आजच्या महत्वाच्या राजकीय बातम्या : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी इंडिया आघाडीच्या नेत्यांनी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन केले… ज्ञानेश कुमार गेल्यानंतर हे सरकारही जाणार, असा खळबळजनक दावा शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना केला… केंद्रामध्ये मोदी-शाह सत्तेत आल्यापासून निवडणूक आयोग हायजॅक झाला असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली… ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यानंतरही आमचा लढा सुरूच राहील, असा इशारा सीजेपीचे सह-संयोजक आशुतोष रांका यांनी भाजपा सरकारला दिला… काँग्रेस नेते राहुल गांधी हे निराधार विधाने करून संपूर्ण देशाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप सत्ताधारी भाजपाकडून करण्यात आला. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…
दिल्लीत पुन्हा आंदोलन पेटले, गांधी भावंडांवर गुन्हा
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी इंडिया आघाडीच्या नेत्यांनी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन केले. विरोधी पक्षांच्या या आक्रमक भूमिकेमुळे राजधानीतील रस्त्यांवर मोठा गदारोळ निर्माण झाला होता. काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी यांनी थेट रस्त्यावर झोपून निवडणूक आयोगाचा निषेध केला; तर राहुल गांधी हे पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेट्सवर चढून निषेध करताना दिसून आले. यादरम्यान पोलिसांनी गांधी भावंडांसह विरोधी पक्षांतील अनेक नेत्यांना ताब्यात घेऊन विविध पोलीस ठाण्यात नेले. मंगळवारीही राहुल, प्रियांका यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी आकाशवाणी भवन परिसरात ठिय्या आंदोलन केले होते. याप्रकरणी पोलिसांनी गांधी भावंडांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना प्रत्येक एफआयआर हा माझ्यासाठी १०० सुवर्ण पदकांसारखा आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
…तर सरकारही जाणार, ठाकरेंचा मोठा दावा
निवडणूक आयोगाविरोधात राजधानीत आंदोलन करणाऱ्या इंडिया आघाडीच्या खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यावर गुन्हाही दाखल केला. त्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. तसेच भाजपा हे निवडणूक आयोगाशी संगनमत करून सत्तेत आले असल्याची टीकाही त्यांनी केली. ज्ञानेश कुमार यांच्या आशीर्वादानेच हे सरकार बनले असून ते गेल्यावर हे सरकारही जाईल. भाजपाचे सरकार बेकायदेशीर आहे आणि मतांच्या चोरीमुळेच हे सरकार बनले असल्याने सरकार त्यांना संरक्षण देत आहे, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. त्यांच्या या आरोपांवर आता भाजपाचे नेते काय उत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
“मोदी-शाह आल्यापासून निवडणूक आयोग हायजॅक”
केंद्रामध्ये मोदी-शाह सत्तेत आल्यापासून निवडणूक आयोग हायजॅक झाला आहे. तसेच निवडणूक आयोगातील अधिकारी भाजपाचे एजंट म्हणून काम करत आहे. पण हे जास्त दिवस चालणार नाही. हुकुमशहाला चमचेगिरी आवडते, मात्र आता त्यांचा अंत होण्याची वेळ आली आहे, असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. तसेच विरोधी पक्षांतील पावणे तीनशे खासदारांना बंदुकीच्या बळावर रोखण्यात आले, महिला खासदारांशी गैरवर्तन केले आणि रात्री साडे अकरा वाजता राहुल गांधी यांची सुटका झाली हे चित्र देशातच नाही तर जगात गेले आहे. आता हे आंदोलन थांबणार नसून त्याची ठिगणी देशभरात पडली आहे, असेही राऊत म्हणाले. ज्ञानेश कुमार यांना जावेच लागणार आहे. पण या सगळ्यात अमित शाह कुठे आहेत? ते भूमिगत झाले आहेत का? मोदीही यावर बोलत का नाहीत? असा प्रश्नही राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना विचारला आहे.
कॉक्रोच जनता पार्टीचा सरकारला इशारा
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यानंतरही आमचा लढा सुरूच राहील, असा इशारा कॉक्रोच जनता पार्टीचे (CJP) सह-संयोजक आशुतोष रांका यांनी सरकारला दिला. तसेच सीजेपीने मांडलेल्या तिन्ही प्रमुख मागण्या जोपर्यंत शासन मान्य करत नाही, तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. सीजेपीने १० ऑक्टोबर रोजी दिल्लीतील ऐतिहासिक जंतर-मंतर मैदानावर देशव्यापी महाआंदोलनाची हाक दिली आहे. त्यातच रांका यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे भाजपाची आणखीच कोंडी होण्याची शक्यता आहे. सीजेपीने सरकारकडे मागण्यांचा मोठा फलकच उभा केला आहे. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासोबतच त्यांच्यावर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, याशिवाय, वादग्रस्त ‘एसआयआर’ प्रक्रिया तातडीने रद्द करून जानेवारी २०२५ ची अधिकृत मतदार यादीच लागू करण्यात यावी, अशा त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत.
भाजपाचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
निवडणूक आयोगाच्या ‘एसआयआर’ मोहिमेवर तीव्र आक्षेप घेऊन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या इंडिया आघाडीच्या नेत्यांवर सत्ताधारी भाजपाने जोरदार टीका केली. काँग्रेस नेते राहुल गांधी हे निराधार विधाने करून संपूर्ण देशाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला. गेल्या चार पिढ्यांपासून लोकशाहीची गळचेपी करून हुकूमशाही पद्धतीने कारभार करणाऱ्या काँग्रेसने आज लोकशाहीच्या नावाखाली आकाशवाणी भवनात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, अशी टीका भाजपाचे प्रवक्त डॉ. सुधांशू त्रिवेदी यांनी पत्रकार परिषदेतून केली, तर काँग्रेस पक्ष तसेच राहुल गांधी सातत्याने घटनात्मक संस्थांवर हल्ले करत आहेत, असा आरोप संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी केला. याचा लोकशाहीला किंवा जनतेचा पाठिंबा मिळवण्यासाठी काँग्रेस पक्षाला काहीच फायदा होणार नाही. राहुल गांधी यांनी हे रोजचे नाटक थांबवावे असा टोला रिजिजू यांनी लगावला. त्यांचे हे नाटक २०१४ पासून सुरू असून ते किती काळ चालणार, असा सवाल रिजिजू यांनी केला.
