँग्रेसला तारले; प्रियंका गांधींच्या प्रचाराला पहिल्यांदाच यश

भाजपच्या ३० बंडखोरांमुळे काँग्रेससाठी हिमाचल प्रदेशमधील निवडणूक तुलनेत सोपी झाल्याचे मानले जात आहे.

priyanka gandhi
हिमाचल प्रदेशमध्ये प्रियंका गांधींच्या प्रचाराला पहिल्यांदाच यश

हिमाचल प्रदेशमधील विजय काँग्रेससाठी महत्त्वाचा ठरला असून एक लाख नोकऱ्या, जुनी निवृत्तीवेतन योजना आणि महिलांसाठी दरमहा पंधराशे या लोकप्रिय घोषणांमुळे मतदारांनी काँग्रेसच्या हाती पुन्हा सत्ता दिली आहे. या विजयामुळे काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी-वाड्रा यांच्या प्रचाराला पहिल्यांदाच यश मिळाले आहे.

हेही वाचा- मैनपुरीमध्ये सपाचा बोलबाला! अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव २ लाख ८८ हजार मतांच्या फरकाने विजयी

भाजपच्या ३० बंडखोरांमुळे काँग्रेससाठी ही निवडणूक तुलनेत सोपी झाल्याचे मानले जात आहे. ६८ जागांच्या विधानसभेत काँग्रेस ४० जागांचा पल्ला गाठण्याची शक्यता असल्याने दिल्लीमध्ये काँग्रेसचे केंद्रीय नेते निर्धास्त झाले आहेत. मतमोजणीच्या पहिल्या सत्रामध्ये दोन्ही पक्षांमध्ये अटीतटीचा संघर्ष सुरू असल्याचे दिसत होते. त्यामुळे आमदारांना आमिष दाखवून ‘तोडफोडी’चे राजकारण खेळले जाण्याची भीती काँग्रेसला वाटत होती. मात्र, दुपारी निकालाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर निवडणूक प्रभारी व छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, भूपेंदर हुडा, राजीव शुक्ला हे तिन्ही नेते शिमल्याला रवाना झाले.

हेही वाचा- Himachal Pradesh Election Results 2022: हिमाचल प्रदेशमध्ये बंडखोरांकडून भाजपचा घात;मोदींकडे बघून कमळाला मत देण्यास मतदारांचा नकार

हिमाचल प्रदेशमध्ये वीरभद्र सिंह यांच्या मृत्यूनंतर काँग्रेससकडे सक्षम नेतृत्व व निवडणूक जिंकून देणारा चेहरा राहिलेला नव्हता. मात्र, महासचिव प्रियंका गांधी-वाड्रा यांनी प्रचाराची जबाबदारी एकहाती पूर्णपणे सांभाळली होती. काँग्रेसच्या राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांमध्ये प्रियंका यांच्या व्यतिरिक्त प्रामुख्याने पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, भूपेश बघेल याच काही नेत्यांच्या प्रचारसभा झाल्या होत्या. त्यामुळे राहुल गांधी यांनी प्रचार केला नसल्याने काँग्रेससाठी प्रियंका गांधी-वाड्रा याच निवडणुकीचा चेहरा बनल्या होत्या. उत्तर प्रदेशमध्ये प्रियंका यांनी एकहाती प्रचार करूनही काँग्रेसचा दारुण पराभव झाला होता. गुजरातमधील घरोघरी जाऊन प्रचार केल्याचा दावा काँग्रेसने केला होता पण, प्रत्यक्षात काँग्रेसचा हा प्रयोग हिमाचल प्रदेशमध्ये यशस्वी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये आम आदमी पक्षानेही उमेदवार उभे केले होते पण, ‘आप’ने अधिक लक्ष गुजरातकडे दिल्याचा लाभ काँग्रेसला मिळाला आहे. गुजरातमध्ये मात्र याच ‘आप’मुळे काँग्रेसला फटका बसला आहे. हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीतून ‘आप’ने लक्ष काढून घेतल्याने त्यांच्या मोफत वीज वगैरे घोषणांचा प्रभाव मतदारांवर पडला नाही. उलट, काँग्रेसने केलेल्या लोकप्रिय घोषणांनी मतदारांना आकर्षित केले. एक लाख नोकऱ्या दिल्या जातील, जुनी निवृत्तवेतन योजना लागू केली जाईल आणि महिलांना पंधराशे रुपयांचा दरमहाभत्ता दिला जाईल, या तीनही घोषणांनी भाजपच्या ‘रिवाज’ बदलण्याच्या आवाहनावर मात केली.

हेही वाचा- गुजरात राज्यात ‘आप’चा प्रवेश, राष्ट्रीय पक्ष म्हणून नावारुपाला येणार? मनिष सिसोदिया म्हणाले “संपूर्ण देशाला…”

भाजपला बंडखोरीने हैराण केले होते, भाजपचे ३० बंडखोर निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते, त्यातील अनेकांना पंतप्रधान मोदींनी उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली होती. पण, या बंडखोरांनी मोदींचे म्हणणेही अव्हेरले. भाजपचे माजी मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल यांच्या शब्दाला बंडखोरांनी अधिक मान दिल्याचे मानले जात आहे. मतमोजणीच्या सुरुवातीला अटीतटीच्या वाटणाऱ्या निवडणुकीने अखेर काँग्रेसच्या सत्तेचा मार्ग मोकळा केला.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2022 at 17:58 IST
Next Story
मैनपुरीमध्ये सपाचा बोलबाला! अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव २ लाख ८८ हजार मतांच्या फरकाने विजयी