मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात गणेश नाईक, संजय केळकर, किसन कथोरे यांच्यासारखे दिग्गजांच्या मांदियाळीत मंत्रिमंडळात पहिली संधी रविंद्र चव्हाणांनाच मिळेल हे तसे अपेक्षितच मानले जात होते. देवेंद्र फडणवीस म्हणतील ती पूर्वदिशा या न्यायाने त्यांनी आखून दिलेल्या मोहिमा चोखपणे पूर्ण करायच्या ही चव्हाण यांची खासीयत. शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख होते तेव्हापासून त्यांच्याशी चव्हाणांनी ठरवून सख्य कायम ठेवले. त्यामुळे नाईक, केळकरांपेक्षा कमी ‘उपद्रवी’ ठरतील अशा चव्हाणांचा विचार शिंदे-फडणवीसांच्या पातळीवर होईल हे तसेच स्पष्टच होते. राज्यात देवेंद्र आणि जिल्ह्यात एकनाथ अशी कार्यपद्धती राहिलेल्या चव्हाणांना मुख्यमंत्र्यांच्या खासदार पुत्राचा मात्र जाच होऊ लागल्याने एरवी समन्वयी असणारे चव्हाण हल्ली कुठे संघर्ष करताना दिसू लागले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचा मोठा पगडा राहिलेल्या डोंबिवलीसारख्या सुरक्षित मतदारसंघात मोठमोठ्या दिग्गजांना घरी बसवत १४ वर्षांपूर्वी रविंद्र चव्हाण यांनी भाजपची उमेदवारी मिळवली तेव्हा अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. संघ शाखांमधून स्वत:चा दिवस सुरू करणारे आणि म्हाळगी, कापसे ‘परंपरे’चा दाखला देणाऱ्या अनेकांना तेव्हा ही उमेदवारी रुचली नव्हती. तरीही भारत मातेच्या जयघोषात नव्या भारताची स्वप्न पहाणाऱ्या डोंबिवलीकरांनी नाक मुरडत का होईना सुरुवातीला चव्हाणांना आपले म्हटले. पुढे स्थिरस्थावर झाल्यानंतर चव्हाणांनी मोठ्या खुबीने संघाच्या गोटातही हळहळू आपले स्थान पक्के केले. राज्यात देवेंद्र फडणवीस सत्तापदी येताच त्यांच्या निकटवर्तीयांमध्ये चव्हाण गणले जाऊ लागले. फडणवीसांनी शब्द टाकायचा आणि चव्हाणांनी तो झेलायचा या न्यायाने पनवेलपासून कोकणाच्या टोकापर्यत अनेक मोहिमांवर त्यांची नियुक्ती होऊ लागली. फडणवीसांच्या मंत्रिमंडळात दुसऱ्या टप्प्यात चव्हाणांकडे राज्यमंत्रिपद आले. एकनाथ शिंदे पालकमंत्री आणि चव्हाण राज्यमंत्री. युतीच्या राजकारणात भाजप-शिवसेनेत वरचेवर खटके सुरू असायचे. ठाणे जिल्ह्यात चव्हाणांनी मात्र शिंदे यांच्याशी कधी पंगा घेतला नाही. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीचा एखादा अपवाद वगळला तर शिंदे यांचा शब्द प्रमाण मानणाऱ्या चव्हाणांना शिंदे-फडणवीसांच्या वाढत्या मैत्रीचा अंदाजही खूप आधीपासून आला होता. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार पडताना सूरत, गुवाहाटी, गोवा ते मुंबई या साऱ्या प्रवासात शिंदेंच्या सोबतीसाठी भाजपच्या गोटातून खास त्यांची पाठवणी करण्यात आली. भाजपमधील त्यांचे प्रस्थ वाढत असल्याचे हे द्योतक मानले गेले. हेही वाचा - मध्य प्रदेशमध्ये तीन वर्षांत फक्त २१ जणांना सरकारी नोकरी? प्रियांका गांधींच्या दाव्याने खळबळ! प्रभावी खाते, परंतु डोंबिवलीत दुय्यम सत्तेच्या राजकारणात फडणवीसांच्या कृपेने थेट सार्वजनिक बांधकाम विभागासारखे प्रभावी खाते त्यांच्या पदरात पडल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. हे खाते मिळाल्याने चव्हाण मात्र हुरळून गेल्याचे दिसले नाही. मुख्यमंत्र्यांचे प्रभावक्षेत्र असलेल्या ठाणे जिल्ह्यात आपण नामधारी असल्याची जाणीव कदाचित त्यांना पहिल्याच दिवशी झाली असावी. ज्या खात्यासाठी मोर्चेबांधणी करावी लागते ते फडणवीसांनी अगदी सहजपणे पदरात टाकले. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात लुडबूड करण्यापेक्षा गड्या अपुला कोकण बरा या विचाराने ते त्याच भागात पक्ष संघटनेसाठी अधिक वेळ देताना दिसतात. ठाणे जिल्ह्यात शिंदे पिता-पुत्रांच्या मनाप्रमाणे कारभार सुरू आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या राजकीय महत्वकांक्षापुढे त्यांच्या विरोधकांची जागोजागी कोंडी होताना दिसत असली तरी भाजपचे स्थानिक नेतेही त्यास अपवाद राहिलेले नाहीत. थोरल्या शिंदेंनी पालकमंत्री असताना डोंबिवली महापालिकेत चव्हाणांना मन मानेल तसे बागडू दिले. खासदार शिंदे यांनी मात्र चव्हाणांची अनेक ठिकाणी नाकाबंदी केली आहे. महाविकास आघाडी सरकार असताना भाजप नगरसेवकांना गळाला लावण्याचा धडाकाच खासदार शिंदे यांनी लावला होता. राज्यात सरकार बदलल्यानंतर युतीच्या कितीही आणाभाका घेतल्या जात असल्या तरी डोंबिवलीत मात्र भाजपचा श्वास कोंडू लागल्याचे पहायला मिळत आहे. डोंबिवलीतील आपल्या बालेकिल्ल्यांनाच सुरुंग लावण्याचे प्रयत्न होत असल्याचे पाहून एरवी समन्वयी राजकारणासाठी ओळखले जाणारे चव्हाण सध्या संघर्षाचा पवित्रा घेऊ लागले आहेत. हेही वाचा - “सुडाचे दुसरे नाव म्हणजे मोदी!” नेहरूंचे १६ वर्षे वास्तव्य असलेल्या वास्तूचे नाव बदलल्यामुळे काँग्रेस आक्रमक, भाजपावर सडकून टीका सार्वजनिक बांधकाम विभागाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर येथील बदल्यांमधील अर्थकारण थांबविण्यात यश आले नाही, अशी जाहीर कबुली देऊन चर्चेत आलेल्या चव्हाणांनी ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांच्या कामांना अधिकाधिक निधी देण्यासाठी पाऊल उचलल्याचे पहायला मिळते. त्यांच्याच काळात ठाण्यातील सिव्हील रुग्णालयाच्या कामाला मुहूर्त मिळाला. बदल्यांसाठी कुणीही माझ्याकडे यायचे नाही, असा जाहीर दम भरून आपण आता वेगळ्या वाटेने निघाले असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न ते करताना दिसतात.